जळगाव : खानदेशात एकामागून एक तालुक्यात गोवर्गीय जनावरांमध्ये ‘लम्पी स्कीन’चा शिरकाव (Lumpy Skin Outbreak Khnadesh) वाढत आहे. प्रतिबंधित गावांची संख्या मागील २० दिवसांत १०० ने वाढली आहे. तब्बल दीड हजार गावे प्रतिबंधित घोषित केली आहेत. यातच उपचारासाठी औषधांचा तुटवडा (Medicine Shortage) जाणवत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसून औषधे आणून पशुधनावर उपचार (Animal Treatment) करून घ्यावे लागत आहेत.
जळगाव जिल्ह्यात जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर हे तालुके ‘लम्पी स्कीन’चे हॉटस्पॉट आहे. पण निमोनिया व इतर संबंधित इंजेक्शन्स, औषधांचा तुटवडा आहे. ती खासगी दुकानांतून औषधे विकत आणावी लागत आहेत. यात मोठा वित्तीय फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
जळगावमधील चोपडा, धुळ्यातील शिरपूर तालुक्यात ‘लम्पी स्कीन’ने नव्याने शिरकाव केला आहे. त्यामुळे या आजार नियंत्रणासाठी पशुधनाची खरेदी- विक्री व वाहतुकीस प्रतिबंधित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी काढला.
शिरपूर तालुक्यातील निमझरी, बोरगाव, शिंगावे, थाळनेर, ताजपुरी, दोंदवाड, वाघाडी, भटाणे, दहिवद, शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी, वरझडी आणि धुळे तालुक्यांतील अंचाडे, चिंचवार, नवलनगर, हडसुणे, सोनगीर येथील पशुधनामध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल पुणे स्थित पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभागाच्या सहआयुक्तांनी दिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या बाधित १६ गाव क्षेत्र व रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणांपासून पाच किलोमीटर त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केला आहे.
आजार नियंत्रणासाठी सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा व महापालिकांमार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरीक्षण करावे. बाधित पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. पण हे निरीक्षण व उपचार, आजारी पशुधनाचे विलगीकरण कुणीही करीत नसल्याची स्थिती आहे. खानदेशात ‘लम्पी स्कीन’चा हॉटस्पॉट बनला आहे. पण शासन जागे झालेले नाही, अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे.
शासनाच्या फक्त घोषणाच...
एकीकडे पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या कमी आहे. दुसरीकडे आजाराचा फैलाव वाढला आहे. यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे. शासन फक्त घोषणाबाजी करीत आहे. खानदेशात रोज ३०० नवे पशुधन या आजाराला बळी पडत आहे. खानदेशात तब्बल ४०० पशुधनाचा मृत्यू या आजाराने झाला आहे. पण शासकीय आकडेवारी व्यवस्थित घेतली जात नाही. शासकीय यंत्रणा सातपुड्यात पोहोचलेलीच नाही. सातपुड्यात मोठे पशुधन या समस्येला बळी पडून मृत्युमुखी पडले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.