Animal Care : तंत्रज्ञान, व्यवस्थापनातूनच गोशाळा होतील सक्षम

गोशाळांच्या विकासाचे विविध तांत्रिक मुद्दे आत्मसात केल्यास भारतीय गोवंश आज नोंदणीकृत असणाऱ्या ५३ जातींतून समृद्ध करण्याचे कार्य घडू शकेल. राज्यात गो पैदास धोरणाबाबत नियमित चर्चा घडवून आणणारा पाठपुरावा गोशाळांनी करावा अशी अपेक्षा आहे.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. नितीन मार्कंडेय, डॉ. अमोल पाटील

भारतातील शुद्ध गोवंशाची (Cow Breed) ओळख त्यांच्या अंगीकृत गुणांमुळे असून जगभरात भारतीय गोवंश (Indian Cow Breed) वाखाणला जातो. उत्कृष्ट रोगप्रतिकारक्षमता, परजीवी प्रतिरोध, प्रतिकूल वातावरणात तग धरण्याची क्षमता, निकृष्ट चाऱ्यावर उदरनिर्वाह क्षमता, मैत्रीपूर्ण मानवी वागणूक, सकस निर्भेळ दूधनिर्मिती (Milk Production) यासह शेतीतील कर्बप्रमाण राखण्यासाठी मूत्र आणि शेण यांची उपलब्धता हे जमेचे मुद्दे आहेत.

अशा विविध गुणांमुळे नावाजलेली भारतीय गाय २१ व्या शतकात जागतिक तापमान वाढीत तग धरणारी असल्यामुळे प्राधान्याने पैदाशीसाठी परदेशात स्वीकारली गेली आहे. या दृष्टीने गोशाळांचे कार्य महत्त्वाचे ठरते. राज्यातील गोशाळा आत्मनिर्भर आणि सक्षम गोवंश निर्मिती केंद्र बनण्यासाठी काही अपेक्षा आहेत. ज्यात गोशाळांना शिफारशी आणि सूचना देणारी शासकीय यंत्रणा मदतीची ठरू शकते.

गोशाळा नोंदणीकरण आणि त्याचे नूतनीकरण आवश्यक केल्यास गोशाळांपर्यंत तांत्रिक शिफारशी पोहोचवणे शक्य होते.

उपलब्ध चारा उत्पादनाची सोय पाण्याची उपलब्धता आणि संस्थेची क्षमता यावर गोवंश संख्या सीमित करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

सुटका केलेला गोवंश, मोकाट गोवंश, सोडून दिलेला गोवंश यासाठी गोशाळा हा पर्याय समजणे नेहमी अपेक्षित नाही. कारण संख्याक्षमता यावर गो शाळेत बंधने असावीत.

Animal Care
Animal care : गाई, म्हशींमध्ये आनुवंशिक सुधारणा महत्वाची...

गोशाळेकडे किमान गरजा पुरवणारे गोठे आणि गाईंसाठी किमान आवश्यक छताखाली आणि छताबाहेर जागा उपलब्ध असणे आवश्यक असते.

चारा उत्पादन, साठा, नियोजन या बाबी गोशाळेत गरजेच्या असतात. गोवंशाचा आहार, चारा पाणी याबाबत उपलब्धता असण्याची खात्री अधून मधून बाह्य यंत्रणेकडून होणे महत्त्वाचे ठरते.

गोवंशनिहाय आणि लिंगनिहाय वर्गीकरण केलेल्या गटात गायींचा सांभाळ अपेक्षित असतो.

जिल्हा प्रशासनाकडे शिफारस केलेले पशुसंवर्धन खात्याचे पैदास धोरण गोशाळांनी अवलंबावे.

महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या शिफारशी शुद्ध गोवंश संवर्धनासाठी अवलंबाव्यात.

गोशाळेतील गोधनाबाबत रोग प्रादुर्भाव, रोग चाचण्या, लसीकरण, आरोग्य नियंत्रण याबाबत पशुसंवर्धन खात्याचे नियंत्रण असावे.

गोशाळेतील वृद्ध, अपंग, आजारी, विकलांग, अशक्त गोवंश निरोगी गाईपासून वेगळा सांभाळावा.

Animal Care
Animal Care : म्हशींमधील दुग्धज्वराकडे नको दुर्लक्ष

गोविज्ञान आधारित तांत्रिक तपासणी अहवाल गोशाळा बाबत शासनास सादर करणे पशुसंवर्धन खात्याचे सहामाही कर्तव्य असावे.

