Dairy Farming : 'लक्ष्मी'मुळे दुग्ध व्यवसायात भरारी

Dairy Business : आजमितीला सुमारे २२ गायी व तीनशे लिटरपर्यंत रोजचे दूधसंकलन इथपर्यंत मजल मारली. ज्या लक्ष्मीच्या पावलांनी घरी समृद्धी आली, तिची बंगल्याच्या छतावर देखणी प्रतिकृती साकारून त्याप्रति प्रेम व कृतज्ञताही कुटुंबाने व्यक्त केली आहे.
Dairy Business
Dairy Farming Agrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात धामणगाव आवारी गाव आहे. येथील अमोल बबन आवारी या ३२ वर्षीय युवकाची पाच एकर शेती आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने मोठ्या उमेदीने शेतीला सुरुवात केली.

जिरायती शेती असल्याने उत्पन्नावर मर्यादा होत्या. पाण्याची शाश्‍वत सुविधा उपलब्ध केल्याशिवाय म्हणजेच शेती बागायती केल्याशिवाय व त्यास पूरक व्यवसायाची जोड दिल्याशिवाय आर्थिक प्रगती होणार नाही हे त्याला उमगले. त्यानुसार सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.

दुग्ध व्यवसायाची धरली कास

सन २०१५ -२०१६ च्या दरम्यान अमोल यांनी अकोले येथील बाजारातून सातहजार रुपयांना एचएफ या संकरित जातीची सहा महिने वयाची कालवड घेतली. मेहनत आणि चिकाटीतून दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. लक्ष्मी असे या गायीचे नामकरण केले. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे गायीचा सांभाळ हे आवारी कुटुंब करायचे.

ही गाय दिवसाला २३ ते २४ लिटर दूध द्यायची. हळूहळू या गाईपासून गोठ्यात गोऱ्हे-कालवडींची संख्या वाढू लागली. व्यवस्थापनातही कुठे कुचराई ठेवली नाही. त्यामुळेच आज इतक्या वर्षांच्या कालावधीत लहान-मोठ्या मिळून गायींची संख्या २० ते २२ पर्यंत नेण्यात अमोल यशस्वी झाले आहेत.

Dairy Business
Dairy Farming: दूध उत्पादन वाढवा, पण पर्यावरण सांभाळा; शाश्वत पशुपालनाचा मंत्र!

गोठ्यातील कामांसाठी एकही मजूर ठेवलेला नाही. अमोलसह वडील बबन, आई नंदा, पत्नी सुवर्णा असे कुटुंबातील सर्व सदस्य गोठ्यात राबतात. दररोज पहाटे पाच वाजता कुटुंबाचा दिवस सुरू होतो. पहिल्या सत्रात सकाळी आठपर्यंत चारा, पाणी, दूध काढणी, गोठा स्वच्छता अशी कामे चालतात. सायंकाळचे सत्र याच पद्धतीने संध्याकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत सुरू राहते. चाऱ्यामध्ये गव्हाचा भुस्सा, मुरघास, मका यांचा वापर होतो. कॅल्शिअम, मिनरल मिक्शर, स्वच्छ पाणी देण्यात येते. दर चार महिन्यांनी लसीकरण केले जाते.

गायीने आणली समृद्धी

सध्या दररोजचे दूध संकलन ३०० लिटरच्या दरम्यान आहे. काही वेळा ते ३२५ लिटरपर्यंतही पोहोचते. गावात वृंदावन दूध संकलन केंद्राला त्याचा पुरवठा होतो. ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणवत्तेच्या दुधाला ३२ ते ३३ रुपये प्रति लिटर दर मिळतो. व्यवसायातून महिन्याला ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. याच व्यवसायाने म्हणण्यापेक्षा लक्ष्मी गायीच्या रूपानेच आमच्या घरी समृद्धी आली, तिच्या दुधावरच आमचे कुटुंब पोसले गेले असे अमोल सांगतात. आज ही गाय थकली असली तरी आवारी कुटुंबाचा ती महत्त्वाचा घटक आहे.

