Animal Management : आधुनिक पशू व्यवस्थापन हेच डेन्मार्कचे सूत्र

Article by Rajendra Sarkale : डॅनिश होल्स्टिन गाईची प्रतिवर्षी दूध उत्पादन सरासरी १०,३०० लिटर आहे. डॅनिश पशूपालकांचे व्यवस्थापन आणि संशोधक कंपन्यांच्या उत्कृष्ट प्रजनन तंत्रज्ञानामधील उच्च कौशल्यामुळे दूध उत्पादनात आघाडी मिळाली आहे.
Animal Management
Animal ManagementAgrowon

डॉ.राजेंद्र सरकाळे

Animal Management in Denmark : डेन्मार्कमधील पशूपालक प्रामुख्याने चाऱ्यावर अवलंबून आहेत. चारा नैसर्गिक गवतापेक्षा अधिक पौष्टिक असतो असे त्यांचे मत आहे. येथील हवामानाची परिस्थिती वर्षभर गवत उत्पादनासाठी अनुकूल नाही. तरीदेखील योग्य खाद्य व्यवस्थापनावर त्यांनी चांगले नियोजन केले आहे. प्रत्येक दुग्धशाळेत अत्याधुनिक यंत्राचा वापर केला जातो.

येथील शेतकरी दूध संशोधन, दुग्ध प्रक्रिया व क्रेडिट सुविधेचा लाभ घेतो, त्यामुळे मूल्य शृंखलेतील सर्व टप्प्यांवर उत्पादकता सुधारण्यात तो आघाडीवर आहे. पन्नास वर्षांपूर्वी एक डॅनिश गाय दिवसाला १५ लिटर दूध देत होती आणि आज प्रति गाय दूध उत्पादन ४० ते ४५ लिटर झाले आहे.

डॅनिश गायी जगातील सर्वांत चांगल्या दूध उत्पादक गायी आहेत. जगातील सरासरी उत्पादन प्रति गाय प्रतिवर्ष २,७०० लिटर आहे तर डॅनिश होल्स्टिन गाय सरासरी १०,३०० लिटर दूध देते. हा यशस्वी विकास डॅनिश पशूपालक आणि संशोधक कंपन्यांच्या उत्कृष्ट प्रजनन तंत्रज्ञानामधील उच्च कौशल्यामुळे झाला. यामध्ये वायकिंग जेनेटिक्स तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे.

डेअरी प्रकल्पास भेट :

अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही मार्टिन या कृषी पदवीधराने उभ्या केलेल्या डेअरी प्रकल्पास भेट दिली. या प्रकल्पात सातारा जिल्ह्यातील कृषी पदवीधर अभिजित गायकवाड तसेच कुमारी प्रणिता भोसले कार्यरत आहेत. अभिजित गायकवाड हा दुग्ध संकलन, चारा नियोजन आणि कुमारी प्रणिता भोसले या पशूव्यवस्थापनाचे काम पहातात.

या प्रकल्पात १,१०० गायी असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. हा गोठा प्रशस्त व स्वच्छ होता. हवा खेळती व शुद्ध राहावी म्हणून एक्झॉस्ट फॅन बसविलेले आहेत. या गोठ्यात गाईंचे शास्त्रीय पद्धतीने संगोपन केले जाते.

प्रकल्पाचे २२ एकर क्षेत्र आहे. गायींच्या खाद्यासाठी १२० एकरावर चारा लागवड आहे. प्रगत व आधुनिक पद्धतीच्या या प्रकल्पाची सुरुवात २०१८ मध्ये झाली. गाई आणि वासरांचे योग्य पद्धतीने संगोपन केले जाते.

आधुनिक यंत्राद्वारे गाईच्या तीन वेळा धारा काढल्या जातात. दूध काढण्यासाठी गाई प्लॅटफॉर्मवर एका मागून एक जातात. एका दिवसाला एक गाय सरासरी ४५ लिटर दूध देते. या प्रकल्पात १५ जण १,१०० गाईंचे व्यवस्थापन करतात.

गायींचा दुधाचा काळ नऊ महिने (२३० ते ३०० दिवस ) आणि भाकड काळ तीन महिने विचारात घेतल्यास एका गायीपासून साधारणपणे ८,००० ते १०,००० लिटर दूध उत्पादन होते. पाच वर्षांनंतर गाय कत्तलखान्याकडे पाठवली जाते. एका भाकड गायीला कत्तखान्यात विकल्यास ६०० युरो (५४,००० रुपये) मिळतात.

Animal Management
Animal Heat Stress Management : गाई, म्हशींमधील उन्हाच्या ताणाचे व्यवस्थापन

गाईंसाठी सुक्या व ओल्या चाऱ्याचा वापर केला जातो. अधिक दूध देण्यासाठी गायींना मुरघास दिला जातो. चाऱ्यासाठी मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पशू आहारात मूरघास, वाळलेल्या गवताची कुट्टी, मका कणीस भुकटी, खनिज मिश्रणाचा प्रमाणबद्ध वापर केला जातो. आठवड्यातून एकदा पशूतज्ज्ञांच्याकडून तपासणी केली जाते.

प्रकल्पाचे मालक गायींची खूप काळजी घेतात. आम्ही भेट दिली तेव्हा या प्रकल्पात ७०० वासरे होती. या प्रकल्पात नरांपेक्षा मादी वासरे कशा पद्धतीने वाढतील यासाठी प्रयत्न केले जातात. नर वासरू आणि कमी दूध देणाऱ्या गाई कत्तलखान्याकडे पाठविल्या जातात.

