Animal Heat Stress Management : गाई, म्हशींमधील उन्हाच्या ताणाचे व्यवस्थापन

Animal Care : गाईंच्या काही प्रजातींमध्ये उष्णतारोधक ‘स्लिक’ जनुक असते, यामुळे गाईंवर उष्णतेचा फार कमी परिणाम पाहायला मिळतो. भारतीय गोवंश तसेच होल्स्टिन फ्रिजियन गाईंमध्ये हे जनुक असते.
Animal Heat Stress Management : गाई, म्हशींमधील उन्हाच्या ताणाचे व्यवस्थापन

डॉ. पराग घोगळे

heat stress in cows, buffaloes : गाईंच्या काही प्रजातींमध्ये उष्णतारोधक ‘स्लिक’ जनुक असते, यामुळे गाईंवर उष्णतेचा फार कमी परिणाम पाहायला मिळतो. भारतीय गोवंश तसेच होल्स्टिन फ्रिजियन गाईंमध्ये हे जनुक असते. अशा गाईंसोबत संकरित जात तयार केल्यास भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशामध्ये गाईदेखील उन्हाळ्यात व्यवस्थित दूध उत्पादन देतात.

उन्हाळ्यातील ताणामुळे जनावरांवर होणाऱ्या परिणामांचा थेट संबंध त्यांच्या दूध उत्पादनासोबत आहे. गाई, म्हशींची उत्पादन क्षमता ही त्यांच्यामधील उन्हाचा ताण आणि इतर ताण सहन करण्याची आनुवंशिक क्षमता व आपल्या गोठ्यातील आरामदायी व्यवस्थापनावर अवलंबून आहे. जनावरांना आरामदायक वातावरणात ठेवणे हे शारीरिक आरामासोबतच संतुलित आहार, चांगले वातावरण व उन्हाळ्याच्या दृष्टीने करावयाच्या उपाय योजनांवर अवलंबून असतो.

आनुवंशिक नियंत्रण :
१) गाईंच्या काही प्रजातींमध्ये उष्णतारोधक ‘स्लिक’ जनुक असते, यामुळे गाईंवर उष्णतेचा फार कमी परिणाम पाहायला मिळतो. भारतीय गाईंमध्ये तसेच होल्स्टिन फ्रिजियन गाईंमध्ये हे जनुक असते. अशा गाईंसोबत संकरित जात तयार केल्यास भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशामध्ये गाईदेखील उन्हाळ्यात व्यवस्थित दूध उत्पादन देतात. जागतिक तापमानवाढीमुळे दरवर्षी सगळीकडे तापमान वाढ होताना दिसत आहे, त्यामुळे भविष्यात अशा वाढणाऱ्या तापमानात टिकून राहील अशा गाई, म्हशींच्या प्रजाती विकसित कराव्या लागणार आहेत.
२) ‘स्लिक’ जनुक असलेल्या भारतीय किंवा विदेशी प्रजातींना वेगळे करून अनुवंश सुधार कार्यक्रम राबविता येऊ शकतो. ‘स्लिक’ जनुक हा जनावरांच्या केसासंबंधी असून, तो केसांची लांबी नियंत्रित करतो. हा जनुक कॅरोरा नावाच्या व्हेनेझुएला देशातील गायीमध्ये प्रथम सापडला. नंतर त्याला संकरीकरणाद्वारे एचएफ गाईमध्ये आणले गेले. हा स्लिक जनुक हा गुणसूत्र क्रमांक २० मध्ये आहे.
३) ‘स्लिक’ जनुक असलेल्या गायींच्या शरीरावर छोट्या तुकतुकीत व चमकदार केसांचा थर असतो. या गाईंच्या शरीराचे तापमान उन्हाळ्यातही नैसर्गिकरीत्या कमी असते. या गायींमध्ये दूध उत्पादनाचे प्रमाणही जास्त असते.

