Rural Development  Agrowon
यशोगाथा

Rural Development : आदिवासीप्रवण खामगाव समृद्धीकडे

Tribal Village Success : पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील खामगाव (ता. जुन्नर) या आदिवासी गावात विकासाच्या विविध शासकीय योजना राबविण्यात येत आहेत. त्यातून गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.

गणेश कोरे

Village Development Success : राज्यातील अनेक आदिवासी गावे आता विकासाच्या वाटेवरून चालली आहेत. पुणे जिल्ह्यात खामगाव (ता.जुन्नर) हे सह्याद्रीच्या डोंगरकपाऱ्यांमध्ये विसावलेले, सहा वाड्यावस्त्यांचे आणि सुमारे पाचहजार लोकसंख्येचे यापैकीच एक गाव आहे. शिवेची वाडी, मांगणेवाडी, आहिर वस्ती (कॉलनी), खंडोबाची वाडी, भुंडेवाडी, नेहेरकर वस्ती अशा डोंगराळ वाडी-वस्ती येथे आहेत. पूर्वी या भागात वाहतुकीच्या अनेक समस्या तयार व्हायच्या.

मात्र आता चित्र बदलले आहे. या ठिकाणच्या वाड्या-वस्त्यांमध्ये दळणवळण सुलभ व्हावे यासाठी विद्यमान खासदार शरद सोनवणे यांनी २०१७-१८ मध्ये सुमारे ४० लाख रुपयांचा निधी दिला. जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई बुचके यांच्या विशेष निधीतून रस्ते तयार करण्यात आले. विद्यमान सरपंच निलम अजिंक्य घोलप यांच्या नेतृत्वाखाली गावात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

गावातील एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रत्येक वाडी- वस्तीवर अंगणवाडी आणि जिल्हा परिषदेची शाळा ग्रामस्थांनी उभारली आहे. यात पाच शाळा आणि पाच अंगणवाड्यांचा समावेश आहे. यातील मांगणेवाडीची शाळा प्रस्तावित आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ४५० विद्यार्थ्यांना ‘स्टडी टेबल’सह अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

आदिवासींना लाभ

खामगाव हे आदिवासी प्रधान गाव असल्याने पूर्वी कुडाच्या आणि कच्च्या घरांमध्ये लोक राहायचे. मागील पाच- सहा वर्षांमध्ये १०० हून अधिक घरकुले बांधण्यात आली आहेत. यामध्ये शबरी आवास, रमाई आवास, पंतप्रधान आवास आदी योजनांचा लाभ देण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने ३० आदिवासी पदवीधारकांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनासह पुस्तकांचा संच देण्यात आला आहे.

तर १०० मच्छीमारांना मासेमारीसाठी जाळ्या आणि सुरक्षा जॅकेट्‍सही देण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना अधिक सुरक्षितता मिळण्याबरोबर मासेमारीलाही चांगली चालना मिळणार आहे. आदिवासी समाजाचे पशुधन साध्या गोठ्यामध्ये बांधले जात होते. परिसरात बिबट्याच्या सततच्या धोक्यामुळे आता १५ चांगल्या प्रकारचे गोठे मनरेगा योजनेतून देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या घर तेथे गोठा योजनेतून प्रत्येक घराला गोठा देऊन पशुसंवर्धनातून रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.

पाण्याची सोय

गावचे माजी उपसरपंच अजिंक्य घोलप म्हणाले, की माझ्या कारकिर्दीत सर्वाधिक सुमारे १७ कोटी रुपयांचा निधी माजी आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून प्राप्त झाला. त्यातून गावाला पक्का रस्ता, प्रत्येक वाडी वस्तीला वीज, आधुनिक स्मशानभूमी, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, सभामंडप आदी कामे होण्यास मदत झाली. जलजीवन योजना गावात प्रभावीपणे राबविण्यात आली आहे.

या योजनेसाठी सुमारे १२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. प्रत्येक घराला उच्च दाबाने पाणी पुरवठा व्हावा यासाठी गावातील सर्वात उंच डोंगरावर पाणी साठवण टाकी आणि शुद्धीकरण प्रकल्प फभारण्यात आला आहे. लवकरच सर्व घरांना नळजोडणी देण्यात येणार असून त्यासंबंधीची चाचणी पूर्ण झाल्यानंतर घरटी पाणी उपलब्ध होणार आहे.

जलशाश्‍वती

डोंगराळ पार्श्‍वभूमी असलेल्या अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या असते. पावसाळा संपला की खामगावातही डोंगरउतारावरून पाणी वाहून जायचे. त्यामुळे रब्बी व उन्हाळ्यात भाजीपाला पिके घेणे शक्य होत नव्हते. पीक विविधतेवरही मर्यादा यायच्या. ही समस्या लक्षात घेऊन ४२ लाख रुपयांच्या निधीतून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला जात आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, यंदाच्या पावसाळ्यात त्याचे दृश्‍य परिणाम दिसून येतील. त्याचा पुढील रब्बी हंगामाला फायदा होईल.

द नेचर कन्झरव्हन्सी’ या कंपनीच्या सुमारे ४६ लाख रुपयांच्या सामाजिक दायित्व निधीतून १५० हेक्टरवर जल- मृद्संधारणाची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये समतल चर, वृक्षारोपण, बांधबंदिस्ती, नालाकाठ वनीकरण, गॅबियन बंधारे, शेतकरी व संस्थात्मक बळकटीकरण आदी कामांचा समावेश आहे.

‘मानवलोक’ संस्थेची मदत या कामांमध्ये होत आहे. कृषी सहायक स्नेहल बोकड म्हणाल्या, की पूर्वी गावात जिरायती पिके अधिक प्रमाणात घेतली जायची. सध्या भात, सोयाबीन ही खरिपातील मुख्य पिके आहेत. रब्बीमध्ये कांदा तर उन्हाळ्यात बाजरी घेतली जाते. काही प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून खरीप पिकांमध्ये बीजप्रक्रिया तसेच ऊस पाचट आच्छादनाविषयी प्रात्यक्षिके घेण्याचे नियोजन केले आहे.

पर्यावरण समृद्धीचा प्रयत्न

गावपरिसरात असणारे ३६ एकर गायरान क्षेत्र १९८९-९० मध्ये वन विभागाकडे वर्ग करण्यात आले. या ठिकाणी कोरोना काळात वृक्ष लागवडीचा प्रयत्न झाला. मात्र अद्याप मोठे वनक्षेत्र विकसित होऊ शकले नाही. यामुळे गावाला पर्यावरण समृद्ध करायचे असेल तर देवराई असणे गरजेचे आहे हा विचार पुढे आला.

त्यातूनच जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या माध्यमातून सामाजिक दायित्व निधीतून देवराई उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामविकास आणि वन विभागाच्या सहकार्यातून गाव पर्यावरण समृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या गावात पायाभूत सुविधा जवळपास पूर्ण झाल्या असून पर्यटनातून रोजगार निर्मितीचे प्रयत्न आहेत. पर्यटन विकास आराखड्यातून जिल्ह्यात एक कोटी पर्यटक आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

नीलम घोलप (सरपंच) ७०२०८२५१५३

धनंजय डोके (ग्रामसेवक) ९८८१४०१७४६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

SCROLL FOR NEXT