Animal Health : जनावरांमधील खूर वाढीची समस्या

Hoof Disease : खुरांच्या जास्त वाढीमुळे जनावर अडखळते. त्यामुळे वेदना होतात. आरोग्य बिघडते, दूध उत्पादन कमी होते. हे लक्षात घेऊन तज्ञ पशुवैद्यकाकडून योग्य पद्धतीने जनावराचे वाढलेले खूर योग्य प्रमाणात घासले पाहिजेत.
Hoof Disease
Hoof DiseaseAgrowon
Published on
Updated on

डॉ. सचिन राऊत, डॉ. गजेंद्र खांडेकर

Livestock Management : जनावरांमध्ये खुरांची वाढ ही एक सतत, नैसर्गिक प्रक्रिया आहे. फिरते पशू आपले खूर घासत राहतात. त्यामुळे खूर योग्य आकारात राहतात. परंतु दिवसेंदिवस कमी होत चाललेली कुरण जमीन, असंतुलित पशुपालन, लहान जागेत जनावरे बांधून त्यांचे पालनपोषण, खुरांची योग्य काळजी, छाटणी आणि घासणीच्या अभावामुळे जनावरांच्या खुरांच्या आजाराचे प्रमाण खूप वाढत आहे.

त्यामुळे जनावरे चालण्यास किंवा उभे राहण्यास असमर्थ बनतात. त्याचवेळी, जनावरांचे आरोग्य झपाट्याने बिघडू लागते. परिणामी जनावर आजारी आणि अशक्त दिसते. त्यामुळे उत्पादनाची पातळी विस्कळित होते. ही समस्या शेळ्यांपासून गाई, म्हशींपर्यंत सर्वच लहान प्राण्यांमध्ये दिसते. या समस्येमुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

कारणे

बंदिस्त पद्धती

एकाच ठिकाणी जास्त वेळ जनावरे बांधून पशुपालन. त्यामुळे जनावरांच्या खुरांची झीज होत नाही, ती सतत वाढत राहतात.

नैसर्गिक कारणे

कधीकधी नैसर्गिक कारणांमुळे किंवा आनुवंशिक/आनुवंशिक गुणांचे हस्तांतर किंवा शारीरिक विकृती इत्यादींमुळे, जनावरांच्या खुरांची झपाट्याने वाढ दिसून येते. त्यामुळे जनावरांचे खूर सामान्यपेक्षा मोठे होतात.

Hoof Disease
Animal Health : पावसाळ्यात जनावरांना होणारे संसर्गजन्य आजार

दुय्यम कारणे

म्हातारपणामुळे खुरे वाढतात.

जास्त प्रमाणात कॅल्शियमची कमतरता झाल्यास त्याचा खुरावर परिणाम दिसतो.

जनावर खूप कमकुवत झाले तरी खुराची जास्त वाढ ही दिसून येते.

जेव्हा जनावरांना संतुलित आहार मिळत नाही तेव्हा खूर निरंतर वाढत राहातात.

जनावराला चालता येत नसतानाही खुरांची अति वाढ होत असते.

लक्षणे

जनावराचे खूर इतके वाढतात की जेव्हा चालण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा खुरांच्या जास्त वाढीमुळे जनावर अडखळते. त्यामुळे वेदना होतात. गुडघ्यावर पाय वाकवून किंवा लांब खुरांनी चालण्याचा प्रयत्न करतात.

खूर फार मोठे झालेले दिसतात. जनावर लंगडते.ज्या पायाचे खूर जास्त प्रमाणात वाढलेले आहे त्या पायाचा उपयोग चालताना करत नाही.

जनावर चालण्याचा कंटाळा करते.चालताना जनावराला वेदना होतात.

चारा खाण्याचे प्रमाण कमी होते. हळूहळू दूध उत्पादनही कमी होते.शारीरिक वाढीचा वेग कमी होतो.

मादी जनावर वेळेवर माजावर येत नाही आणि नर प्रजनन कार्यात उदासीन होतो.

जनावराच्या खुराला जखमा होतात. वाढलेल्या खुराला जास्त दुखापत झाल्यामुळे रक्तस्राव होतो.

जनावर अत्यंत अशक्त आणि सुस्त, मलूल झाल्याचे दिसून येते.

Hoof Disease
Animal Care : जातिवंत दुधाळ गोवंशाचे संगोपन

उपचार

या समस्येवर उपचार म्हणजे खूर कापणे हा आहे. जनावरांमध्ये अतिवृद्धी झालेल्या खुरांच्या समस्येवर उपचार करण्यासाठी, अतिवृद्धी झालेल्या जनावराला इतर जनावरांपासून वेगळे करावे. तज्ञ पशुवैद्यकाकडून योग्य पद्धतीने जनावराचे वाढलेले खूर योग्य प्रमाणात कापून घासले पाहिजेत.

खूर एका मर्यादेपेक्षा जास्त कापले जाऊ नयेत, कारण जास्त कापल्याने जनावरांना त्रास होऊ शकतो. पशुवैद्यकाकडून वेळोवेळी जनावराची तपासणी करून शिफारस केलेले उपचार करावेत. खूर कापण्यासाठी हूफ कटर यंत्राचा वापर करावा.

प्रतिबंधक उपाययोजना

पशुपालन करताना जास्त काळ जनावरांना एकाच ठिकाणी चारा देणे आणि बांधणे टाळावे.

जनावरांना वेळोवेळी चरायला पाठवावे. जेणेकरून खूर नैसर्गिकरित्या जीर्ण होऊन योग्य आकारात राहातात.

पशुपालन सुरू करण्यापूर्वी तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन त्यांनी सुचविलेल्या योग्य प्रजातींची पशुसंवर्धनासाठी निवड करावी.

जास्त प्रमाणात वाढलेले खूर असलेल्या नर किंवा मादीची प्रजननासाठी निवड करू नये. खुरांचे निरीक्षण करावे.

संतुलित आहार द्यावा.गोठ्याची नियमित स्वच्छता आवश्यक करावी. खुरांवर जंतुनाशक उपचार करावेत.

स्वच्छ आणि साफ कुरणांमध्ये जनावरांना चरण्यासाठी पाठवावे.

जनावरांना फिरण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी आणि चरण्यासाठी पुरेशा मोकळ्या जागेची व्यवस्था करावी.

लहान जागेत मोठ्या संख्येने जनावरे पाळणे टाळावे.

नियमितपणे जनावरांच्या खुरांची तपासणी करून कापणी करावी.

- डॉ. सचिन राऊत, ७५८८५७१५११

(पशू शल्य चिकित्सा व क्ष किरण शास्त्र विभाग,पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय,परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com