Dairy Farming: मुक्तसंचार गोठ्यास पारदर्शक छत ठरेल फायद्याचे...

Barn for Animals: गोठ्याचे छत अल्प खर्चीक, पारदर्शक, प्लॅस्टिक - फायबर साहित्याचा वापर करून उभारणे शक्य आहे. या छतामुळे वर्षभर गोठा कोरडा राहतो, रोगजंतू मुक्त होतो, कासदाह- गर्भाशय दाह संपतो आणि प्रजननाची गती वाढते, परिणामी दुधाळ जनावरांच्याकडून सर्वोच्च फायदा दिसून येतो.
Animal Barn
Animal BarnAgrowon
Published on
Updated on

डॉ. नितीन मार्कंडेय

Livestock Care: गोठ्याचे छत अल्प खर्चीक, पारदर्शक, प्लॅस्टिक - फायबर साहित्याचा वापर करून उभारणे शक्य आहे. या छतामुळे वर्षभर गोठा कोरडा राहतो, रोगजंतू मुक्त होतो, कासदाह- गर्भाशय दाह संपतो आणि प्रजननाची गती वाढते, परिणामी दुधाळ जनावरांच्याकडून सर्वोच्च फायदा दिसून येतो.

पशुधनाचा निवारा हा मोठा व्यवस्थापनातील सुरक्षित सांभाळाचा भाग असतो. चांगल्या आणि शास्त्रीय व्यवस्थापनात व्यावसायिक पशुपालनात गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, वराह, श्‍वान असा अनेक पाळीव प्राण्यांना सांभाळताना मजबूत, शाश्‍वत, आरामदायी निवारा हाच विचार नेहमी केला जातो. निवारा असल्यामुळे ऋतुवत सांभाळ सोईस्कर होतो, पशुधनास आराम मिळतो, पशूंची अधिक उत्पादनशीलता वाढते आणि सुरक्षितता पुरविता येते.

पूर्वी पशुधनाचा गोठा पारंपरिक पद्धतीने उभारताना लाकडी गोल, लाकडी पट्ट्या, बांबूच्या तट्या, गवताचा पेंढा, मोठी पाने अशा नैसर्गिक साधनांचा चांगला उपयोग करून घेतला जायचा. घरच्या गोठ्यात प्रवेश करण्याची सोय कमी उंचीची असायची, बरेचदा अंधार असायचा, कमी जागा उपलब्ध असायची, वीज आणि आगीपासूनचा धोका असायचा, मात्र तो पावसाळ्या पुरता अतिशय उपयुक्त वापरासाठी असायचा.

कालांतराने पशुधन संख्या वाढत जाताना मोठे आणि प्रशस्त गोठे निर्माण करण्याची संकल्पना पुढे आली. प्रचंड मोठे गोठे, लोखंडी पत्र्यांचे छत, सर्वत्र काँक्रीट कोबा, सिमेंटच्या गव्हाणी, आधाराचे जाड लोखंडी पाइप असा थाटमाट खर्च किती जास्त करता येतो यासाठीच करण्यात आला. दूध व्यवसायिकांच्या मनातला श्रीमंत गोठा उभारताना क्वचितच दूध देणाऱ्या गाईच्या गरजा विचारात घेतल्या गेल्या. असे सर्व गोठे आज बंद झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी कर्जपुरवठा घेऊन उभ्या राहिलेल्या बँका बुडाल्या आहेत.

Animal Barn
Animal Health Management : संसर्गजन्य आजारापासून जनावरांचे संरक्षण

मुक्त संचार गोठा

इस्राईल तंत्रज्ञान आणि पंजाब पद्धतीमुळे गोठ्याची उंची अधिक करण्याची शिफारस स्वीकारली गेल्यामुळे लोखंडी सांगाड्याचे उंच गोठे उभारण्यात आले. याचबरोबर गोठ्याच्या बाजूला चहूबाजूंस मुक्त संचार क्षेत्र असण्यासाठी विस्तीर्ण जागा ठेवण्यास सुरुवात झाली. दिवसा मुक्त संचार जागेत आणि रात्री छताखालील गोठ्यात पशुधन सांभाळ केला गेला. पशुधनाच्या गोठ्याला बाजूच्या भिंतींची गरज नसते याचे महत्त्व पटू लागले. फरशी, सिमेंट, कोबा, दगड, जाळीदार चटया याचे तोटे समोर आले. मुक्त संचार पद्धतीचे फायदे दृढ झाले सर्व दूर पसरले.

