Vegetable Production
Vegetable Production Agrowon
यशोगाथा

Vegetable Production : फळबागेला दिली भाजीपाला पिकांची जोड

एकनाथ पवार

कुडाळ-वेंगुर्ला मार्गावर कुडाळ शहरापासून ११ कि.मी. अंतरावर वेतोरे हे गाव आहे. या गावाचे संपूर्ण अर्थकारणच प्रामुख्याने भाजीपाला आणि फळपिकांवर अवलंबून आहे.

संपूर्ण जिल्ह्याला भाजीपाला (Vegetable) पुरवणाऱ्या गावातील दरवर्षीची उलाढाल २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. येथील शेतकरी नियोजनबद्ध भाजीपाला शेती (Vegetable Farming) करतात. सोबत भात (Paddy) आणि आंबा (Mango), काजू ही कोकणातील पिके आहेतच.

खरीप हंगामात चिबूड, कणगर सुरण अशा कंदपिकांसोबत दोडका, पडवळ, डोंगरी मिरची, भोपळा, कारले, वाल अशी विविध पिके घेतली जातात.

या गावातील पालकरवाडी येथे विजय पुंडलिक नाईक यांचे घर व शेती आहे. नाजूक आर्थिक स्थितीमुळे शिक्षण पाचवीपर्यंत झाल्यानंतर वडिलांच्या मदतीला पूर्ण वेळ शेतीमध्ये उतरले.

पारंपरिक पद्धतीने भात, नाचणी (Ragi) अशी पिके घेताना अपेक्षित फायदा होत नव्हता. परिणामी, शेतीसोबत मोलमजुरीही केली. काही वर्षे त्यांनी चिरेखाणीवर काम केले.

पाच, सहा वर्षांच्या अनुभवानंतर स्वतःचा चिरेखाण व्यवसाय सुरू केला. मात्र त्यांचा मुळचा ओढा हा शेतीकडेच होता. कारण अन्य कोणत्याही व्यवसायापेक्षा शेतीच शाश्‍वत असा त्यांचा विचार आहे.

जमीन खरेदी व फळबाग लागवड -

- पूर्वी त्यांच्याकडे १० एकर शेती होती. त्याला जोड म्हणून गावातच ७ एकर जमीन खरेदी केली. मात्र त्यात कातळ असल्याने जमिनीत थेट कसलीच लागवड करता येत नव्हती. मग त्यांनी मिळेल तिथून सुपीक माती आणून टाकण्यास सुरुवात केली. ५०० पेक्षा अधिक डंपर त्यांनी या जमिनीत टाकले.

-हापूस आंबा लागवड करण्यासाठी कातळ जमिनीत खड्डे खोदून घेतले. ते माती, शेणखत, लेंडीखत आणि आजूबाजूचा पालापाचोळा यांच्या साह्याने भरून घेतले. कातळ आणि चढ-उताराच्या जमिनीमुळे अनेक अडचणी आल्या तरी ते हटले नाहीत.

दरवर्षी थोडी थोडी करून आंबा लागवड केली. तसेच शेतीमध्ये काजू लागवडही केली. आता या फळबागातून उत्पादन सुरू झाले आहे.

आदर्शवत आंबा, काजू बाग

आपल्या बागेमध्ये स्वतः विजय दिवसरात्र कामगारांसोबत काम करत असतात. सतत फिरताना त्यांची नजर प्रत्येक झाडांवर फिरत फळांची वाढ, कीड-रोगांचा प्रादुर्भाव तपासत असते. एखादी कीड-रोग आढळताच, त्यावर त्वरित उपाय केले जातात.

- तण खाई धन या उक्ती लक्षात ठेवून वेळीच तण काढणी, बागेची साफसफाई केली जाते. जिल्ह्यातील अनेक बागांमध्ये अजूनही तणे वाढलेली दिसत असली तरी नाईक यांच्या बागेत सुमारे दीड महिन्यांपूर्वीच झालेली तणे काढून झाली आहेत.

अशा आदर्शवत व्यवस्थापनामुळे अनेक कृषी अधिकारी परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या बाग व्यवस्थापनाचे उदाहरण देतात.

प्रयोगशील शेतकरी -

विजय नाईक यांच्याकडे खरीप हंगामात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. त्यात दोडका, पडवळ, कारले, वाल, वांगी, भोपळा, चिबूड इ. पिके असतात. यातून मिळणारे ताजे उत्पन्न किरकोळ खर्चासाठी उपयोगी पडते.

कोणतीही गोष्ट शक्य नाही, म्हटले की इरिशिरीने करण्याचा त्यांचा स्वभाव. त्यामुळे शेतीत सतत प्रयोग सुरू असतात.

एकेकाळी कुणी त्यांना कातळावर कसा भात घेणार असे उचकावले. मग काय २० गुंठे कातळ जमिनीमध्ये माती व भरपूर शेणखत टाकून भातपीक घेण्यास सुरुवात केली. त्यातून १० क्विंटल इतके भात उत्पादन हाती येते.

