Dairy Farming : सचोटी, प्रामाणिकता अन् एकीतून यशस्वी दुग्ध व्यवसाय

Success Story of Milk Farmer : धरणगुत्ती (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील रमेश लंगरे यांनी नोकरी सोडून दुग्ध व्यवसायात लक्ष घातले. व्यावसायिकता, सचोटी, प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा आदी गुणांतून पुढे गेलेल्या या व्यवसायातून आज आर्थिक समृद्धी प्राप्त करणे कुटुंबाला शक्य झाले आहे.
Langare Family
Langare FamilyAgrowon

Animal Husbandry and Dairy Business : कोल्हापूर जिल्ह्यात धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील रमेश लंगरे इचलकरंजी येथे कारखान्यामध्ये पर्यवक्षेक होते. सुमारे १८ वर्षे नोकरी केली. मात्र त्यातून अर्थकारण सक्षम होत नव्हते. घरचा दुग्ध व्यवसाय होता. दोन ते चार जनावरे होती. हाच व्यवसाय वाढवून त्यातून चांगली प्रगती करायची असे त्यांनी ठरवले. नोकरीचा राजीनामा दिला.

सुमारे चोवीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या व्यवसाय सातत्य, सचोटी, प्रामाणिकपणा व पारदर्शीपणा ठेवला. आज हा व्यवसाय सुमारे ५० जनावरांपर्यंत पोहोचला आहे. धरणगुत्ती येथील माळभागात लंगरे सहकुटुंब राहतात. तिथेच गोठा आहे. विशेष म्हणजे एकाही मजुराची मदत न घेता पत्नी सविता, मुलगा ओंकार व स्‍वप्नील यांच्या मदतीने हा व्यवसाय त्यांनी यशस्वी केला आहे.

...असे आहे गोठा व्यवस्थापन

बंदिस्त स्वरूपात असलेल्या या गोठ्याचे बांधकाम तीन भागांत आहे. म्हैसाणा, मुऱ्हा, पंढरपुरी अशा १६ व २६ एचएफ गायी आहेत. बाकी वासरे आहेत. व्यवसायाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतांश सर्व जनावरांची पैदास गोठ्यातच केली आहे. सकाळी साडेपाचच्या सुमारास कामांना सुरुवात होते.

गायीच्या दुधाच्या धारा यंत्राद्वारे तर म्हशीच्या दुधाच्या धारा हाताने काढल्या जातात. कोणतेही कामे ठरवून न घेता पडेल ते काम करण्याची तयारी संपूर्ण कुटुंबाची असते. त्यामुळे कोणतेही काम आडून राहात नाही. दोन ते तीन तासांच्या वरती परगावी जाणेदेखील अनेक वेळा शक्य होत नाही.

Langare Family
Dairy Farming Success Story : दूध व्यवसायात अग्रेसर ‘निमगाव वाघा’

चारा व्यवस्थापन

जनावरांना संतुलित व बारमाही चारा मिळावा यासाठी विविध चाऱ्यांची लागवड दोन एकरांत केली आहे. यात मका, हत्तीगवत आदींचा समावेश आहे. चाऱ्याची कुट्टी करणारे यंत्रही आहे. जनावरांची संख्या जास्त असल्याने अनेक वेळा चारा पुरेसा होत नाही. यामुळे तीन हजार रुपये प्रति टन दराने १५ कांड्यांवर असलेला ऊस शेतकऱ्यांकडून विकत घेण्यात येतो. महिन्याला सुमारे ९० पोती खाद्य लागते. थेट कंपनीतून ते विकत घेण्यात येते.

दररोज एक टन कुट्टीचा वापर होतो. यात ओली, सुकी वैरण मका, हत्तीगवत, ऊस आदी सर्वांचे मिश्रण असते. प्रति जनावराला दिवसाला २५ किलो कुट्टी देण्यात येते. यात गहू भुसा, गोळी पेंड आदींचाही समावेश असतो. सकाळी १२ ते १३ किलो व संध्याकाळी देखील तेवढाच असे चाऱ्याचे व्यवस्थापन केले जाते. वासरांना ‘काफ स्टार्टर’ तसेच पुरेशा प्रमाणात दूधही देण्यात येते.