गो शाळेत पशू कल्याण कायद्याच्या तरतुदी तंतोतंत पाळल्या जात असल्याबाबत प्रमाणीकरण अहवाल पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी लिखित नोंदवावा.

गो शाळेत एकही वंशरहित पैदास होणार नाही यासाठी सतर्कता अपेक्षित असते.

गोशाळेत एक गोवंश शुद्धीकरण सक्षमीकरण अभियान राबविले जावे. गोशाळेत २५ शुद्ध गोवंश, तर ५० वंशरहित गाई वंश शुद्धीकरणात असाव्यात.

सर्व कारभार पारदर्शक आणि जनतेसाठी उपलब्ध असल्यास गोशाळांना सामाजिक साह्य मिळण्याचे स्रोत वाढतात.

गोशाळा आत्मनिर्भर असतीलच असे नाही, मात्र त्यांचे कार्य आत्मनिर्भरतेकडे सदैव असावे. या दृष्टीने शासन अथवा इतर संस्थांचा अंकुश गोशाळेवर नसावा.

गो शाळेतील गोधनाच्या नोंदी अद्ययावत ठेवून गैर मार्गाने होणारी गो विक्री प्रतिबंधित केली जावी.

Animal Care
Animal Care : ओळखा उरमोडी आजाराची लक्षणे

राज्यातील बहुतांश गोशाळांना शासनाचे अनुदान अपेक्षित नसून गोवंश सक्षमीकरणासाठी शासनाकडे असणाऱ्या अपेक्षा पशुवैद्यकीय सेवेबाबत आहेत. शुद्ध पैदास अवलंबण्याचे तंत्र, गायरान जमिनी चारा उत्पादनासाठी वाटप, शासनाचे सर्व कर आणि कर प्राप्त नोंदणी माफी, गो उत्पादन विक्रीसाठी चालना, चारा उत्पादन उपक्रमात प्राधान्य अशा रास्त मागण्या असून, त्याबाबत जलद कार्यवाही आणि नियमावली अपेक्षित आहे.

राज्यातील पशुवैद्यक विद्यापीठाचे अंतरवासिता काळातील विद्यार्थी गोशाळेत नियमित नियुक्त केल्यास गो आरोग्य आणि गो सांभाळ चांगल्या प्रकारे घडू शकेल. या शिकवू पशुवैद्यकांची सेवा रोगनिदान खाद्य नियंत्रण परजीवी नियंत्रण आणि नोंदवह्या मजबुतीकरण यासाठी सहज होऊ शकते.

Animal Care
Animal Care : गोशाळांसाठी तंत्रज्ञान, गुणवत्ता महत्त्वाची...

शुद्ध गोवंशासाठी माज संकलन गर्भधारणा तपासणी प्रसूती नियंत्रण अशा अनेक बाबी विद्यार्थी अवलंबून शकतील. गो अभ्यासासाठी आणि पदव्युत्तर पशुवैद्यक विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी गोशाळा उपलब्ध ठरू शकतात. प्रशिक्षणासाठी गोशाळांची उपलब्धी अपेक्षित आहे. गोशाळांनी मागणी केल्यास पशुवैद्यक विद्यापीठातील तज्ज्ञ गोशाळांसाठी तांत्रिक मार्गदर्शनाकरिता प्रत्यक्ष भेटी देऊ शकतात.

धर्मार्थ उपक्रमात गोशाळा वर्षानुवर्षे कार्यरत असून तिथे गो शुद्धीकरण, गोवंश याबाबत विचार होत नाही. केंद्रातील गाई नंदी समजल्या जाणाऱ्या गीर सदृश वळूकडून भरविल्या जात असल्याने वंशरहित पैदास निर्माण होत राहते. यामध्ये तातडीने तांत्रिक सुधारणा आवश्यक आहे.

गोवंश पैदास केंद्र

गोवंश पैदास किंवा विकास केंद्र अशी संकल्पना असणाऱ्या गोशाळा राज्यात अपेक्षित असून, त्याबाबत सजगता निर्माण होणे गरजेचे आहे. शुद्ध गोवंश पैदाशीतून संवर्धन करण्याचा हेतू साध्य करण्यासाठी काही गोशाळा एकवंशीय शुद्ध गोधन सांभाळण्यासाठी सरसावणे अपेक्षित आहे.

