Agriculture Story : येडशी (ता. जि. धाराशिव) येथील अशोक मोहिते यंदाच्या मेमध्ये दुय्यम निबंधक पदावरून मुंबई येथून निवृत्त झाले. शेती हेच सेवानिवृत्तीनंतरच्या आनंद, सुखाचे साधन मानून त्यात पूर्णवेळ त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. येडशी ते सोनेगाव रस्त्यालगत त्यांची वडिलोपार्जित साडेचार एकर माळरान जमीन होती. वडील (कै.) रामलिंग व आई मंजुळाबाई यांनी याच जमिनीत राबत अशोक यांना शिकवले. लातूर येथून एमकॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सन १९९१ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून त्यांची मंत्रालयात लिपिक टंकलेखक म्हणून निवड झाली. राज्य निवड मंडळाच्या परीक्षेतून १९९३ मध्ये मुद्रांक व नोंदणी विभागात दुय्यम निबंधकपदी निवड झाली. त्यानंतर माळशिरस, छत्रपती संभाजीनगर, कळंब, किनवट, तुळजापूर, उमरगा, कोल्हापूर, लातूर, पुणे व मुंबई असा सुमारे ३२ वर्षांचा अशोक यांचा नोकरीतील प्रवास राहिला.
नोकरी काळातही शेतीची आवड जपली
नोकरीत अशोक यांच्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. परंतु शेतीची नाळ त्यांनी तुटू दिली नाही. सुट्टीच्या दिवशी घरी येऊन ते शेतात राबायचे. नोकरी व शेतीतील उत्पन्नातून आपल्या शेतीनजिकच माळरानाची जमीन ते खरेदी करीत गेले. माळरान जमिनीत वरच्या बाजूला लाल माती सोडली तर खाली दगडच होता. त्यामुळे कमी किमतीत जमीन मिळाली होती. मग जमिनीत दोन फूट खोल व तीन फूट उंचीची चारी खोदून त्यात जमिनीवरील माती भरली. त्यावर गवत, पालापाचोळा अंथरून तो कुजवला. खते, कीडनाशके यांची प्रक्रिया केली. जमीन लागवडयोग्य केली.
द्राक्ष, डाळिंबाचे प्रयोग
तयार केलेल्या जमिनीत पाच एकरांत द्राक्ष लागवड केली. नोकरी आणि शेती अशी दुहेरी कसरत करीतच सुमारे पंधरा वर्षे द्राक्ष बागेतून दर्जेदार उत्पादन घेतले. पुढे पाणी व मजुरांचा तुटवडा भासू लागल्याने २०१५ मध्ये द्राक्ष बाग काढावी लागली. त्यानंतर डाळिंबाचा पर्याय त्यांनी स्वीकारला. पाच वर्षे त्याचेही उत्पादन घेतले. मात्र पाणी, अपुरे मजूरबळ याबरोबरच तेलकट डाग रोगाचीही समस्या जाणवू लागली. अशावेळी हे पीकही घेणे थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागला. एव्हाना माळरान जमिनीचे क्षेत्र १८ एकर झाले होते. अभ्यासाअंती आंबा हे पीक भौगोलिक, पाणी व मजूरबळ अशा सर्व अंगांनी अधिक किफायतशीर वाटले. त्यानुसार एक एकरांत हापूस आंबा म्हणून लागवड झाली खरी.
पण अनुभव नसल्याने ते बदाम व अन्य प्रकारचे आंबे निघाले. त्यामुळे पुन्हा चौकशी व सविस्तर माहिती घेऊन केसर आंब्याची टप्प्याटप्प्याने लागवड करण्यास सुरुवात केली. आजमितीस हे क्षेत्र १५ एकरांपर्यंत पोहोचले आहे.
उत्साहाने होतोय शेतीचा विकास
यंदाच्या खरिपात आंबा बागेच्या दहा एकरांत सोयाबीनचे आंतरपीक घेतले. त्याचे चांगले उत्पादन हाती आहे. सेवानिवृत्तीनंतर मनुष्य शारीरिकदृष्ट्या थकलेला असतो. पण अशोक यांना शेतात राबताना जराही थकवा जाणवत नाही. शेतीतील उत्साह कायम असून ते पूर्णवेळ शेतीत रमले आहेत.
आंब्याची सात हजारांपर्यंत झाडे आहेत. मागील वर्षी पहिले उत्पादन घेतले. परंतु ते तुलनेने कमी होते. दोन एकर बाग चार लाखांना व्यापाऱ्यांना दिली. यंदा उत्पादन वाढण्याची आशा आहे. आंब्यासोबत अन्य फळबागांचा विकासही साधला आहे. नारळाची सुमारे दोनशे, काजूची दीडशेपर्यंत झाडे आहेत. संत्रा, मोसंबी, लिंबू, रामफळ आदी फळपिकांबरोब लवंग, दालचिनी, तेजपत्ता आदींचीही झाडे मोठ्या संख्येने आहेत. नोकरीत असताना सुट्टी काळात प्रत्येक झाड डोळ्याखालून जाईल या पद्धतीने शिवारफेरी करायचो. आता सेवानिवृत्तीनंतर हाच दिनक्रम सुरू ठेवला आहे.
शेतीने दिले सर्व समाधान
अशोक नोकरीत कार्यरत असताना आई-वडिलांनी शेती नेटाने सांभाळली. पत्नी सीमा यांनीही फळबागा व शेती विकासात मोठी भर घातली. त्यामुळेच चार पैशांचा चांगला आधार होऊन गावात तसेच शेतातही घर बांधता आले. पूर्वीच्या जमिनीजवळ शेती खरेदी करता आली. त्यात ऊस व सोयाबीन आहे. नोकरीच्या काळातील बहुतांश सुट्ट्या शेतीसाठीच उपयोगात आणल्या. पहिल्या दिवसापासून शेतीने दिलेले समाधान अन्य कोठेही मिळाले नसल्याचे अशोक सांगतात. दीड एकरात ड्रॅगन फ्रूट लागवडीचे नियोजन असून आधुनिक व शाश्वत शेतीवर भर आहे.
शेततळ्याद्वारे शाश्वत पाणी
माळरान जमिनीला दोन्ही बाजूंनी उतार आहे. त्या ठिकाणी दोन विहिरी असून पावसात त्या तुडुंब भरतात. काही विंधन विहिरीही आहेत. तरीही पूर्वी उन्हाळ्यात बागेला पाणी कमी पडायचे. मागील २५ वर्षांत पाण्याच्या समस्येला सातत्याने तोंड द्यावे लागले. काही झाडे डोळ्यादेखत जळून गेली. याचे मनाला वाईट वाटले. कोरोना काळात शेतातच मुक्काम असल्याने पाण्याची समस्या निकाली काढण्याचा निर्णय घेतला. उताराच्या ठिकाणी असलेल्या दीड एकरात ३१५ बाय १८० बाय ४६ फूट क्षेत्रफळाचे शेततळे खोदले. सुमारे पाच कोटी लिटरपर्यंत त्याची पाणी साठवण क्षमता असावी असे अशोक सांगतात. वर्षभर शेततळे खोदण्याचे काम सुरू होते. त्यात प्लॅस्टिक पेपर अंथरून साठवण सुरू केली आहे. मोठ्या क्षेत्राला या पाण्याचा उपयोग होणार आहे, गरजेनुसार शेततळ्यातील पाणी विहिरीत सोडून ते ठिबकद्वारे फळबागांना देण्यात येते.
अशोक मोहिते ९५११७४००३७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.