Dairy Business : दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशींची निवड

Dairy Farming : आपण ज्या भागात दुग्ध व्यवसाय सुरू करणार आहात, तेथील स्थानिक परिस्थिती आणि वातावरण लक्षात घेऊनच संकरित गाय किंवा म्हशींची निवड करावी. व्यवसाय सुरू करण्याअगोदर जनावरांची काळजीपूर्वक निवड आणि खरेदी आवश्यक आहे.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्राजक्ता जाधव, डॉ. बालाजी हजारे

Selection of Cows and Buffalos for Dairy Business : पशुपालन करताना चांगल्या जातिवंत दुधाळ गाई, म्हशींची निवड करणे गरजेचे आहे. दूध देण्याची क्षमता ही त्याची माता आणि पिताच्या मातेच्या दूध देणाच्या आनुवंशिक गुणधर्मावर अवलंबून असते. जी जनावरे पूर्ण वेत काळात भरपूर दूध देतात, व्यायल्यानंतर जी योग्य कालावधीत गाभण राहतात, ज्यांचा भाकड काळ कमी आहे, ज्यांचे पहिले वेत कमी वयात झाले आहे, अशा जनावरांना आपण चांगली जनावरे म्हणतो. भरपूर दूध उत्पादन हा आनुवंशिक गुणधर्म आहे. जातिवंत जनावरांत तो हमखास आढळतो, म्हणून अधिक दुधासाठी जातिवंत दुधाळ जनावरांची निवड महत्त्वाची आहे.

आपण ज्या भागात दुग्ध व्यवसाय सुरू करणार आहात, त्या भागातील स्थानिक परिस्थिती आणि वातावरण लक्षात घेऊनच संकरित गाय किंवा म्हशींची निवड करावी. व्यवसाय सुरू करण्याअगोदर जनावरांची काळजीपूर्वक निवड आणि खरेदी आवश्यक आहे. जनावरे विशिष्ट वातावरणात कशी रुळतात आणि त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त दूध उत्पादन कसे मिळेल, हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे. कारण काही वेळा उत्तम व्यवस्थापन ठेवूनही दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरणार नाही.

दुग्ध व्यवसायासाठी होल्स्टिन फ्रिजियन, जर्सी या संकरित गाईंची निवड करावी. केवळ जास्त दूध देणाऱ्या जातींपेक्षा उत्तम वळूपासून तयार झालेली, जास्त दूध देणारी गाय निवडावी. यासाठी खरेदीपूर्वी वळूच्या वंशावळीतील नोंदीची तपासणी आवश्यक असते.

Dairy Business
Dairy Business : शून्यातून सुरू केलेल्या दुग्ध व्यवसायाची कोटींची भरारी!

दुधाळ जनावरांच्या निवडीचे मुद्दे

जनावरांच्या शरीररचनेच्या आधारे.

वंशावळीतील नोंदीच्या आधारे किंवा पूर्वजांच्या माहितीनुसार.

दुधाळ गाय, म्हैस निवडीसाठी गुणपत्रकाचे स्वरूप लक्षात घ्यावे. यासाठी पशुतज्ज्ञांची मदत घ्यावी.

शरीर रचनेचे मुद्दे :

दुधाळ जनावरांची निवड करण्यापूर्वी प्रथम पूर्वजांची माहिती किंवा वंशावळीतील नोंदीच्या आधारे माहिती करून घ्यावी. त्यामुळे वळूचा पूर्ण इतिहास माहिती होतो. त्याचबरोबर त्यांच्या मातापित्यांचे उत्पादन माहिती करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्या वळूपासून तयार झालेल्या दुधाळ गायीची निवड करावी.

दुधाळ जनावरांच्या निवडीकरिता शरीररचनेचे मुद्दे पडताळून योग्य निवड करावी. शक्यतो पहिल्या व दुसऱ्या वेताची गाय निवडावी.

गायीचे वय साडेतीन ते चार वर्षे इतके असावे. जास्त वय झालेली गाय निवडू नये. त्यासाठी पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.