विभाग, जिल्हा, प्रक्षेत्र, प्रभाग निहाय स्थानिक असणाऱ्या गोवंशाचे संवर्धन आणि विकास अशी भूमिका राबवण्यासाठी गोशाळा गरजेच्या आहेत. अशा गोशाळेत अगदी संख्येने कमी असला तरी किमान २५ टक्के कोणत्याही एका जातीचा संख्यात्मक गोवंश असणे अपेक्षित आहे. या गोशाळेची ओळखच मुळात स्थानिक गोवंश पैदास व विकास केंद्र म्हणून घडू शकेल.

गोवंश पैदास केंद्रात अपेक्षित असणारा ५० टक्के वंशरहित गोवंश पैदाशीसाठी वापरण्यास नियमावली आहे. मात्र त्यातील तांत्रिक बाबी समजण्यास पशुवैद्यकाची गरज अनिवार्य ठरते. वंशरहित गोवंश सतत सात पिढ्या एकाच शुद्ध गोवंशाशी नरवापरातून पैदास केल्यास सातवी पिढी शुद्ध समजली जाते. यात ५०, ७५, ८७.५, ९३.७५... अशाप्रकारे ९९.९ टक्के प्रमाण नर गोवंशाच्या जातीचे वाढवता येऊन शुद्ध गोवंश निर्माण करता येतो. मात्र एकाच जातीचा नर सतत सात पिढ्या वापरणे, नोंदी ठेवणे गरजेचे ठरते.

वंशरहित पशुधन दूध अथवा शेती काम यांच्या उपयुक्ततेवर वर्गीकृत करून देशी गोवंशाच्या दुधाच्या तसेच शेती कामाच्या शुद्ध जाती निर्माण करता येतात. वंशरहित दुधाची गाय देवणी, गीर, साहिवाल, थारपारकर तर वंशरहित गाई शेतीकामाच्या उपयुक्ततेच्या गोऱ्ह्यासाठी खिलार, डांगी वळूकडून भरविल्यास तसा शुद्ध वंश निर्माण होतो. या पैदाशीत गाईची उपयुक्तता अचूक ओळखणे आणि स्थानिक सुलभ वातावरणाशी जुळणारा नर गोवंश सतत सात पिढ्या वापरणे गरजेचे असते.

कृत्रिम रेतन तंत्रात अनैसर्गिक कोणताही भाग नसून प्रजनन सुलभता आणि संख्यात्मक उच्चता राखणारी पैदास अवलंबली जाते. वंशरहित गायी दूध किंवा शेती कामाच्या उपयुक्तता बाबत असमर्थ ठरल्यास त्यांची पैदास कृत्रिम रेतनाद्वारे संकरित वंशात करता येणे शक्य आहे. अशा संकरित पैदाशीची वासरे गोशाळेत न सांभाळता तरुण उद्योजकांना वितरित करता येतात. मात्र वंशरहित गोवंशाचा होणारा सदुपयोग संकरीकरणामुळे वाढवता येतो.

गोवंशाबाबत तत्काळ सुधारणा गेल्या शंभर वर्षांत झाल्या नाहीत, त्याचे कारणच दीर्घकालीन पैदाशीसाठी असणारी उदासीनता. मात्र देशी गोवंश शुद्धीकरण पैदास आणि विकास यासाठी झटणाऱ्या गोशाळा खऱ्या अर्थाने गोसंवर्धनात सहभागी असतात. राज्यातील प्रत्येक गोशाळेत गो पैदास विषयावर चिंतन मनन आणि कृती घडावी अशी अपेक्षा आहे.

गोधाम केंद्र

गोधाम म्हणजे गो दुग्ध धाम अर्थात दूध पुरवणारी गोशाळा. चांगला गोवंश सांभाळत समाजास दूध पुरवठा करणारी गोशाळा अनेक ठिकाणी दिसून येते. या केंद्रात गो सांभाळ व्यावसायिक दृष्टीने आणि आदर्श पशुव्यवस्थापन पद्धतीने केला जातो. गायींच्या आरोग्याची आणि उत्पादनाची नियमित काळजी घेताना उत्पादकता सलग ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. गायींचे सुलभ प्रजनन आणि शाश्वत व्यावसायिकतेशी या गोशाळा बांधील असतात.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती यावर भर देऊन व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र अशी ओळख निर्माण करतात. अधिक दूध देणाऱ्या गोवंश जाती इथे सांभाळल्या जात असल्या तरी अनेक कमी दूध देणाऱ्या गायी जोपासल्या जातात. शहरी वस्ती जवळ असणाऱ्या गोशाळा शेणखत आणि गोमूत्र यांची विक्रीही करतात.

- डॉ. नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१ (पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com