मुक्त संचार पद्धतीत दुधाळ जनावरांचा रवंथ करण्याचा आराम महत्त्वाचा असतो. पावसाळ्यात ही जागा कोरडी असणे अशक्य ठरते. अधिक पावसाच्या प्रदेशात म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात चार ते पाच महिने पाऊस मुक्त संचारासाठी अडचणीचा दिसून आला. दूध व्यवसायासाठी सर्वच भागात अवकाळी येणारा अधिक प्रमाणाचा पाऊस नेहमी त्रासदायक ठरला. सामान्य शिफारशीमध्ये अशा अडचणीच्या वेळी जाड कागद, फ्लेक्स तुकडे, पोते, पुठ्ठे, जुना कपडा यांचा वापर करून पशुधन शक्यतो कोरड्या जागेवर बसेल अशा शिफारशी करण्यात आल्या.

गोठ्याची नवीन रचना

दूध व्यवसायिकांच्या गोठ्याचे दोन शत्रू म्हणजे कासदाह आणि गर्भाशय दाह. दूध आणि वासरू देणाऱ्या उगमस्थानात जंतुसंसर्ग झाला की दिवसेंदिवस तोटा वाढत जाऊन गोठा बंद करायची वेळ अनेक आणि अनुभवली. योग्य निदानास विलंब, निदान सोईंची अनुपलब्धता, व्यावसायिकांचा सजगपणा अशा अनेक कारणांमुळे दूध उत्पादनात निर्माण झाल्या. तज्ञ उपचार अति खर्चाचे आणि कधीतरी यशस्वी होणारे दिसून आले, यातून पुन्हा व्यवस्थापनातच सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली.

गरज ही शोधाची जननी असल्यामुळे ज्यांचा गोठा, त्यांनाच अडचणींची कळ असल्यामुळे अनेक सुधारणा होत गेल्या. सातारा जिल्ह्यात शंभर उच्च दूध देणाऱ्या गाईंच्या गोठ्यात कासदाह आणि गर्भाशय दाह यांचे प्रमाण ७० टक्क्यांहून प्रत्येकी अधिक असल्यामुळे एका दूध व्यावसायिकाने ‘ U ’आकारातील गोठ्यातील मुक्त संचाराच्या अंतर्गत जागेत केवळ पारदर्शक प्लॅस्टिक छताने झाकला आणि वर्षभर कोरडा ठेवला. यातून कासदाह आणि गर्भाशयदाहाचे प्रमाण केवळ दहा टक्के एवढे कमी झाले. अर्थात, उत्पन्नात दसपट सुधारणा झाली.

Animal Barn
Animal Health : जनावरांमधील खूर वाढीची समस्या

नवीन गोठा सुधारण्याच्या पद्धतीत मुक्त संचार पद्धतीसाठी असणारी जागा आच्छादित करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. साधारणपणे एका गाईस शंभर ते दीडशे चौरस फूट एवढी जागा मुक्त संचार करण्यास लागते. जसजशी संख्या अधिक तसतशी मुक्त संचार जागा कमी ठेवण्यास सोय होते, कारण किमान ५० टक्के पशुधन मुक्त संचार जागेत दिवसाच्या कोणत्याही वेळी बसलेले असते. मुक्त संचाराची जागा आच्छादित करण्यासाठी कमी खर्च येतो. आच्छादित जागेमुळे गोठा कोरडा राहतो, दुधाळ पशुधन आरामात शेणाच्या गादीवर रवंथ करत बसून राहते.

गाईच्या गरजा जसजशा विचारात घेतल्या गेल्या तसतशी गोठा रचनेत आणि सुविधेत सुधारणा झाली. मुक्त संचार गोठ्याची जागा बागेत असलेल्या मंडपाप्रमाणे योग्य आधाराचे लोखंडी अँगल्स आणि छताच्या ठिकाणी बारीक आधाराची तार अशा प्रकारे निर्माण करून त्यावर पारदर्शक प्लॅस्टिक झाकल्यास आच्छादन तयार करता येते. आच्छादन पारदर्शक असल्यामुळे सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी अधिक फायदा होतो. पावसाळा संपताच असे प्लॅस्टिक आच्छादन योग्य प्रकारे गुंडाळून ठेवता येते.

मुक्त संचार पद्धतीच्या जागेसाठी आच्छादनाचा विचार करताना मंडपाचा आधार कमी खर्चीक पद्धतीने म्हणजे लहान जाडीचे लोखंडी अँगल, फायबरच्या काठ्या किंवा बांबू यातून साकारता येतो. छतासाठी आधार असणारी लोखंडी तार अगदी बारीक आकारात असली तरी तिला दिलेला योग्य ताण आच्छादन साहित्याचे वजन पेलू शकते आणि आच्छादनास धरून ठेवू शकते. याच प्रकारात स्वयंचलित यंत्रणेद्वारे मंडपाचे आच्छादन आपोआप गुंडाळले जाणे अथवा प्रसंगी अंथरले जाणे अशी व्यवस्था सहज करता येते.

