
चंदीगड (वृत्तसंस्था) ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीपसिंग सुरजेवाला (Randipsingh Surjewala) यांनी गुरुवारी (ता. १८) हरियानातील सत्ताधारी भाजपवर (BJP) हल्ला चढवला. ते गायींच्या नावावर राजकारण (Cow Politics) करतात, परंतु जनावरांमध्ये ‘लम्पी’ (ढेकूळ त्वचा रोग) या त्वचेच्या आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) वाढत असताना त्यांच्यावर उपचाराऐवजी त्यांनी जनावरांना वाऱ्यावर सोडले आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.
राज्यसभेचे खासदार सुरजेवाला यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, एका महिन्यात राज्यात १६ जिल्ह्यांतील २,३५४ गावांमध्ये सुमारे ३०,००० गायींना या आजाराची लागण झाली आहे आणि त्यापैकी २०० गायींचा मृत्यू झाला आहे. ढेकूळ त्वचेच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे भाजप सरकारला गोमातेच्या नावावर राजकारण करण्याशिवाय काहीच कळत नाही. जेव्हा जेव्हा मानवांवर किंवा प्राण्यांवर कोणतीही आपत्ती येते तेव्हा भाजप सरकार मूक प्रेक्षक बनून बसते आणि मानव आणि जनावरांना वाऱ्यावर सोडते.
जनावरांमध्ये हा आजार झपाट्याने वाढत आहे, परंतु बाधित जनावरांवर उपचार करण्यासाठी लसीकरण, डॉक्टर आणि औषधे उपलब्ध नाहीत, असा दावा सुरजेवाला यांनी या वेळी केला. यमुनानगर, कैथल, सिरसा, अंबाला, कुरुक्षेत्र, महेंद्रगड आणि कर्नाल या जिल्ह्यांना या आजाराचा सर्वाधिक फटका बसला आहे. हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा आणि माजी केंद्रीय मंत्री कुमारी सेलजा यांनीही भाजप सरकारवर या मुद्द्यावरून हल्ला चढवला.
या समस्येला सामोरे जाण्यासाठी आवश्यक तत्परता सरकारने दाखवली नाही. सरकारने रोग उपचार, नमुने आणि लसीकरण यावर योग्य भर दिला पाहिजे, असे हुडा म्हणाले. प्रत्येक गावात वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याची आणि संक्रमित प्राण्यांना निरोगी जनावरांपासून दूर ठेवण्याची व्यवस्था करावी. पशुपालक आणि गोशाळांना विशेष अनुदान आणि भरपाई द्यावी. शासनाकडून योग्य अनुदान मिळत नसल्यामुळे निराधार जनावरे गोशाळांमधून बाहेर काढली जातात.
सरकारने गोशाळांना प्रति गाय प्रतिदिन ५० रुपये अनुदान द्यावे, अशी आमची मागणी आहे. सरकारने असे केल्यास एकही निराधार प्राणी रस्त्यावर सापडणार नाही, असे हुडा म्हणाले. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारला अद्याप तीव्र मोहीम राबवता आली नसल्याचे सेलजा म्हणाल्या. सरकार गंभीर असते तर रोगाचा प्रसार रोखता आला असता, असे त्या म्हणाल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.