पिके आणि त्याचा ताळेबंद ः

-शेतीतील ५० वर्षांचा अनुभव,

-एकूण शेती ः २० एकर.

१) आंबा उत्पादन ः

- आंबा ः १० एकर, ४०० उत्पादनक्षम झाडे, ३५ ते ४० फूट अंतरावर लागवड. गेल्या हंगामात आंबा उत्पादन २ हजार पेटी. कमाल दर ३ ते ४ हजार रुपये प्रति पेटी असला तरी सरासरी दर १ हजार २०० रुपये मिळाला.

मागील तीन वर्षाचे आंबा उत्पादन

वर्ष --- आंबा --- उत्पादन --- दर (रुपये प्रति पेटी) --- उत्पन्न (रु.)

२०२० --- १४०० पेटी --- १००० --- १४ लाख

२०२१ --- १५०० पेटी --- १००० --- १५ लाख

२०२२ --- २००० पेटी --- १२०० --- २४ लाख.

-विजय नाईक कच्चा आंबा वाशी मार्केटमध्ये पाठवितात. याशिवाय पक्व आंबा बेळगाव, कुरुंदवाड, निपाणी, पुणे या भागांत पाठवितात.

-आंबा उत्पादनामध्ये सेंद्रिय घटकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्यामुळे आंब्यात साक्याचे प्रमाण अत्यल्प राहते. परिणामी आंब्याला मोठी मागणी राहते.

-काढणीसाठी कामगारांची मदत घेतली जाते. मात्र पॅकिंग व अन्य कामांसाठी आंबा हंगामात पत्नी, दोन मुलगे, दोन सुना, चार नातवंडे असे सर्व कुटुंबच शेतात राबते.

२) काजू ः पाच एकर, ५०० झाडे, १५ ते २० फूट अंतरावर लागवड. सरासरी ५ टन उत्पादन, प्रतिटन दर १२० रुपये. काजूची उलाढाल ६ लाख रुपये.

३) नारळ, सुपारी ः २५ गुठे, नारळ ८० झाडे आणि सुपारी २०० झाडे. खर्च वजा जाता २५ हजार रुपये शिल्लक राहतात.

४) खरिपात चिबूड, भोपळा, कारले, दोडका, पडवळ इ. पिके ३० गुंठ्यांत घेतली जातात. यासोबत काही भाज्या फळबागेमध्ये घेतल्या जातात. यातून १ लाख रुपये उत्पन्न मिळते. खर्च वजा ४० ते ५० हजार शिल्लक राहतात.

शेतीसाठी आर्थिक तरतूद

- बागेत कायमस्वरूपी ५ पुरुष आणि २ महिला काम करतात. काढणीवेळी अधिक मजूर घेतले जातात. - ८ लाख रुपये,

- पीक संरक्षणासाठी -३ लाख रुपये.

- सेंद्रिय व रासायनिक खते खरेदीकरिता- ४ लाख रुपये.

- पॅकेजिंगकरिता-१ लाख ५० हजार रुपये.

गुंतवणूक ः

-स्वगुंतवणुकीतून २००० या वर्षी ७ एकर आणि २००५ या वर्षी तीन एकर अशी शेत जमीन खरेदी.

-स्वतःच्या ५ टन काजूवर प्रक्रियेच्या उद्देशाने काजू प्रकिया उद्योग सुरू केला. २०१३ मध्ये बॅंकेकडून कर्जाऊ ६० लाख रु. घेतले, तर स्वभांडवल १० लाख रुपये घातले आहे. इमारत बांधणीकरिता ५ लाख रुपये खर्च केले. यासाठी खादी ग्रामोद्योगकडून अनुदान म्हणून ३ लाख रुपये मिळाले. आता त्यात पूर्ण क्षमतेने ६० टन काजू बीवर प्रकिया केली जाते.

- दरवर्षी एक दोन या प्रमाणे शेतीसाठी आवश्यक ती यंत्रे, उपकरणे खरेदी केली आहेत. त्यात पॉवर टिलर, पॉवर विडर, फवारणी पंप, चार ग्रासकटर इ. यंत्रांचा समावेश आहे.

-सिंचनाकरिता ७ लाख रुपये खर्चून विहीर खोदली.

विजय पुंडलिक नाईक, ९५४५०७६०५७

(वेतोरे, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

River Sludge : शेतकऱ्यांने स्वखर्चाने काढला नदीपात्रातील गाळ

Manoj Jarange Patil : बीडच्या दुष्काळ स्थितीचा मनोज जरांगे यांच्या सभेला फटका

Pre Monsoon Rain : वळवाच्या पावसाची अनेक ठिकाणी हजेरी

Omraje Nimbalkar : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचे तिन तेरा; गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ओमराजे निंबाळकर यांची मागणी

Agrotourism Income : कृषी पर्यटनातून साधावी उत्पन्न वाढीची संधी

SCROLL FOR NEXT