पाण्याचा अजिबात परिणाम होणार नसणाऱ्या साहित्याचा उपयोग आच्छादनासाठी केला गेल्यास अशा आच्छादनामुळे छतावर पडलेल्या पावसाचे योग्य प्रकारे वहन होऊन त्याचा उपयोग जमिनीतील पाणी पुनर्भरणासाठी होतो. अशा प्रकारच्या आच्छादनासाठी चार ते सहा मिलिमीटर एवढ्याच जाडीचा पडदा वापरता येतो आणि आपल्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे त्यात अधिक मजबूत आणि उपयुक्त प्रकारचे साहित्य उपयोगात आणता येते. छताचा परिपूर्ण विचार केल्यावर मुक्त संचार पद्धतीच्या मंडपास तीनही बाजूंनी तीन फूट उंच आकाराची लांब पट्टी छतापासून जमिनीकडे लावल्यास तिरपा येणारा पाऊस थांबवता येईल आणि अधिकचा मुक्त संचार पद्धतीची जागा कोरडी ठेवता येईल.

मुक्त संचार पद्धतीत असणारी पशुधनाच्या हालचालीसाठी खुली असणारी जागा पारदर्शक आच्छादनातून झाकली गेल्यास वर्षभर जनावरे स्वच्छंदपणे फिरू शकतील आणि आपले प्रकृतीमान सुदृढ राखत शरीरातील असणारी रोगप्रतिकारक्षमता वाढवून रोगजंतूंचा प्रतिबंध करतील.

उत्पादक पशुधनाच्या सुधारित निवाऱ्याचा अभ्यास करताना हुरीकेन व्हेंटिलेटर म्हणजे छतावरचे पंखे अशी सोय उपलब्ध असल्यामुळे गोठ्याचा मुख्य भाग सुद्धा लोखंडी अथवा सिमेंट पत्रांचा खर्च टाळून केवळ पारदर्शक प्लॅस्टिक, फायबर, ताडपत्री, पॉलिएस्टर सारख्या आच्छादनातून अत्यंत कमी खर्चात झाकता येणे आणि छत म्हणून वापरणे शक्य आहे. म्हणजे फक्त धुम्मस केलेली जमीन, गोठ्याचा लोखंडी सांगाडा आणि त्यावर पारदर्शक छत असे आधुनिक गोठे उभारण्यासाठी अत्यंत कमी खर्च आणि पशुधनाची गरज यांचाच विचार करावा.

नवीन उभारल्या जाणाऱ्या इमारतीत वाहनतळ, सज्जा, व्हरांडा याचे छत पॉली कार्बोनेट ॲक्रॅलिक प्लॅस्टिक शीट वापरूनच विविध रंगांचे बनवले जाते. अनेक रेस्टॉरंट आणि उपाहारगृहांचा बाजूचा परिसर गुंडाळता येणाऱ्या आकर्षक छतांनी आच्छादित करून ग्राहकांना बसण्याची सोय केली जाते. अशा नवीन सर्व पद्धतींचा अभ्यास अनेक प्रकारे मुक्त संचार पद्धतीच्या गोठ्यासाठी सहज करता येतो, मात्र पशुधनाचा गोठा कौशल्य पूर्वक उभारावा आणि त्यासाठी जनावरांच्या गरजांचा विचार व्हावा अशा अभियंत्यांची देशाला गरज आहे.

आच्छादनाचे प्रकार

मुक्त संचार पद्धतीच्या आच्छादनासाठी दोन प्रकार निवडता येतात. पहिल्या प्रकारात वर्षभर नेहमी करता वापरता येणारे आच्छादन निर्माण करणारे पत्र्याच्या आकाराचे तुकडे, पुठ्ठे किंवा पत्रे आणि दुसऱ्या प्रकारात पावसाळ्या पुरते आच्छादित करून वेळोवेळी गुंडाळता येणाऱ्या बाबींचा वापर. केवळ पारदर्शकच असणारे पातळ प्लॅस्टिक, पांढरी फायबर /प्लॅस्टिक ताडपत्री, मॉड्युलर पी व्ही सी आच्छादन, पॉली कार्बोनेट पडदा किंवा पॉलिएस्टर प्रकारची पट्टी वापरता येणे शक्य आहे. सध्या बाजारात अशा अनेक प्रकारच्या साहित्याची मोठी उपलब्धता आहे. महत्त्वाची बाब अशी, की प्रसंगी वारा अथवा अपघाती कारणांमुळे अशा प्रकारचे पारदर्शक आच्छादन फाटले गेले तर त्यास जोडणे, शिवणे, चिटकवणे अशा अनेक बाबी सहज शक्य आहेत.

- डॉ. नितीन मार्कंडेय ९४२२६५७२५१

(लेखक पशुतज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com