Goat Rearing : शेळ्या, मेंढ्या संगोपनात आहार, आरोग्य महत्त्वाचे

Goat Farming : वाढते तापमान, चाऱ्याची कमतरता, आजार अशा विविध प्रकारच्या ताणांना शेळ्या, मेंढ्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे आजार पसरतात. बाह्य वातावरणात झालेला बदल लहान करडांना सहन होत नाहीत. हे लक्षात घेऊन शेळ्या, मेंढ्यांचे योग्य व्यवस्थापन ठेवावे.
Goat Rearing
Goat Rearing Agrowon

मंगेश वैद्य, संदीप ढेंगे, गणेश गादेगावकर

Goat Farming Management : शेळ्या, मेंढ्यांचे मांस वाढीकरिता आवश्यक पोषक घटक चाऱ्याद्वारे मिळण्यासाठी क्षार मिश्रण, प्रतिजैविक मिसळावीत. शेळ्या मोठ्या प्रमाणावर झाडपाला खातात. प्रत्येक दिवशी पाच किलो हिरवा चारा आणि एक किलो वाळलेला चारा द्यावा.

करडे, कोकरांना जास्त दुधाची गरज असते. हिरवा चारा नसल्यास खुराक द्यावा. त्यामध्ये दूध वाढीसाठी खाद्य तसेच मका, तुरीचा भरडा असा खुराक द्यावा. शेळ्यांसाठी कप्प्यात लुसलुशीत हिरवा चारा टांगून ठेवावा.

करडू, कोकरांना वयाच्या ३० ते ४० दिवसांपासून मऊ, लुसलुशीत चारा देण्यास सुरुवात करावी, जेणेकरून चारा खाण्याची सवय होऊ लागते. खनिज क्षारांचा पुरवठा करण्यासाठी खनिज विटा टांगून ठेवाव्यात.

शेळी, मेंढ्यांच्या गोठ्यात अनावश्‍यक गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. उन्हाळ्यात खाद्यातील शुष्कांशावर जास्त भर द्यावा. खाद्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढवावे. खाद्यात १६ ते १८ टक्के प्रथिनांचे प्रमाण ठेवावे.

हिरव्या चाऱ्याचे (उदा. लुसर्न) प्रमाण वाढवावे.

शेळ्यांना खाद्यात क्षार मिश्रण, जीवनसत्त्वे, यीस्ट द्यावे. जीवनसत्त्व क आणि अ दिल्यास उष्णतेच्या ताणापासून होणाऱ्या मरतुकीस आळा बसतो. खाद्याची पाचकता व इतर घटकांचा समतोल राखावा. शेळ्यांच्या खाद्यात गव्हाचा चोथा, युरिया-मोलासेस मिनरल ब्लॉक यांचा समावेश करावा. तंतुमय पदार्थांची पचनीयता वाढवावी.

गाभणकाळातील आहार व्यवस्थापन

गाभण शेळ्या, मेंढ्यांना उन्हाचा जास्त त्रास होतो. स्वतःचे शरीर स्वस्थ ठेवणे तसेच गर्भामध्ये असलेल्या पिलांच्या वाढीसाठी अधिक ऊर्जेची गरज असते. त्यामुळे गर्भावस्थेत असलेल्या शेळ्या, मेंढ्यांना अधिकचा खुराक द्यावा.

Goat Rearing
Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

सशक्त करडू, कोकरू जन्मण्यासाठी गाभणकाळात योग्य व्यवस्थापन करावे. सहज पचणारा चारा आणि योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावे. आहारातील पोषणमूल्यांचा वापर गर्भ वाढ; तसेच त्यांचा शरीरातील पोषणमूल्यांचा साठा वाढविण्यासाठी होतो.

विण्याची तारीख जवळ येईल तशी चाऱ्याव्यतिरिक्त पोषणमूल्यांच्या पुरवठ्यासाठी अधिक खुराक द्यावा. गाभणकाळाच्या ९० दिवसानंतर जादा खुराक देण्याची गरज असते. गाभणकाळात जर उत्तम प्रतीचा चारा व खुराक दिला गेला नसल्यास अशक्त, लहान पिले जन्मतात किंवा त्यांचा गर्भाशयामध्ये मृत्यू होतो.