Animal Heat Stress Management : गाई, म्हशींमधील उन्हाच्या ताणाचे व्यवस्थापन
Animal Care : गाई, म्हशींच्या संक्रमण काळातील आहार व्यवस्थापन

शारीरिक तापमान नियंत्रण :
१) शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी गाई, म्हशींच्या शरीरावरील केसांच्या मुळाशी घामाच्या ग्रंथी असतात, परंतु त्याद्वारे त्या जास्त घाम उत्सर्जित करू शकत नाहीत.
२) गाई, म्हशी या होमिओथर्म या प्रकारात मोडतात, म्हणजेच बाहेर कितीही तापमान असले तरी शरीराचे तापमान हे सर्व शरीरभर एकसारखे असते. यांचे नियंत्रण त्यांच्या शारीरिक हालचाली व वर्तणुकीतून होते.
३) सभोवताली असलेल्या वातावरणाचा परिणाम गाई, म्हशींच्या उत्पादनावर होत असतो. वातावरणातील घटक जसे की, हवेचे तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग, इत्यादी या सर्वांचा गाई, म्हशींच्या उष्णतारोधक क्षमतेवर एकत्रित परिणाम होतो.

Animal Heat Stress Management : गाई, म्हशींमधील उन्हाच्या ताणाचे व्यवस्थापन
Cow Heat Stress : गाईंसाठी दिवस - रात्र शीतकरण प्रणाली ठरते अधिक फायदेशीर

१) हवेचे तापमान :
याचा सर्वांत जास्त परिणाम जनावरांवर होतो. तसेच रात्री थंड आणि दिवसा जास्त गरम अशा विरोधी वातावरणाचा जास्त विपरीत परिणाम होतो. गोठ्यातील वातावरणाचा उष्णतेच्या विनिमयावर परिणाम होतो. उष्णतेचे हस्तांतर किंवा प्रसारण खालील चार प्रकारे होते.
१. वहन (गरम पृष्ठभागातून थंड पृष्ठभागाकडे थेट संपर्काने उष्णतेचे वहन)
२. संवहन (शरीराभोवतीची गरम हवा थंड हवेने बदलणे)

३. उत्सर्जन (उष्णता गरम वातावरणातून थंड वातावरणाकडे उत्सर्जित केली जाते)
४. बाष्पीभवन (बाष्पाद्वारे श्वसनमार्ग व त्वचेतून उष्णतेचे निर्गमन)

२. हवेतील आर्द्रता :
१) हवेतील पाण्याचे प्रमाण हवेच्या उष्णता वाहून नेण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम करते. श्वासोच्छ्‍वासाद्वारे होणाऱ्या उष्णतेच्या विनिमयावर हवेतील आद्रतेमुळे प्रतिबंध होतो, शरीरातील उष्णता वाढते.
२) जेव्हा बाहेरील तापमान हे गायीच्या शरीराच्या तापमानापेक्षा जास्त असते तेव्हा शरीराचे तपमान कमी करण्यासाठी बाष्पीभवन हा एकमेव मार्ग उरतो. अशावेळी हवेतील आर्द्रता वाढल्यास तोही मार्ग खुंटतो.
३) जेव्हा शरीरातील उष्णता, बाहेरून मिळालेली उष्णता व शरीराबाहेर टाकली जाणारी उष्णता या समतल पातळीवर असतात तेव्हा शारीरिक चयापचय क्रिया सामान्य पातळीवर असते.
४) जेव्हा बाहेरील तपमान वाढते तेव्हा जनावरांना उष्णतेचा ताण जाणवायला लागतो. रवंथप्रक्रिया तसेच शारीरिक शारीरिक चयापचय क्रिया यातून जनावरांच्या शरीरात उष्णता तयार होत असते. त्यातच बाहेरील तपमान गरम राहिल्यास व गोठा व्यवस्थापन सदोष असल्यास भर पडते.

