
Successful Dairy Farmer:
शेतकरी नियोजन । म्हैसपालन
शेतकरी : स्वप्नील शिंदे
गाव : धनेगाव, ता. जि. नांदेड
एकूण शेती : १५ एकर
मुऱ्हा म्हशी : १७
एकूण जनावरे : ४०
नांदेड शहराजवळील धनेगाव येथील स्वप्नील सचिन शिंदे यांनी मागील १० वर्षांपासून दुग्धव्यवसायात चांगलाच जम बसविला आहे. सध्या त्यांच्याकडे १७ दुधाळ म्हशी आहेत. यापासून दररोज १४० ते १५० लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळते. खासगी डेअरीला दूध विक्री केली जाते. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या स्वप्नील यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता दुग्धव्यवसायात यश मिळविले आहे.
स्वप्नील शिंदे यांचे एकत्रित कुटुंब आहे. त्यांची धनेगावनजीक १५ एकर शेती आहे. कुटुंबाचा पारंपरिक दुग्धव्यवसाय होता. त्यास स्वप्नील शिंदे यांनी व्यावसायिक स्वरूप देण्याचे ठरविले. २०१० मध्ये त्यांनी तीन मुऱ्हा म्हशी घेऊन दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली. त्यासाठी नांदेडसह राज्यातील प्रमुख जनावरांच्या बाजारांना भेटी दिल्या.
त्यातून दरवर्षी हळूहळू दुधाळ म्हशी खरेदी करत गेले. आज गोठ्यामध्ये एकूण ४० म्हशींचे संगोपन ते करत आहेत. म्हशींच्या संगोपनासाठी ५० फूट बाय ४० फूट आकाराचा गोठा उभारला आहे. गोठ्यामध्ये चारा म्हशींना चारा खाण्यासाठी गव्हाण तयार केल्या आहेत. गोठ्या शेजारी कडबा कुट्टी मशिन व जनावरांचा खुराक ठेवण्यासाठी स्वतंत्र शेडची उभारणी केली आहे.
दैनंदिन कामकाज
गोठ्यातील कामांस दररोज पहाटे पाच वाजता सुरुवात होते. दुधाळ म्हशींना गोठ्यात बांधले जाते. तर उर्वरित जनावरे इतर ठिकाणी बांधली जातात.
प्रथम गोठ्यातील शेण काढून गोठा स्वच्छ केला जातो. त्यानंतर दूध काढणी होते. यासाठी दोन मजूर ठेवले आहेत.
दूध काढणी पूर्ण झाल्यानंतर म्हशींना हिरवा आणि वाळलेला चारा दिला जातो. त्यानंतर जागेवरच पिण्याचे पाणी दिले जाते.
दुपारी जनावरे गोठ्याबाहेर काढून गोठा पाण्याने धुतला जातो.
पुन्हा सायंकाळी पाच वाजता शेण काढणी, दूध काढणी आणि चारा देण्याचे काम केले जाते.
आरोग्य व्यवस्थापन
लाळ्या खुरकूत, लम्पी त्वचा आजार, घटसर्प यांचे नियमित लसीकरण पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून केले जाते. लहान वासरांना जंतनाशकांच्या मात्रा दिल्या जातात. दुभत्या जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. गाभण जनावरांचे स्वतंत्र संगोपन केले जाते.
चारा पिकांची लागवड
दुधाळ जनावरांसह इतर जनावरांना दर्जेदार चारा उपलब्ध होण्यासाठी ४ एकरांमध्ये चारा पिकांची लागवड केली आहे. त्यात दोन एकरावर नेपिअर गवत, एक एकर मका, तर एका एकरांत कडवळ आहे. नेपिअर गवताची टप्प्याटप्प्याने लागवड केली जाते. जेणेकरून जनावरांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होईल, असे नियोजन असते.
दूध उत्पादन
सध्या गोठ्यात १८ दुधाळ म्हशी आहेत. त्यापासून एका वेळी ७५ लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळते. दोन वेळचे मिळून सुमारे १५० लिटर दूध प्रतिदिन संकलित होते. उत्पादित दुधाची नांदेड शहरातील खासगी दूध डेअरीला विक्री केली जाते. स्वप्नील शिंदे स्वत: दुचाकीवरून नांदेडमधील दूध डेअरीवर दूध नेऊन देतात. दूध विक्रीमधून चांगले आर्थिक उत्पन्न दर महिन्याला मिळते. या पैशांचा वापर खाद्य खरेदी, मजूर, खुराक,
वैद्यकीय उपचार आदींवर केल्यानंतर हातात चांगले पैसे शिल्लक राहतात, असे स्वप्नील सांगतात. या सोबतच गोठ्यातून दरवर्षी सुमारे ३० ते ३५ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. या शेणखताचा घरच्या शेतीमध्ये वापर केला जातो. शिल्लक शेणखताची विक्री केली जाते. शेतामध्ये शेणखताचा वापर केल्यामुळे रासायनिक खतांवरील खर्चात बचत होऊन जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत झाली आहे.
गावरान कोंबड्यांचेही संगोपन
स्वप्नील शिंदे यांनी दुग्ध व्यवसायाला गावरान कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. शेतामध्येच गावरान कोंबड्या पाळल्या आहेत. त्यात काही इतर सुधारित जातींच्या कोंबड्या देखील आहेत. कोंबडीपालनामुळे गोठ्याचा परिसर स्वच्छ राहण्यास मदत होते. शिवाय अंडी उत्पादनातून आर्थिक साहाय्य मिळत असल्याचे, श्री. शिंदे सांगतात.
खाद्य नियोजन
दुधाळ जनावरांना हिरवा व वाळलेला चारा नियमितपणे वेळेवर दिला जातो. सोबतच खुराकही दिला जातो. त्यामुळे जनावरांच्या दुधाच्या उत्पादनात सातत्य टिकवून ठेवण्यात मदत झाली आहे.
हिरव्या चाऱ्यासोबत सुका चारा देखील दिला जातो. त्यात कडबा, सोयाबीन भुस्सा, तूर भुसकट, गहू, हरभऱ्याचे कुटार यांचा समावेश असतो. हे सर्व सुके खाद्य जमा करून साठवून ठेवले जाते. आणि वर्षभर खाद्यामध्ये जनावरांना दिला जातो.
दूध उत्पादन देणाऱ्या म्हशींना दररोज दोन वेळा हिरवा चारा, सुका चारा असे एकूण वीस किलो प्रमाणे खाद्य दिले जाते. सोबतच दुधाळ जनावरांना सरकी पेंड दिली जाते. यात सकाळी तीन किलो व सायंकाळी तीन किलो अशी एकूण सहा किलो सरकी पेंड दररोज दिली जाते.
आहारात वेळोवेळी खनिज मिश्रणे, पोषक घटकांचा समावेश केला जातो. त्यामुळे दूध उत्पादनात सातत्य राखणे शक्य होते, असे स्वप्नील यांनी सांगितले.
स्वप्नील शिंदे, ९५२७०९७६९८
(शब्दांकन : कृष्णा जोमेगावकर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.