पाण्याचे नियोजन

बाह्य वातावरणात एकदम झालेला बदल

लहान करडांना सहन होऊ शकत नाही.

अचानक घडणारे बदल शेळ्यांच्या शरीरात ताण निर्माण करतात. अशा वेळी आजार पसरतात. शेळ्यांना स्वच्छ व थंडगार पाणी प्यायला द्यावे. २४ तास गरजेनुसार पाणी पिण्यासाठी उपलब्ध होईल याची सोय करावी.

उन्हाळ्यात शेळ्या, मेंढ्यांना थंड ठिकाणी ठेवावे. थंड पाणी पाजावे. गरज भासल्यास पायावर, मानेवर, पाठीवर पाणी शिंपडावे.

शेळ्यांना रात्रीपेक्षा दिवसा चारपट अधिक पाणी लागते; त्यामुळे स्वच्छ भांड्यात किंवा हौदात पाणी उपलब्ध करून द्यावे. पाण्याचे हौद स्वच्छ धुतलेले असावेत. पिण्याच्या पाण्याचे हौद, चाऱ्याच्या गव्हाणीला महिन्यातून एकवेळा चुना लावावा. पाण्यात पोटॅशिअम परमॅंगनेट (०.०१ टक्का) टाकून पाण्याचे निर्जंतुकीकरण करावे.

लसीकरण

करडे, कोकरांना एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वाताच्या लसीकरणाची प्रथम मात्रा ८ महिन्यांचे वय आणि पुन्हा १२ आठवड्यांची झाल्यावर द्यावी. माद्यांना एन्टरोटॉक्सिमिया आणि

धनुर्वाताच्या लसीकरणाची मात्रा समागम काळाच्या ४ ते ६ आठवडे आधी आणि विण्याच्या ४ ते ६ आठवडे आधी द्यावी.

नरांचे वर्षातून एकदा एन्टरोटॉक्सिमिया आणि धनुर्वात नियंत्रणासाठी लसीकरण करावे.

घटसर्प आजाराचा प्रादुर्भाव शेळ्यांमध्ये फारसा दिसून येत नाही, मात्र असा प्रादुर्भाव दिसून आल्यास आजारी शेळ्यांना ताबडतोब वेगळे करावे. इतर शेळ्या, मेंढ्यांना लसीकरण करावे.

सध्या पीपीआर आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे. त्यासाठी लसीकरण करावे. या आजाराची लक्षणे बऱ्याचदा बुळकांडी आजारासारखी दिसतात. त्यामुळे शेळ्यांना एकाच वेळी बुळकांडी, सर्दी अशी लक्षणे दिसून आल्यास तातडीने पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

Goat Rearing
Goat Rearing Techniques : शेळीपालनात ऋतुनिहाय व्यवस्थापन तंत्र बदलावर भर

निवारा व्यवस्थापन

शेळी, मेंढीला १२ ते १५ चौरस फूट जागा लागते. करडास ७ ते ८ चौरस फूट बंदिस्त जागा आणि २५ चौरस फूट मोकळी जागा लागते.

कप्प्यात गोणपाटाचा वापर केल्यास ओल शोषली जाते. जमिनीवर चुनखडीचा थोडा वापर ओल शोषण्यास मदत होते. फरशीपेक्षा मुरूम, मातीची धुम्मस केलेली जमीन अधिक गरम असते.

जन्मल्यानंतर पाच-सात दिवस शेळी आणि करडे एकत्र ठेवावीत.

निवाऱ्यात करडांसाठी स्वतंत्र मोकळी, हवेशीर, उबदार, कोरडी जागा असावी. साधारणपणे ६५ ते ७० दिवसांपासून करडांचे दूध कमी करत ९० दिवसांपर्यंत पूर्णपणे बंद करावे. शेळीपासून त्यांना पूर्णपणे वेगळे करावे.