संगोपनासाठी दिली वासरे

लंगरे यांनी जनावरे संगोपनाकडे केवळ व्यवसाय म्हणून न राहता सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. आपल्याकडील २५ जनावरे शेतकऱ्यांना विनाशुल्क दिली आहेत. ती परत घेतली जाणार नाहीत. या सेवाभावी वृत्तीमुळे काही तरुण शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी प्रेरणा मिळाली असल्याचे लंगरे यांनी सांगितले.

Langare Family
Dairy Farmer : दूध उत्पादकांचा आक्रोश दुर्लक्षित

वर्षभर दूध संकलनात सातत्य

जनावरांच्या नावानुसार गाभण तारीख, व्यायलेली तारीख आदी विविध नोंदी ठेवल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाकड काळ वाढून दूध संकलन कमी होऊ नये यासाठी भाकड जनावरे व दूध देणारी जनावरे यांचे वर्षभर संतुलन राखले जाते. गाय किंवा म्हैस व्यायल्यानंतर दूध देत असतानाच ठरावीक दिवसांनंतर येणारा माजाचा कालावधी लक्षात घेऊन कृत्रीम रेतन केले जाते.

शक्यतो तिसऱ्या माजाला रेतन करण्याचा प्रयत्न असतो. त्यातून जनावरांचा भाकड काळ कमी होऊन दूध पुरवठा व्यवस्थित राहतो. पंढरपुरी म्हैस दररोज ९ ते १० लिटर, कर्नाळी म्हैस १० ते १२ लिटर, म्हैसाणा म्हैस १२ ते १६- १८ लिटरपर्यंत, तर गाय १८ पासून ते २४, २६ लिटरपर्यंत दूध देते. दररोज गायीचे ३०० लिटर, तर म्हशीचे ८० लिटरपर्यंत दूध संकलित होते.

विक्री व्यवस्था व अर्थकारण

गोकुळ दूध संस्थेच्या मदतीने लंगरे यांनी जोतिर्लिंग सहकारी दूध संस्थेची स्थापन केली आहे. या संस्थेव्यतिरिक्त घरगुती रतिबासाठीही दुधाचा पुरवठा स्वतः लंगरे करतात. फॅटनुसार गायीच्या दुधाला प्रति लिटर ३८ ते ३९ रुपये, तर म्हशीच्या दुधाला ६५ ते ७० रुपयांपर्यंत दर मिळतो. दोन्ही पद्धतींच्या विक्रीमुळे नफ्यात वाढ करणे शक्य झाले आहे.

दर दहा दिवसांनी सुमारे दीड लाख रुपयांचे बिल निघते. सर्व खर्च वजा जाता ३० ते ४० टक्के नफा मिळतो. वर्षाला सुमारे १२५ ट्रॉली शेणखत मिळते. एक वर्षाआड स्वतःच्या शेतात वापरून दरवर्षी १०० ट्रॉली खताची तीन हजार रुपये प्रति ट्रॉली दराने विक्री होते.

लम्पी रोगापासून गोठा राहिला मुक्त

वर्षातून दोन वेळा वेळच्या वेळी लसीकरण होते. जनावरांच्या आरोग्यावर दररोज काटेकोर लक्ष दिले जाते. त्यामुळे ती आजारी पडण्याची संख्या कमी राहते. गोठ्याबरोबर परिसराची आरोग्य स्वच्छता व वेळोवेळी प्रतिबंधक उपचार यांना सर्वोच्च महत्त्व दिले आहे. त्यामुळे गोठा परिसरात डास किंवा अन्य कीटकांचे प्रमाण कमी राहते.

अलीकडील काळात शेतकऱ्यांना ‘लम्पी’ रोगाच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. लेंगरे यांच्या शेजारील अन्य शेतकऱ्यांची जनावरे लम्पीने बाधित झाली. पण आपल्या गोठ्यातील एकाही जनावराला बाधा न होता गोठा लम्पीमुक्‍त राहिल्याचे लंगरे अभिमानाने सांगतात.

रमेश लंगरे, ९५६११८५७४०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com