तापमान- आर्द्रता निर्देशक तक्ता ः


यामध्ये हवेचे तपमान व आद्रता यांचे एकत्रित प्रमाण अभ्यासले जाते. त्यावरून उष्णतेचा त्रास जनावरांना कुठल्या वातावरणात जास्त होईल हे दिसून येते.
तापमान- आद्रता निर्देशक---जनावरांवरील परिणाम
६८-७२ ---उष्णतेचा त्रास सुरू झाल्याचे दर्शवतो.
७२ - ७८ ---दुधाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटते.
७८- ८२ ---तब्येतीवर विपरीत परिणाम व प्रसंगी मृत्यूची शक्यता.

सध्या मोबाइलवर तापमान- आर्द्रता निदर्शक मोजणारे मोफत अॅप उपलब्ध आहेत. त्यांची मदत घेऊन दूध उत्पादक आपल्या सभोवताली असलेल्या वातावरणाचा अभ्यास करू शकतात.

हवेचा वेग :
१) हवेशीर गोठा हा नेहमीच तापमान नियंत्रण करण्यास मदत करतो. हवा वाहत नसेल तर आडव्या पंख्यांची रचना करून हवेचा झोत पश्चिम ते पूर्व असा ठेवावा.
२) गोठ्याची बांधकाम दिशा पूर्व- पश्चिम अशी असावी. फॉगर किंवा तुषार संच बसविल्यास जनावरांच्या शरीरावरील पाणी त्वरित सुकून जाईल अशी व्यवस्था करावी, अन्यथा त्यांना न्यूमोनिया व इतर श्वास संबंधित आजार होण्याची शक्यता असते.

उन्हाच्या ताणाची लक्षणे :
१. जनावराच्या शरीराची तपमान वाढ
२. धापा टाकणे. एका मिनिटात ८० वेळा श्वास घेणे
३. जनावरांची हालचाल मंदावणे
४. जास्त पाणी पिणे
५. सतत सावलीचा आधार घेणे
६. १५ ते २० टक्के आहार कमी खाणे
७. दुधामध्ये २० टक्के किंवा जास्त घट होणे

उष्णतेच्या ताणामुळे शरीरातील रक्त हे उष्णता उत्सर्जनासाठी त्वचेकडे अधिक वाहाते. इतर अवयवांना रक्तपुरवठा तुलनेने कमी होतो. शरीर स्वास्थ टिकविण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च झाल्यामुळे एकूण ऊर्जेची गरज वाढते. त्याचवेळी कमी भुकेमुळे खाणे कमी होते, म्हणून शरीराच्या ऊर्जेची पूर्तता होत नाही व दूध कमी होते.

गाई, म्हशींच्या प्रजनन क्षमतेवरील परिणाम:
१. जनावर माजावर येत नाही किंवा मुका माज असतो.
२. गाभण राहण्याचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांनी कमी होते.
३. अंडाशयातील बीजांची वाढ कमी होते.
४. गर्भमृत्यूंचे प्रमाण वाढते.
५. वासरांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो.

आहारातून उष्णतेच्या ताणाचे नियोजन :
पाण्याचे महत्त्व :

१) जनावरांना पिण्यासाठी अतिरिक्त पाणी द्यावे, जेणेकरून दूध उत्पादन व शरीराची गरज भागवली जाऊ शकेल.
२) स्वच्छ व थंड पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास दूध उत्पादनातील सातत्य टिकवून ठेवता येते. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यामध्ये बर्फ टाकून असे गार पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास त्याचा दूध उत्पादनावर अतिशय चांगला परिणाम दिसून आला आहे. पाणी हा जनावरांवरील ताण कमी करण्यासाठीचा मूलभूत घटक आहे.

