मुंबई : राज्यातील गोवंशाला ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease) झाल्यानंतर आता या आजाराशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने दरवर्षी लसीकरण (Lumpy Skin Vaccination) करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यातच लस (Lumpy Vaccine) तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रतिवर्षी दीड कोटींच्या निधीची आवश्यकता असेल. नियोजन विभागाने त्यास मान्यता दिली आहे. आता केवळ वित्त विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.
सध्या केंद्र सरकारकडून गोट फॉक्स लस घेतली जाते. या लसीचे तंत्रज्ञान राज्य सरकार घेण्याच्या तयारीत आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाने तसा प्रस्ताव वित्त व नियोजन विभागाला पाठविला आहे. यासाठी दीड कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी केंद्र सरकारलाच द्यायचा असल्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची गरज नाही. त्यामुळे नियोजन विभागाच्या मंजुरीनंतर आता वित्त विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे तशी मागणी केली जाईल.
‘लम्पी स्कीन’आजारामुळे जनावरांच्या मृत्यूदरात देशभरात महाराष्ट्राचा चौथा क्रमांक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात एक कोटी ४० लाख गोवंशीय पशुधन आहे. ‘लम्पी स्कीन’चा धोका गोवंशालाच असल्याने त्यांच्या लसीकरणावर भर आहे. सध्या ८० टक्के लसीकरण केल्याचा दावा केला जात असला तरी ग्रामीण भागातील परिस्थिती वेगळी आहे.
लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी खासगी डॉक्टरांचीही मदत घेतली आहे. या डॉक्टरांना प्रति लस तीन रुपये मोबदला दिला जात होता. मात्र, राज्य सरकारने त्यात वाढ करून पाच रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अनेक ठिकाणी शेतकरी खासगी डॉक्टरांकडून स्वखर्चाने उपचार करून घेत आहेत.
राज्यातील ३२ जिल्ह्यांतील २५२६ गावांत ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. या आधी ‘लम्पी स्कीन’न बाधित जनावरे आढळल्यानंतर पाच किलोमीटर परिसरातील जनावरांचे लसीकरण केले जात होते. मात्र, आता सरसकट लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.
- ‘लम्पी स्कीन’मुळे देशभरात ८५ हजार ६२८ जनावरांचा मृत्यू .
- राजस्थानमध्ये सर्वाधिक ५५ हजार ४४८ जनावरांचा मृत्यू.
- पंजाबमध्ये १७६५५, गुजरातमध्ये ५,८५७, महाराष्ट्रात ४,३१४ जनावरांचा मृत्यू.
- महाराष्ट्राचा मृत्यूदरात चौथा क्रमांक
लस पुण्यात बनण्याची शक्यता
राज्य सरकारने निधीला मान्यता दिल्यानंतर केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठविला जाईल. त्यानंतर तंत्रज्ञान हस्तांतरानंतर पुण्यातील पशुजैवपदार्थ निर्मिती संस्थेत ही लस निर्माण होऊ शकते. सध्या या संस्थेत घटसर्प, फऱ्या, शेळ्यांमधील इटीव्ही (आंत्रविषार) या लसी तयार केल्या जातात. तर कोंबड्यांचा देवी (चिकन पॉक्स), राणीखेत, कोंबड्यातील देवी, मरेक्स, लासोटा, मेंढ्यांतील देवी आणि शेळ्या- मेंढ्यांतील पीपीआर या लसींची निर्मिती केली आहे. लस निर्मिती मंजुरीसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.