Summer Crop Management: उन्हाळ्यात पिकांसाठी करा योग्य आच्छादन

Mulching for Farming: उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असताना पिकांना सिंचन करणे अनेक शेतकऱ्यांना शक्य होत नाही. अशा स्थितीत पिकाचे उत्पादन घटते. हे टाळण्यासाठी विविध प्रकारच्या आच्छादनाचा वापर करणे गरजेचे आहे. आच्छादनामुळे जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासोबतच तणांच्या वाढीला अटकाव केला जातो.
Summer Crop
Summer CropAgrowon
Published on
Updated on

डॉ. विशाल गमे

Summer Farming Technique: पिकांच्या वाढीसाठी माती आणि त्यातील ओलावा या दोन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जमिनी सतत सूर्यप्रकाशामध्ये राहिल्यास मातीतील ओलाव्याचे अधिक दराने बाष्पीभवन होते. पर्यायाने पिकांच्या वाढीसाठी सिंचनाचे प्रमाण वाढवावे लागते. मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये मुळात पाण्याची कमतरता असताना सिंचन देणे अनेक शेतकऱ्यांना शक्य होत नाही. अशा स्थितीत पिकाचे उत्पादन घटते.

हे टाळण्यासाठी विविध प्रकारच्या आच्छादनाचा वापर करणे गरजेचे आहे. जमिनीवर विविध प्रकारच्या पदार्थांचा वापर करून जमीन झाकणे, याला आच्छादन (मल्चिंग) असे म्हणतात. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासोबतच तणांच्या वाढीला अटकाव केला जातो. सावली आणि ओलावा मिळाल्याने जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या वाढते. ते अधिक क्रियाशील राहिल्याने पिकांना आवश्यक ती अन्नद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते.

Summer Crop
Summer Farming : उन्हाळी बाजरी, तीळ लागवडीचे नियोजन

आच्छादनाचे विविध प्रकार

सेंद्रिय आच्छादन

गवत व पेंढा : गवते किंवा त्याचा पेंढा जमिनीवर पिकाच्या दोन ओळीमध्ये, फळबागेमध्ये झाडांच्या भोवती पसरला जातो.

कंपोस्ट : कंपोस्ट खते देताना ती जमिनीवर पसरून आच्छादन होईल, अशा प्रकारे द्यावीत. होतेच परंतु त्याचबरोबर मातीची सुपीकता व रचना सुधारण्यास मदत होते.

लाकडाचा भुसा व साल : लाकडाचा भुस्सा व साली या सावकाश कुजतात. त्यांचा वापर आच्छादनासाठी केल्यास मातीचे भौतिक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.

गवताचे तुकडे : वाळलेल्या गवताच्या तुकड्यांमुळे आच्छादन तयार होते. हे पदार्थ वेगाने कुजतात. त्यातून जमिनीत सेंद्रिय पदार्थांची वाढ होते.

झाडाचा पालापाचोळा : फळबागेमध्ये होत असलेली पानगळ किंवा अन्य झाडांची वाळलेली पाने, पालापाचोळा जमिनीवर विखरून टाकल्यास त्याचे आच्छादन होते.

असेंद्रिय किंवा अजैविक आच्छादन

आच्छादनामध्ये विविध खडक, प्लॅस्टिक पेपर, रबर फॅब्रिकपासून बनलेल्या पदार्थांचा वापर केला जातो. हे असेंद्रिय पदार्थ लवकर कुजत नाहीत. त्यामुळे वारंवार बदलण्याची गरज भासत नाही. अलीकडे अजैविक आच्छादनामध्ये प्लॅस्टिक पॉलिथिन पेपरचा वापर वाढत आहे. यामध्ये विविध रंग, जाडीचे पॉलिथिन शीट उपलब्ध होत आहेत.

पारदर्शक पॉलिथिन पेपर : पारदर्शक पेपरमुळे बियाण्यांची उगवण क्षमता चांगली होते. रोगमुक्त रोपवाटिकांसाठी उपयोगी पडते. पारदर्शक पेपर मुळे सूर्यप्रकाश आरपार जाऊन तणांची वाढ होते. हे टाळण्यासाठी पेपर पसरविण्याआधी जमिनीवर योग्य त्या तणनाशकाची फवारणी करणे अनिवार्य ठरते.

काळा पॉलिथिन पेपर : दोन्ही बाजूने काळा आच्छादन पेपर जमिनीवर अंथरल्यास जमिनीवर सूर्यप्रकाश पोहचत नाही. प्रकाश संश्लेषण क्रियेअभावी तणांची वाढ होत नाही. या प्रकारच्या पेपरमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. मातीचे तापमान वाढत असल्याने हानिकारक सूक्ष्मजीवांचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते.

दुहेरी रंगाचा पॉलिथिन पेपर : दुहेरी रंगांच्या प्लास्टिक पॉलिथिन पेपरची रचना ही प्रामुख्याने विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश शोषून घेण्यासाठी व त्याचवेळी विशिष्ट तरंगलांबीचा प्रकाश परावर्तित करण्यासाठी केलेली असते. त्याचा फायदा पिकांच्या वाढीसाठी व फळांच्या गुणवत्तावाढीसाठी होतो.

Summer Crop
Summer Farming : उन्‍हाळी शेतीकडे वाढता कल

आच्छादनाचे फायदे

पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची भरपूर बचत होते.

जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.

जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.

आच्छादनाचा वापरामुळे तणांचे यशस्वी नियंत्रण होते.

जमिनीचे तापमान व आर्द्रता नियंत्रित राहिल्यामुळे अन्नधान्याची व फळांची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.

जमिनीत किडींच्या वाढीस प्रतिबंध केला जातो.

पिकांच्या उत्पादनवाढी सोबतच गुणवत्ता देखील चांगली राहते.

मुळांची वाढ चांगली होते.

मातीची धूप कमी होण्यास मदत होते.

जमिनीच्या निर्जंतुकीकरणास मदत होते.

सेंद्रिय आच्छादनामुळे मातीला व पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म जिवांची वाढ होते.

आच्छादनाची निवड करताना घ्यावयाची काळजी

विविध पिकांना वेगवेगळे प्रकारचे उपलब्धतेनुसार आच्छादन करणे गरजेचे आहे.

भाजीपाला व फळपिकांसाठी पॉलिथिन पेपरचे आच्छादन करताना रंग, जाडी यांची निवड शिफारशीप्रमाणे आणि शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवाप्रमाणे करावी.

सेंद्रिय आच्छादनाची निवड करताना त्यात वाळवीसारख्या घटकांची वाढ होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. त्यात किडीच्या सुप्तावस्थांना आश्रय मिळू शकतो.

फळपिकांसाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या आच्छादनाची निवड करावी.

डॉ. विशाल नवनाथ गमे, ९४०३९२९६१७

(सहाय्यक प्राध्यापक, कृषिविद्या विभाग, मराठा विद्या प्रसारक समाज, कर्मयोगी दु. सि. पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com