Animal Poisoning : जनावरांतील विषबाधा टाळा

चरायला मोकळे सोडल्यानंतर जनावर अखाद्य वस्तू आणि विषारी वनस्पती खाणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्वारीची कोवळी पोंगे आणि युरिया खाण्यामुळे जनावर दगावण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
Animal Poisoning
Animal Poisoning Agrowon
Published on: 
Updated on: 

जनावरांमध्ये बऱ्याच कारणांमुळे विषबाधा (Animal Poisoning) होते. त्यापैकी ज्वारीचे कोवळे पोंगे खाण्यात आल्याने, युरिया खाण्यामुळे, कीड-रोग नियंत्रणासाठी फवारलेली कीटकनाशके (Pesticide), तणनाशक (Weedicide), उंदीरनाशक इत्यादी घटक जनावरांनी खाल्यामुळे विषबाधा होते. या विषबाधेमुळे जनावरांमध्ये विविध दुष्परिणाम दिसून येतात. विषबाधेमुळे जनावर मृत्यू पावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे विषबाधेची कारणे, लक्षणांची माहिती घेऊन वेळेवर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Animal Poisoning
Animal Care : तंत्रज्ञान, व्यवस्थापनातूनच गोशाळा होतील सक्षम

युरियाची विषबाधा

ही विषबाधा सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते. युरियाची विषबाधा होऊन बऱ्याच जनावरांचा मृत्यू होतो.

कारणे

युरियाचा पशू खाद्यामध्ये अधिक वापर. उदा. युरिया- मोलॅसिस, मुरघास

युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीन पेंड किंवा सोयाबीन भरडा खाऊ घातल्यास.

युरिया किंवा इतर खतांची पोती जनावरांनी चाटल्यास.

दुभत्या जनावरांना खुराकातून अधिक प्रमाणात युरिया खाऊ घातल्यास.

Animal Poisoning
Animal Care : सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात ‘गजेंद्र’ ठरतोय आकर्षण

लक्षणे

 जनावरांच्या तोंडाला फेस येतो.

 जनावरांना नीट उभे राहता येत नाही.

 जनावरांची पोटफुगी होते. पोटामध्ये वेदना होतात.

 जनावरे सतत उठबस करतात. थोडी थोडी लघवी करतात.

 जनावरांचे डोळे मोठे होतात.

 जनावरांना झटके येतात.

 जनावरे बेशुद्ध होतात. व शेवटी मृत्यू होतो.

 अधिक प्रमाणात युरिया खाल्ला असेल, तर अर्ध्या तासामध्येच मृत्यू होतो.

उपचार

 युरियाची विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित जनावरांना २ ते ८ लिटर ताक पाजावे.

 ताक उपलब्ध नसल्यास माठातील किंवा रांजणातील थंड पाणी पाजावे. मोठ्या जनावरांना ४० लिटर व लहान जनावरांना २० लिटर पाणी पाजावे.

 पोटातील हवा काढण्यासाठी घोड्याला घालतो तसा लगाम जनावरांच्या तोंडात घालावा. जेणेकरून जनावरांचे तोंड सतत उघडून पोटातील अमोनिया वायू बाहेर पडेल.शक्य तितक्या लवकर पशुवैद्यकाकडून उपचार करून घ्यावेत.

प्रतिबंधात्मक उपाय

 शेतात पेरणी सुरू असताना खतांची पोती उघडी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. पोत्याचे तोंड व्यवस्थित बांधून घ्यावे.

 मोकळी सोडलेली जनावरे खत खाणार नाहीत याची काळजी घ्यावी.

 पशुखाद्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात युरियाचा वापर करू नये.

 पशुखाद्य पोती आणि खताची पोती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावीत.

 युरियाची प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीनची पेंड किंवा सोयाबीनचा भरडा जनावरांना खाऊ घालू नये.

ज्वारीचे कोवळे पोंगे खाल्यामुळे होणारी विषबाधा

या विषबाधेला ‘किरळ लागणे’ असेही म्हणतात.

कारणे

 ज्वारीच्या कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. जनावरांनी पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड जनावरांमध्ये विषबाधा करते.

लक्षणे

 जनावरांनी ज्वारीचे कोवळे पोंगे जास्त प्रमाणात खाल्ले तर जनावरांचा मृत्यू होऊ शकतो.

 कमी प्रमाणात पोंगे खाल्ले तर जनावराचे पोट फुगते, जनावर अस्वस्थ होते.

 श्‍वासोच्छ्वास व ह्रदयाचे ठोके वाढतात. श्‍वसनाला त्रास होतो. जनावरे थरथर कापते.

उपचार

 जनावरांचे पोट फुगलेले असते. त्यामुळे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तातडीने उपचार करावेत.

प्रतिबंधात्मक उपाय

 जनावरे ज्वारीचे कोवळे पोंगे खाणार नाहीत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे.

 जर ज्वारीचे पीक लहान अवस्थेतेत वाया गेले असेल, तर असे पोंगे उन्हात वाळविल्यानंतरच खाऊ घालावेत. कारण उन्हात वाळविल्यानंतर त्यातील विषारी घटकांचे प्रमाण कमी होते.

 ज्वारीचे पीक कापून काढल्यानंतर काही शेतकरी ज्वारीच्या शेताला पुन्हा पाणी देतात. त्यामुळे पुन्हा ज्वारीचे पोंगे फुटतात. अशा शेतामध्ये जनावरे चरण्यासाठी सोडू नयेत.

- डॉ. बाबासाहेब घुमरे,

: ९४२१९८४६८१

- डॉ. विकास कारंडे,

: ९४२००८०३२३

(पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील, पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com