अतिरिक्त ऊर्जा :
१) गाई, म्हशींना अतिरिक्त ऊर्जा असलेला आहार द्यावा. जेणेकरून भूक मंदावली असली तरी जरुरी कॅलरीज त्यांना मिळून उत्पादनावर परिणाम होणार नाही. यासाठी मका किंवा गहू ऐवजी बायपास फॅटचा वापर करावा. जेणेकरून पोटाचा सामू संतुलित राहून ५.८ ते ६.८ या मध्ये राहील.
२) बायपास फॅटमध्ये स्टार्चच्या तुलनेत सुमारे अडीच पट ऊर्जा उपलब्ध असते.

घरगुती घटक :
१) जास्त स्टार्च किंवा कर्बोदके असलेला आहार हा किण्वन पोटामध्ये (रुमेन) अतिरिक्त आम्ल उत्पन्न करीत असल्यामुळे पचनास अडथळे निर्माण करतो. म्हणून किण्वन पोटातील आम्लता कमी करण्यासाठी खाण्याचा सोडा, जिरे, धणे, सैंधव मीठ आणि इतर घरगुती घटक वापरून त्याचे मिश्रण जनावरांना द्यावे. ज्यायोगे किण्वन पोटाचे वातावरण चांगले राहून पचनास मदत होईल.

हिरव्या चाऱ्याचे महत्त्व :
१) जनावरे हिरवा चारा आवडीने खातात. संकरित ज्वारी, मका व इतर एकदल वर्गीय चारा शक्य झाल्यास गाई म्हशींना द्यावा. द्विदल वर्गीय चाऱ्यामध्ये लसूण घास हा अतिशय चांगला चारा आहे. ज्यातून सुमारे २१ टक्के प्रथिने जनावरांना मिळतात.
२) चाऱ्यामध्ये सुमारे ८० टक्के पाणी असते. जीवनसत्त्व अ आणि ई हे सुद्धा नैसर्गिकरीत्या उपलब्ध होतात. जनावरांवरील ताण कमी होतो. प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो
खनिज मिश्रणाची गरज :
१) विविध प्रकारची खनिजे व जीवनसत्वे गाई, म्हशींच्या चयापचय प्रक्रियेमध्ये मोलाची भूमिका बजावतात.
२)जनावरांना जीवनसत्त्वाचे मिश्रण आणि खनिज मिश्रण द्यावे.
३) जीवनसत्त्व-अ, ई व डी ३ , जीवनसत्त्व क, फॉस्फरस या घटकांमुळे उष्णतेचा ताण कमी होण्यास मदत होते. पचन व प्रजनन सुधारते. त्वचा तुकतुकीत व चमकदार होते व जनावराची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते.

घरगुती सरबत :
१) दहा लिटर थंड पाण्यामध्ये २०० ग्रॅम गूळ, २५ ग्रॅम मीठ व एक लिंबू पिळून घ्यावे. हे सरबत तयार करून दिवसातून एक किंवा दोन वेळेस जनावरांना पाजावे किंवा जीवनसत्त्व क आणि डेक्सट्रोज युक्त पूरक द्यावे. म्हणजे गाई, म्हशींमधील उन्हाचा ताण कमी होण्यास मदत होईल.

आयुर्वेदिक घटकांचा वापर :
१) जनावरांवरील उन्हाचा ताण कमी करण्यासाठी आयुर्वेदिक घटकांचाही वापर करावा. यामध्ये अश्वगंधा,आवळा, शतावरी, जीवंती, पुदिना, कोरफड याचा वापर करावा. आयुर्वेदानुसार काही औषधी घटक हे जनावरांवरील ताण कमी करणे तसेच प्रजननक्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात. पशुवैद्यकांच्या सल्यानुसार असे घटक किंवा त्यांचे अर्क आपल्या जनावरांच्या आहारात योग्य प्रमाणात समाविष्ट केल्यास उन्हाळ्यातील ताण कमी करण्यास निश्चितच मदत होते.
-----------------------------------------
संपर्क ः डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९
(लेखक पशुआहार तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com