Lumpy : लम्पी त्वचा आजाराबाबत जागरूक राहा...

लम्पी त्वचा आजार प्रामुख्याने चावणारे कीटक उदाहरणार्थ स्टोमोक्सिस, क्युलीकॉइड्स, ग्लोससिनिया आणि घरमाशीमुळे पसरतो. आजाराचा प्रादुर्भाव झाल्यावर अचानक त्वचेवर गाठी येऊ लागतात. जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशुवैद्यकांशी संपर्क साधून त्वरित उपचार करावेत.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रशांत गाढवे, डॉ. अमित चौगुले

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागांत जनावरांमध्ये लम्पी त्वचा आजार (Lumpy Skin Disease) (लम्पी स्कीन डीसिज) दिसून येत आहे. हा आजार त्वचेचा (Skin Disease) वाटत असला तरी तो सर्व अवयवांचा आजार आहे. प्रामुख्याने गाय, बैल, वासरे आणि म्हशींमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात. इतर जनावरांना तसेच माणसांना या आजाराची बाधा होत नाही. कॅप्रीपॉक्स वर्गीय विषाणूमुळे हा आजार होतो. आजाराचा उद्रेक हा गंभीर तसेच सर्व शरीरव्यापी असतो. या आजारामध्ये मृत्युदर जरी कमी असला तरी जनावरांच्या शरीराची भरपूर हानी होऊन पशुपालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. सर्व वयाची गोवर्गीय आणि म्हैस वर्गीय जनावरांमध्ये हा आजार दिसतो. (Lumpy skin Disease In Animal)

१) मोठ्या जनावरांच्या तुलनेत लहान वासरांमध्ये आजार जास्त दिसतो. जी जनावरे या आजारामुळे बाधित होऊन ठीक होतात त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होते, त्यांना कमीतकमी पुढील तीन महिने हा आजार होत नाही. संकरित जनावरांमध्ये हा आजार होण्याची शक्यता देशी जनावरांपेक्षा जास्त असते.

२) या आजारामध्ये मृत्युदर जरी कमी असला तरी आर्थिकदृष्ट्या होणारे नुकसान खूप असते. कारण जनावरांचे दूध उत्पादन कमी होते. त्वचेवर व्रण येतात. सर्वसाधारण शरीरयष्टी कमकुवत होते, जनावरे विकृत दिसतात. त्यामुळे जनावरांचे बाजारमूल्य कमी होते.

प्रसाराची कारणे ः

१)आजारी जनावरांशी संपर्क ः

-जनावराने विषाणू बाधित झालेले पाणी पिल्यानंतर किंवा बाधित झालेल्या जनावराच्या संपर्कात आल्यानंतर हा आजार होऊ शकतो.

- आजारास कारणीभूत ठरणारा विषाणू बाधित जनावराच्या अश्रूमध्ये, नाकातील स्रावामध्ये, वीर्यामध्ये तसेच दुधामध्ये देखील आढळून येतो.

२) चावणाऱ्या माश्‍या आणि डास ः

- आजार मुख्यत्वे चावणारे कीटक, उदाहरणार्थ स्टोमोक्सिस, क्युलीकॉइड्स, ग्लोससिनिया आणि घरमाशी यामुळे पसरतो.

- उष्ण व दमट वातावरण हे माश्‍यांच्या प्रजननासाठी पोषक असते. याच काळामध्ये आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता जास्त असते. तुलनेने थंड वातावरणामध्ये रोगाचा प्रसार कमी होतो.

आजाराचा प्रसार ः

- वाहक माश्‍यांनी चावा घेतल्यानंतर आजाराचे विषाणू रक्ताद्वारे सर्व शरीरात पसरून जनावरांना ताप येतो. नंतर हा विषाणू त्वचेमध्ये जाऊन त्वचेचा दाह करून तेथे गाठी तयार होतात.

- हा आजार शरीरभर पसरण्यासाठी एकदा विषाणू शरीरात गेल्यानंतर साधारणपणे दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी लागतो.

Lumpy Skin Disease
लम्पी स्कीन रोगावरील ‘माफसू’च्या संशोधनास राष्ट्रीय पुरस्कार

आजाराची प्रमुख लक्षणे ः

- गंभीररीत्या बाधित झालेल्या जनावरांमध्ये सुरुवातीच्या लक्षणांमध्ये आठवडाभर राहणारा ताप, चारा खाणे-पाणी पिणे कमी किंवा बंद होते, कधी कधी अश्रू गाळणे, लाळ गाळणे, नाकातील स्राव आणि पायांची कमजोरी अशी लक्षणे आढळून येतात. त्यानंतर अचानक त्वचेवर गाठी येऊ लागतात.