या डेअरी फार्मचा देशातील एकूण दूध उत्पादनात फार मोठा वाटा आहे. एका गायीची किंमत ९०० युरो ( ८५,००० ते ९०,००० रुपये) एवढी आहे. शेणखताचा वापर स्वमालकीच्या शेतीसाठी केला जातो. शेतीमधून अन्नधान्य, कडधान्य, गहू निर्मिती केली जाते. बायोगॅससाठी शेणखत वापरले जाते. उर्वरित शेणाची विक्री केली जाते.

हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे जनावरांना त्रास होऊ नये म्हणून संपूर्ण गोठा आच्छादित केला जातो. गोठ्यामध्ये गायींसाठी विविध विभाग आहेत. यामध्ये दुधाळ गाई, आजारी गाई, भाकड गाई आणि कृत्रिम गर्भधारणा केलेल्या गाई असे विभाग आहेत. दूध संकलनासाठी वयानुसार गट आहेत. गायींची स्वच्छता करून नीटनेटकेपणा जोपासला जातो. सर्व संकलित केलेले दूध चीज फॅक्टरीमध्ये पाठवले जाते.

बहुतांश गोठ्यातील संकलित दूध हे प्रक्रियेसाठी पाठविले जाते. बहुतांश दुधाची खरेदी- विक्री सहकारी संस्था (८० टक्के), खासगी संस्थांच्या (२० टक्के) माध्यमातून केली जाते. आम्ही चौकशी केली तेव्हा सहकारी संस्थातर्फे पशूपालकाला मिळणारा दुधाचा प्रति लिटर दर ३.२ युरो (२९० रू.) आणि खासगी कंपनीचा दर ३.५० युरो ( ३१५ रू.) इतका होता. यावेळी प्रति लिटर दुधाचा उत्पादन खर्च हा सरासरी १.५० युरो (१३५ रू.) होता.

खर्च वजा जाता शेतकऱ्यास सरासरी प्रति लिटर १८० रूपये नफा मिळत होता. बाजारपेठेनुसार दरात चढउतार होतात. खासगी, व्यावसायिक डेअरीबरोबरीने लोकांचा सहकारी संस्थांवर चांगला विश्वास आहे. येथील व्यावसायिक संस्था दुधापासून निर्यातक्षम चीज, बटर, दूध पावडर तयार करतात.

Animal Management
Animal Feed Management : टंचाई काळात जनावरांचा आहार

डॅनिश डेअरी मंडळाची साथ :

संचालक मंडळात एकूण सहा सदस्य आहेत. व्यवस्थापनाचे परिवेक्षण, धोरणात्मक निर्णय आणि मार्गदर्शक नेतृत्व मंडळाकडे असते. मंडळाच्या विविध समित्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या मंडळाचे प्रतिनिधी आहेत.

ही व्यापारी संघटना आहे. एक ज्ञानाधिष्ठित संस्था असून उद्योगाचा विकास करण्यासाठी व्यावसायिक कौशल्ये, सल्लामसलत तसेच क्षमतावृद्धीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. मंडळातर्फे डॅनिशन स्कूल मिल्क योजना (शालेय दुग्ध आहार योजना) हाताळली जाते. तसेच ट्रेडमार्क फाउंडेशन, आर्थिक व प्रशासकीय व्यवस्थापन सांभाळते.

हे मंडळ डेन्मार्क शासनाच्या कृषी आणि अन्न परिषदेचा एक भाग आहे. सहकारी आणि खासगी डेअरी उद्योगातील सदस्यांमध्ये समन्वय साधला जातो. राजधानी कोपनहेगन तसेच आर्हस, ब्रुसेल्स येथे मंडळाची कार्यालये आहेत.

हे मंडळ दोन गटांत विभागलेले असून दोन्ही गटांचे सदस्य मंडळाचे प्रतिनिधित्व करतात. पहिल्या गटात सहकारी आणि खासगी दुग्ध व्यावसायिकांचा म्हणजे दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन, वितरण व प्रक्रिया करणाऱ्या व्यावसायिकांचा समावेश होतो.

दुसऱ्या गटात दुग्धजन्य पदार्थांची निर्यात आणि आयात करणाऱ्या व्यापारी कंपन्यांचा समावेश होतो. मर्यादित कर्मचारी असलेल्या छोट्या दुग्ध व्यावसायिकांपासून शेकडो कर्मचारी असणाऱ्या मोठया कंपन्या या मंडळाच्या सदस्य आहेत.

डेन्मार्कमधील दुधाळ गाई :

या देशात डॅनिश रेड (पारंपारिक गाय), डॅनिश होल्स्टिन फ्रिजियन, आयरशायर, जर्सी, ग्वेनर्स आणि अल्डर्नी या प्रजातीच्या दुधाळ गाईंचे संगोपन केले जाते.

डॅनिश होल्स्टिन प्रजातीच्या सुमारे ७० टक्क्यांपेक्षा जास्त गाई डेन्मार्कमध्ये पाळल्या जातात.
लाल डॅनिश यागाई उच्च प्रथिनजन्य दूध देणाऱ्या, मजबूत, दीर्घायुषी आणि चांगली उत्पादकता असणाऱ्या आहेत. गाय दरवर्षी सरासरी ८,००० लिटर दूध देते.

डॅनिश जर्सी गाईच्या दुधात बटर फॅट आणि प्रथिनांचे प्रमाण उच्च असते. दुधाळ गायींच्या प्रजातीमधील ही आधुनिक डॅनिश जात आहे. या जातीच्या गायी इतर जातींपेक्षा आकाराने लहान व पांढऱ्या खुणा असलेल्या फिकट रंगाच्या असतात. गाईचे वजन सुमारे ३५० ते ४५० किलो, नराचे वजन सुमारे ५०० ते ६०० किलो असते.

डॉ.राजेंद्र सरकाळे, ९८५०५८६२२०
(लेखक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com