डॉ. भगतसिंग कदम
Nutritional Values of Animals : पुरेसे पोषण न मिळाल्याने जनावरांना प्रथिने, ऊर्जा, खनिजे व जीवनसत्त्वे कमी पडतात. यामुळे दूध उत्पादन निश्चितपणे कमी होते. हिरव्या चाऱ्याच्या अभावामुळे जनावरांमध्ये अ व ई जीवनसत्त्वांची कमतरता होते, प्रजननावर विपरीत परिणाम होतो.
जनावरे माजावर येत नाहीत किंवा माजाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसते. अशावेळी बायपास प्रथिने, बायपास फॅट यांचा वापर करावा. खनिज मिश्रण नेहमी वापरले पाहिजे. तसेच पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने अ व ई जीवनसत्त्वाची इंजेक्शन दिली पाहिजेत.
चाऱ्याची उपलब्धता
आपल्याकडे असलेल्या जनावरांच्या संख्येवरून चाऱ्यासाठी क्षेत्र राखीव ठेवले पाहिजे. या क्षेत्रामध्ये वर्षभर पुरेल एवढा चारा निर्मिती करावी. यामध्ये ज्वारी, बाजरी, यासारखी वैरण पिके जी वाळवून साठविता येतात त्यांची लागवड करावी किंवा ज्या ठिकाणाहून स्वस्तात मिळतात अशा ठिकाणावरून खरेदी करावीत.
हिरव्या वैरणीसाठी यशवंत, जयवंत यांसारख्या हत्ती गवताची लागवड करावी. त्याचबरोबर लसूण घास, मेथी घास, दशरथ घास यांसारखी द्विदल चारा पिके ज्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते त्यांची लागवड करावी.
चारा निर्मितीबरोबरच, चाऱ्याची बचत करावी. बहुतांश शेतकरी कडबा, उसाचे वाढे, हिरवी वैरण आहे त्या स्वरूपात जनावरांना देतात. यामुळे जनावरे फक्त पाल्याचा भाग खातात आणि बुडखे शिल्लक राहतात. ते फेकून द्यावे लागतात.
बुडख्यामध्ये असणारे तंतू जनावरांसाठी फार उपयुक्त असतात, नेमके तेच वाया जातात. हा चारा आपण कुट्टी केला तर वाया जाणाऱ्या वैरणीचे प्रमाण सुमारे ३० टक्के असते ते वाचते. यामुळे जनावरांचे पोट ही भरते, पचनास मदत होते.
हायड्रोपोनिक्स चारा, अझोला वापर
पाण्याची तीव्र टंचाई असल्यास हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती करता येते. या व्यतिरिक्त अझोला देखील खाद्यामध्ये वापरता येतो. डकवीडसारख्या वनस्पती पाण्यात वाढवून वापरता येतात. स्टार्च फॅक्टरीमधून निघणारे हस्क, बुवर्स यीस्ट याचा वापर पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा.
शिल्लक असलेला मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन यांसारखे धान्य पन्नास टक्क्यांपर्यंत वाढविता येते परंतु या गोष्टी पशू खाद्यात वापरताना जनावरांचे अपचन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागते. कडधान्याच्या कारखान्यातून निघणारे उपपदार्थ वापरता येतील.
जनावरांचे दूध उत्पादन उच्चतम पातळीवर नेण्यासाठी हिरवा चारा अपरिहार्य आहे. हिरव्या चाऱ्याची कमतरता भरून काढण्यासाठी हायड्रोपोनिक्स पद्धतीने चारा निर्मिती करावी. या पद्धतीमध्ये कमी जागेत जास्त हिरवा चारा निर्मिती करता येते.
या पद्धतीत पाण्याची बचत होते. वर्षभर आपण चारा निर्मिती करू शकतो. मनुष्यबळ कमी लागते, फक्त आठ दिवसांत चार उत्पादन सुरू होते.
हायड्रोपोनिक्स चारा हे नैसर्गिक खाद्य असून, त्याची पचनियता जास्त असते. या मध्ये बीटा कॅरोटीन हा घटक जास्त असतो. यामुळे ‘अ’ जीवनसत्त्वाची निर्मिती होते. हे जीवनसत्त्व प्रजननासाठी अत्यंत उपयुक्त असते.
या चाऱ्यामध्ये क्रूड प्रोटीन (प्रथिने) जास्त असल्याने पशुखाद्यावरील खर्च कमी होतो.हा चारा मका, बाजरी, ज्वारी, रागी, चवळी, कुळीथ, ताग या वनस्पतीपासून बनविला जाऊ शकतो.
- डॉ. भगतसिंग कदम, ८२७५१७८००१
(सहायक आयुक्त, रोग अन्वेषण विभाग, पशुसंवर्धन विभाग, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.