- बऱ्याचदा पहिल्यांदा अशा गाठी मागच्या दोन पायांमधील त्वचेवर दिसतात. आलेल्या गाठी सर्वसाधारणपणे १ ते ४ सेंमी मोठ्या, गोल, वरील भाग सपाट असणाऱ्या आणि कठीण असतात.

- गाठीवरील भागातील केस शेवटपर्यंत उभे राहणारे असतात. या गाठी काही जनावरांमध्ये कमी तर काहींमध्ये शेकड्याने आढळून येतात.

Lumpy Skin Disease
जनावरांच्या आजारावर या औषधी वनस्पती उपयुक्त!

- नाकातील श्‍लेष्मल त्वचेवर व्रण निर्माण होऊन चिकट स्राव वाहू लागतो. कधी कधी नाकातील श्‍लेष्मल त्वचेवर होणाऱ्या बदलामुळे श्‍वसनास अडथळा येऊन घोरण्याचा आवाज येऊ शकतो.

- तोंडातील श्‍लेष्मल त्वचेवर व्रण निर्माण होऊन लाळ वाहू लागते, डोळ्यातील श्लेष्मल त्वचेवर गाठी येऊन सतत अश्रू वाहतात. जनावरांचे पाय सुजतात.

- बऱ्याच जनावरांमध्ये उपचार केल्यानंतर आजाराच्या गाठी लुप्त पावतात. काहींमध्ये त्या कायम राहतात. नंतर खूपच टणक होतात. तर कधी आपोआप गळून पडून व्रण निर्माण करतात. बाधित झालेल्या त्वचेजवळच्या लसिका ग्रंथी सुजलेल्या आढळून येतात. गाठीच्या वरील त्वचा गळून जखमा निर्माण होऊ शकतात. अशा जखमा खूप दिवस बरे होत नाहीत आणि कधी कधी जवळच्या जखमा एकत्र होऊन मोठी जखम तयार करतात. अशा जखमांमध्ये अळ्या होतात.

- आजारातून बरे होण्यासाठी साधारणपणे ४ ते १२ आठवड्यांचा कालावधी लागतो.

- गाभण गाईंमध्ये या आजारामुळे गर्भपात होऊ शकतो. आजारामध्ये मृत्यू, शक्यतो श्‍वसनास अडथळा आल्यामुळे किंवा फुफ्फुसाच्या दाहामुळे होऊ शकतो.

उपचार ः

- सध्या तरी या आजारावर थेट उपाययोजना नाही, परंतु लक्षणे कमी करण्यासाठी प्रतिजैविके, ज्वरनाशक, अॅंटीहिस्टामिनिक औषधे द्यावीत.

- आजार प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी पूरक जीवनसत्त्वे जसे की अ, ड ही द्यावीत.

- त्वचेवरील जखमांसाठी अॅंटीसेप्टिक/ फ्लाय रेपेलेंट स्प्रेचा वापर करावा.

- जिवाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करावा.

- जनावरांच्या तोंडात व्रण असतील तर पोटॅशिअम परमॅंगनेटच्या पाण्याने धुऊन बोरोग्लिसरीन लावावे.

तातडीचे उपाय ः

- बाधित जनावरांना तत्काळ इतर जनावरांपासून वेगळे करावे.

- बाधित व निरोगी जनावरांना एकत्र चरण्यास सोडू नये.

- साथ आलेल्या भागातून जनावरांची खरेदी विक्री करून नये.

- आजारी जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य, वाहन आणि परिसर सोडिअम हायपोक्लोराइडच्या द्रावणाने निर्जंतुक करून घ्यावा.

- गोठ्यामध्ये कीटकांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जनावरांचा गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा. गोठ्याच्या परिसरात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आजाराचा प्रसार करणाऱ्या कीटकांचे निर्मूलन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. एक लिटर पाण्यामध्ये ४० मिलि करंज तेल, ४० मिलि नीम तेल व १० ग्रॅम साबण मिसळून द्रावण तयार करावे. दर तीन दिवसांनी जनावरांच्या अंगावर आणि गोठ्यात फवारावे.

- जनावरांमध्ये आजाराची लक्षणे आढळून आल्यास पशुवैद्यकांशी संपर्क साधून त्वरित उपचार करावेत.

लसीकरण ः

- सध्या या आजारावर योग्य लस उपलब्ध नसली तरी शेळी किंवा मेंढीच्या देवी आजाराविरुद्ध वापरण्यात येणारी लस प्रभावी ठरू शकते असे दिसून आले आहे. सदर लसीकरण आणि उपचार नोंदणीकृत पशुवैद्यकाकडून करून घ्यावेत.

संपर्क ः

- डॉ. प्रशांत गाढवे, ८४२५८६३१२३

(विकृतिशास्र विभाग, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई)

- डॉ. अमित चौगुले, ९६३७१६८२४२

(पशुधन विकास अधिकारी, एरंडोली, जि. सांगली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com