करडे, कोकरांचे संगोपन

दमट हवेमुळे गोठे ओलसर राहतात. त्यामुळे रोगराई वाढण्याची संभावना असते. त्यातून मरतूक जास्त प्रमाणात होते. हे लक्षात घेऊन गोठ्यात हवा खेळती ठेवावी. करडू, कोकरांना अर्धा चौरस मीटर जागा द्यावी. गोठ्यात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

खाद्य देणे आणि दूध पाजण्याच्या वेळा नियमित पाळाव्यात. ऊन, वारा, भक्षक प्राण्यापासून संरक्षण करावे. जन्मानंतर लगेच त्यांना उभे राहण्यास मदत करावी.

करडू,कोकरू उभे राहिल्यानंतर स्वतः शेळी, मेंढीच्या सडाला तोंड लावून ते दूध पिण्याचे प्रयत्न करते की नाही हे पाहावे, नाही तर दूध पिण्यास शिकवावे.

करडे, कोकरांना जीवनसत्त्वे, क्षार मिश्रण, प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. त्यांना नियमित जंताचे औषध पाजावे. जन्मल्यानंतर अर्धा तासाच्या आत कोवळे दूध म्हणजे चीक पाजावा. यामुळे त्यांची रोगप्रतिकारकक्षमता वाढते. त्यांची पचनसंस्था व पचनमार्ग साफ होतो.

पहिल्या आठवड्यात करडू, कोकरास त्यांच्या वजनाच्या दहा टक्के दूध चार- पाच वेळेस विभागून पाजावे. त्यांचे वजन १० किलो असल्यास त्याला किमान एक लिटर दूध दिवसभरात विभागून पाजावे.

मुक्त संचार गोठा पद्धती

शेळ्या, मेंढ्या संपूर्ण कुरणात चारणे आणि त्यांना संपूर्ण हंगामासाठी तेथे सोडणे ही एक व्यापक व्यवस्था आहे. या पद्धतीत खाद्याचा खर्च खूपच कमी होतो.

मुक्त संचार पद्धतीमध्ये जेथे कुरणावर शेळ्या, मेंढ्या चरायला सोडणार आहोत, तेथे जागोजागी पाण्याची व्यवस्था करावी, झाडे असावीत, जेणेकरून दुपारच्या वेळेस झाडाच्या सावलीत बसतील. उन्हापासून त्यांचे संरक्षण होईल.

अर्धबंदिस्त प्रणाली

यामध्ये व्यापक व्यवस्थापनाचा समावेश असतो, परंतु सामान्यतः कुरणाच्या नियंत्रित चराईसह यामध्ये गोठ्यामध्ये चारा व्यवस्थापन, रात्रीचा निवारा आणि दररोज ३ ते ५ तास चरणे यांचा समावेश आहे. या पद्धतीत खाद्याचा खर्च काहीसा वाढतो.

या प्रणालीमध्ये शेळ्या,मेंढ्या दुपारच्या वेळी गोठ्यात येतात. त्यांच्या सोयीनुसार चरायला जातात.

बंदिस्त शेळीपालन

शेळ्या आणि मेंढ्या सतत मर्यादित प्रवेशासह बंदिवासात ठेवल्या जातात. गोठ्यामध्येच चारा खाण्यास दिला जातो. या व्यवस्थापन प्रणालीसाठी अधिक श्रम आणि खर्च वाढतो.

शेळ्या, मेंढ्यांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवावे लागते.

उंच मजल्यावरील शेड

हा गोठा बनविण्यासाठी सुरुवातीची गुंतवणूक जास्त आहे. लाकडी मजल्यावरील शेडमध्ये शेळ्या, मेंढ्यांचे व्यवस्थापन केले जाते. चारा उत्पादनासाठी कमी मजूर आणि जास्त सिंचनाची जमीन लागते.

गोठे सातत्याने स्वच्छ ठेवावे लागतात. गोठ्यामध्ये चारही दिशेने हवा येते. शेळ्या, मेंढ्यांचे आरोग्य चांगले राहते.

डॉ. मंगेश वैद्य, ९५४५४६८३५७, (पशू शरीरक्रियाशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com