Red Chilli Agrowon
यशोगाथा

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका ठिकाणापासून वीस किलोमीटरवर वाढोणा बाजार हे सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. कापूस व अन्य हंगामी पिके गावात होत असली, तरी लाल मिरचीच्या शेतीत या गावाने आपली सर्वदूर ओळख निर्माण केली आहे. गावातील संदीप हांडे हे प्रगतिशील, प्रयोगशील व अभ्यासू मिरची उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सांगतात, की आमच्या गावात तशी मिरचीची शेती पूर्वीपासूनच व्हायची. पण ती व्यावसायिक स्तरावर नव्हती. घरापुरती काही क्षेत्रावर मर्यादित असायची. सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील मिरची उत्पादक आमच्या भागात मिरचीची शेती खंडाने करण्यासाठी येऊ लागले. त्यांना त्यापासून मिळत असलेले उत्पादन व नफा पाहून आमच्या गावातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली. आणि हळूहळू गावात मिरचीच्या व्यावसायिक शेतीला चालना मिळाली.

गावातील मिरची क्षेत्र

मिरची उत्पादक हांडे यांच्या अंदाजानुसार गाव परिसरात मिरचीचे क्षेत्र २०० एकरांच्या आसपास असावे. गावशिवारात मिरची उत्पादकांची संख्या ५० ते ६० पर्यंत असावी. आंध्र प्रदेशातूनही येथे वसलेले काही शेतकरी आहेत. परिसरातील काही गावांमध्येही मिरची उत्पादन होते. हांडे सांगतात, की मागील हंगामात अपेक्षित दर न मिळाल्याने यंदा गावातील मिरची लागवड क्षेत्रात घट होत ते १७५ एकरांपर्यंत खाली आले असावे. माझा या पिकात सात वर्षांचा अनुभव असून, दरवर्षी माझे पाच ते दहा एकर क्षेत्र असते. यंदा मी देखील तीन एकरच क्षेत्र ठेवले आहे. या पिकाला खर्च खूप करावा लागतो. व्यवस्थापन खूप काळजीपूर्वक करावे लागते. मजूरबळाची समस्याही आहे. अशावेळी दर मनासारखे न मिळाल्यास आर्थिक नुकसान मोठे होते. अनेकवेळा हाती काहीही उरत नाही.अर्थात, दरवर्षी पिकात सातत्य ठेवल्यास फायदा नक्की होतो. हांडे यांच्यासह गावातील गोलू जाधव व करंजी येथील राजू खंडारकर यांनीही या पिकात हातखंडा तयार केला आहे.

...अशी होते मिरचीची शेती

गावातील बहुतांश शेतकरी आपल्या मिरची क्षेत्रानुसार आपल्याच शेतात रोपवाटिका तयार करतात. त्यानुसार ऑगस्टच्या दरम्यान पुनर्लागवड होते. गावात मिरचीचा हंगाम जोर धरत असतो त्या वेळी कापूस, तूर या पिकांतील मजुरी कामे आटोपलेली असतात. नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यात धानपट्ट्यातील कामेही संपलेली असतात त्यामुळे या जिल्ह्याच्या मूल, सावली, ब्रह्मपुरी या तालुक्‍यांतील मजूर ऑगस्टच्या दरम्यान मिरची शेतीसाठी उपलब्ध होतात. डिसेंबरच्या अखेर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिरची तोडणीस येते. हिरवी मिरची न तोडता झाडावरच ती लाल तयार केली जाते. त्यानंतर तोडा होऊन पुढे सुमारे २० दिवस शेतावरील खळ्यात ती सुकविली जाते. लाल मिरचीसाठी खासगी कंपन्यांच्या खास वाणांची निवड शेतकरी करतात. ही मिरची तुलनेने थोडी जाड असते. त्यास बाजारात व्यापाऱ्यांकडून चांगली मागणी राहते.