घरातील सर्वांचा तिच्यावर खूप जीव जडला आहे. तिच्यावरील प्रेमाची साक्ष म्हणून किंवा तिच्या प्रति कृतज्ञता म्हणून अलीकडेच बांधलेल्या बंगल्याच्या छतावर आवारी कुटुंबाने तिची देखणी, मोठी प्रतिकृती उभी केली आहे. दररोज सकाळी नित्यनेमाने अमोल या गायीचे पूजन करतात.

परिसरातील लोकांसाठी उत्सुकतेचा व आकर्षणाचा विषय ठरलेली ही प्रतिकृती पाहण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने येथे येत आहेत. गावकऱ्यांसाठी देखील हा अभिमानाचा विषय झाला आहे. गावातील सामाजिक कार्यकर्ते गणेश आवारी म्हणतात की लक्ष्मी गाय हा या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधार झाला. तिची उभारलेली प्रतिकृती म्हणजे श्रद्धा, प्रेम आणि कष्टाचं जिवंत प्रतीक आहे.

Dairy Business
Dairy Farming: गोपालनात आहार, आरोग्य, गोठा व्यवस्थापनावर भर

समस्या भरपूर, तरीही प्रगतीचे प्रयत्न

धामणगाव आवारी हे जेमतेम १५०० लोकसंख्येचे गाव आहे. येथे शेती व त्यास जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. शेतीचे उत्पन्न मर्यादित असल्याने गावातील काही तरुण अन्यत्र नोकरी- व्यवसायासाठी शहरात स्थलांतरित झाले. मात्र काही तरुण असेही होते की त्यांनी जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी शेती विकासाला प्राधान्य दिले. बँक, पतसंस्था यांच्याकडून कर्ज घेऊन विहीर व कालव्यातून पाइपलाइन करून शेतापर्यंत पाणी आणले.

जिरायती शेती बागायती केली. या शेतकऱ्यांना एक दोन ते पाच एकर शेती. तीही खडकाळ. विहिरीला पाचपेक्षा अधिक परस खोदल्यावर थोडे तर दहा परस खोदल्यावर अजून पाणी येते. तरीही पाणी कमीच पडते. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांसाठी शेती करणे म्हणजे अग्निपरीक्षाच असते.

निळवंडे जलाशयातून ३२ गाव पाणी पुरवठा योजना करण्यात आली. मात्र अद्याप पाणी मिळालेले नाही. मात्र उच्चस्तरीय कालवा योजनेतून गावात आता पाणी पोचले आहे. पाण्याव्यतिरिक्त इथल्या शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी आहेत.

यात मालाच्या दरांबाबतची अस्थिरता, तंत्रज्ञानाची कमतरता, सिंचन योजना, वन्य प्राण्यांचा हल्ला, आरोग्य आदींचा समावेश आहे. अशा प्रतिकूलतेतही अमोल आवारीसारख्या तरूणांनी जिगर दाखवत आपली शेती प्रगतिपथावर नेली आहे.

...अशी झाली प्रगती

गाईंसाठी शेड बांधले आहे. शिवाय मुक्तसंचार पद्धतीचाही वापर केला आहे. शेती बागायती केल्यानंतर मका, हरभरा, कांदे अशी पिके घेतली जायची. आता संपूर्ण पाच एकर क्षेत्रावर मका, संकरित नेपियर, मेथीघास आदींची लागवड केली आहे. अमोल सांगतात, की पूर्वी शेती हे उत्पन्नाचे मुख्य व दुग्ध व्यवसाय हे दुय्यम साधन होते.

आता हीच परिस्थिती उलटी झाली आहे. माझ्याकडे दिवसाला ३० लिटरपेक्षाही दूध देणाऱ्या गायी आहेत. याच व्यवसायातून बंगला बांधला. एका ठिकाणी विहीर खोदली. पाइपलाइन करून शेती बागायती केली. आज घरातील सर्व खर्चाचा आधार हाच दुग्ध व्यवसाय आहे. भविष्यात गायींची संख्या वाढवून व्यवसायाचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे.

अमोल आवारी ९६५७४९८६०४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com