गायीचे डोके मध्यम, कपाळ पुढे आलेले, चेहरा लांब आणि स्पष्ट असावा, जास्त मोठे डोके, चेहरा ओबड-धोबड, अरुंद कपाळ असलेली जनावरे निवडू नयेत.

गाय निवडताना तीच्या अंगावर जास्त चरबी नसावी. त्वचा मऊ, (तजेलदार)असावी. स्पर्श केला असता कातडी चरबी विरहित असावी.

मान सडपातळ लांब असावी, मानेवर किंवा इतर भागावर चरबी नसावी. मान ही डोके आणि शरीराच्या भागात समांतर जोडलेली असावी. छाती रुंद, भरदार असावी. पुढील पायांमध्ये छातीजवळ योग्य व भरपूर अंतर असावे.

खांदा बळकट, भरीव, शरीराला एकरूप असावा.

पाठ ही ऊर शिखरापासून ते पुच्छ शिखरापर्यंत सरळ रुंद व पाठीच्या कण्याला समांतर असावी.

बरगड्या बाकदार व अर्धगोलाकार असाव्यात.दुधाळ गाईमध्ये शेवटच्या तीन बरगड्या दिसतात. बरगड्या पातळ, लांब आणि चपट्या असाव्यात. पाठीमागील भाग त्रिकोणाकृती असावा. त्यासाठी वरच्या बाजूंनी, मागील बाजूंनी जनावरांचे निरीक्षण करावे.मागील भाग दिसायला ओबडधोबड, खरखरीत नसावा.

Dairy Business
Dairy Farming : ओंबळे कुटुंबाने विस्तारली दुग्ध व्यवसायाची परंपरा

डोळे रेखीव आणि तेजस्वी, पाणीदार असावेत.

मागील पायात कासेला सामावून घेण्यासाठी भरपूर अंतर असावे. पुढील पाय मजबूत, बळकट, सरळ असावेत. दोन्ही पायांमधील अंतर अधिक असावे.

पायाचे खूर समतोल, रुंद व सपाट असावेत. वाढलेल्या नख्या याबाबतीत बारकाईने चौकसपणे बघावे, गाय चालवून पाहावी.

दुधाळ गायीच्या निवडीसाठी गुणपत्रकाचे स्वरूप लक्षात घेऊन खरेदी करावे. यासाठी पशुतज्ञांचा सल्ला घ्यावा. पशुपालक गुणपत्रकांचा उपयोग निवडीसाठी करीत नाहीत, पण गुणपत्रकांचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. कारण त्यावरूनच गायी निवडताना शरीराच्या कुठल्या भागाला किती महत्त्व द्यावे हे लक्षात येईल. यामध्ये प्रामुख्याने दुधाळ गायीचे गुणधर्म, दूध उत्पादन संस्था याला अधिक महत्त्व दिले जाते. गुणपत्रकांच्या आधारे जनावरांची निवड भरविल्या जाणाऱ्या पशू मेळावा, पशुप्रदर्शनात केली जाते.

कासेची ठेवण

चांगली कास आणि सड हा दुग्धव्यवसायाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू समजला जातो. कासेची शरीराशी बांधणी घट्ट असावी. धार काढण्यापूर्वी दुधाने भरलेली कास आकाराने मोठी दिसते. सड फुगलेले दिसतात. दूध काढल्यानंतर कासेचा आकार पूर्ववत लहान होणारा असावा. त्वचा मऊ असावी.

कासेवर अनेक फाटे असणारे शिरांचे जाळे असावे. शिरा जाड असाव्यात.चारही सड सारख्या अंतरावर आणि सारख्या आकाराचे असावेत.

दूध देतानाच्या सवयी, पान्हावण्याच्या सवयी, दूध काढण्याची पध्दत, गाय मारकी किंवा खोडकर आहे काय, आदी गोष्टींची माहिती करून घ्यावी. ज्यावेळी गाईची दूध उत्पादन, प्रजननक्षमता आणि वंशावळीची माहिती खात्रीशीरपणे उपलब्ध होते, त्याचवेळी या माहितीच्या आधारे गाय विकत घेताना तिची निवड करावी.

डॉ. प्राजक्ता जाधव, ८७८८०९१६४४

(पशुअनुवंश व प्रजननशास्त्र विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com