उत्पादन, विक्री व दर

हांडे सांगतात, की तंत्रशुद्ध, काटेकोर व्यवस्थापन व हवामान या बाबी जुळून आल्यास वाळवलेल्या लाल मिरचीचे एकरी ३० ते कमाल ४० क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळते. ही लाल मिरची नागपूरच्या कळमना बाजारपेठेत पाठवली जाते. गावापासूनचे हे अंतर सुमारे १२५ किलोमीटर आहे. प्रति ट्रकमध्ये विविध शेतकऱ्यांची मिळून २५० ते ३०० पोती असतात. मिरचीला किलोला २०० ते २२० रुपयांपर्यंत दर मिळतो. कमाल दर एक वर्ष २७० रुपयांपर्यंतही मिळाला होता. मागील वर्षी मात्र दर खूप खाली म्हणजे १४० ते १२० रुपयांपर्यंत घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

गावचे अर्थकारण सुधारले

मिरची पिकामुळे गावचे अर्थकारण सुधारण्यास मदत झाल्याचे हांडे सांगतात. एकरी ३० क्विंटल उत्पादन (वाळलेली मिरची) व समाधानकारक दर मिळाल्यास या पिकातून समाधानकारक कमाई होते. लागवडीपासून ते काढणी, सुकवणी प्रक्रियेपर्यंत खर्च मात्र किमान दीड ते दोन लाखांपर्यंत असतो. याच पिकाच्या अर्थकारणातून शेतकऱ्यांना घरे बांधता आली. कर्ज फेडता आले. यापूर्वी कापूस पिकावरच मुख्य भिस्त होती. त्यातून केवळ ३० टक्केच नफा मिळायचा. मिरचीतून त्या तुलनेत दुप्पट नफा मिळू लागला. शेतकऱ्यांमध्ये उत्साह, प्रतिकूलतेशी सामना करण्याची हिंमत तयार झाली असे हांडे यांनी सांगितले. गावात या पिकातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल शक्य झाली आहे. वाढोणा परिसरातील करंजी, पिंपळगाव, चिखली, मेडशी, आठमुर्डी, पिंपळगाव (सावनेर) ही गावेही मिरची शेतीसाठी ओळखली जाऊ लागली आहेत. मिरची पिकासाठी हेक्‍टरी १६ हजार रुपयांचे अनुदान आहे. बेंबळा प्रकल्पाच्या कालव्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. त्याचा लाभ मिरची उत्पादकांना होत असल्याचे तालुका कृषी अधिकारी अमोल जोशी सांगतात.

आंध्रातील शेतकरी करताहेत वाढोण्यात शेती

आंध्र प्रदेश हे राज्य मिरचीसाठी देशात प्रसिद्ध आहे. मात्र मागील काही वर्षांत येथील मिरची पट्ट्यात मजूर व पाणीटंचाई आदी समस्या तयार झाल्या. अशावेळी काही वर्षांपूर्वी तालाकोंडा पाडू (कनगेरी, जि. प्रकाशम, आंध्र प्रदेश) येथील श्रीनिवासालू व्यंकटस्वामी नेलाकोत्ती यांच्या वडिलांनी सहकाऱ्यांसमवेत नजीकच्या यवतमाळ जिल्ह्याची वाट धरली. ते वाढोणा बाजार परिसरात आले. स्थानिक शेतकऱ्यांची शेती करारावर कसण्यास त्यांनी सुरुवात केली. श्रीनिवासालू यांनीही आज वडिलांचा वारसा जपत मिरची पिकात सातत्य ठेवले आहे. आई सुब्बमा, वडील व्यंकटस्वामी व पत्नी सौभाग्यम यांच्यासोबत ते वाढोणा येथेच राहतात. शिक्षणाच्या निमित्ताने मुलांना मात्र त्यांनी गावी ठेवले आहे. वाढोणा बाजार गावात आजच्या घडीला आंध्रातील सुमारे दहा शेतकरी करारावर मिरची उत्पादन घेत आहेत. पीक व्यवस्थापन काटेकोरपणे करणे शक्‍य व्हावे यासाठी संपूर्ण हंगाम ते या भागात राहतात. त्यासाठी शेतातच तात्पुरता निवारा उभारला जातो. मे महिन्यात हंगाम संपल्यानंतरच ते गावी परततात.

संदीप हांडे ८३२९३६८३९६

श्रीनिवासालू नेलाकोत्ती ९५२७२४९०९१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Policy : जगात भारतीय शेतकरी सरकारी धोरणांचे बळी; देशात सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना नकारात्मक आधार

Cotton Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे नुकसान

Vidhansabha Election Amravati : अमरावती जिल्ह्यात वाढले एक लाखांवर मतदार

Women And Child Development State Level Award : परभणी जिल्ह्याला महिला, बाल विकासचा राज्यस्तरीय पुरस्कार

Kolhapur Market Committee : तोलाईदारांच्या वेतनाचा पेच कायम, बाजार समिती अन् अडत्यांनी दाखवले एकमेकांकडे बोट

SCROLL FOR NEXT