
गडचिरोली ः दुर्गम गडचिरोली जिल्ह्यात धानाच्या (Paddy Farming) जोडीला परसबागांमध्ये भाजीपाला उत्पादनाला (Vegetable Production) प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने पुढाकार घेतला असून, त्याअंतर्गत एका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्हा हा भात उत्पादक म्हणून ओळखला जातो. दुर्गम आणि नक्षलप्रवण या जिल्ह्यात महिलांमध्ये कुपोषणाची समस्या आहे त्यामुळेच हे क्षेत्र अविकसित राहिले आहे. त्याची दखल घेत या प्रदेशातील परसबागामध्ये हंगामी भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने घेतला आहे.
आदिवासी उपयोजनेअंतर्गत या संकल्पनेवर काम केले जात आहे. याच भागात काही वर्षांपूर्वी संस्थेने १०००० लिंबू रोपांचे वाटप केले होते. या झाडांचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करता यावे याकरिता लिंबूवर्गीय फळ उत्पादनावर प्रशिक्षण कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आला.
संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अनुज तारे, प्रधान शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष मुरकुटे, डॉ. नरेश मेश्राम, केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सदीप कऱ्हाळे यांची या वेळी उपस्थिती होती. आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचावे याकरिता लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था प्रयत्नरत राहील, असा विश्वास या वेळी बोलताना डॉ. दिलीप घोष यांनी बोलताना व्यक्त केला.
शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही या वेळी बोलताना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. यावेळी आदिवासी महिलांना २००० भाजीपाला बियाणे किटचे वितरण करण्यात आले. केव्हीके गडचिरोलीच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या बायोफर्टिलायझर उत्पादन आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन यावेळी डॉ. घोष यांच्या हस्ते पार पडले.
केव्हीके प्रशासनाच्या विनंतीनुसार हे केंद्र उभारण्यासाठी सीसीआरआयने पुढाकार घेतला होता. त्यानुसार लॅमिनार एअरफ्लो कॅबिनेट, ऑटोक्लेव्ह, बीओडी इनक्युबेटर, पीएच मीटर, वजन मापक आदी साहित्य केव्हीकेला आदिवासी उपयोजने अंतर्गत देण्यात आले. या माध्यमातून उत्पादित खते नैसर्गिक शेतीला बळ देतील, असा विश्वास यावेळी डॉ. घोष यांनी व्यक्त केला. केव्हीकेच्या उपक्रमांचेही त्यांनी यावेळी विशेष कौतुक केले. संदीप कऱ्हाळे यांनी सूत्रसंचालन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.