Bihar Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला मतदारांनी सपशेल नाकारून ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’साठी (एनडीए) सत्तेची दारे उघडली आहेत. बिहारमध्ये भाजपचे कमळ ८९ जागांवर फुलले, तर संयुक्त जनता दलालाही (जेडीयू) चांगल्या म्हणजे ८५ जागांवर विजय प्राप्त झाला आहे. सत्तेत दीर्घकाळ राहिल्यानंतर ‘प्रस्थापितविरोधी जनभावना’ (अँटिइन्कम्बन्सी) हा घटक आतापर्यंत तरी सत्ताधाऱ्यांना दणका देत आला आहे. परंतु बिहार विधानसभा निवडणुकीत हे गृहीतक चुकीचे ठरले..एनडीएच्या अनपेक्षित यशानंतर काँग्रेसह इतरही विरोधी पक्ष या निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असताना निवडणूक आयोग मात्र मूग गिळून गप्प आहे. नितीशकुमार यांची स्वच्छ प्रतिमा, सर्व समाजघटकांत त्यांनी मिळविलेली स्वीकारार्हता, महिलांना प्रोत्साहनासाठीच्या योजना, निवडणुकीमध्ये अनुकूल जातीय समीकरणे तयार करण्याचे भाजपचे कौशल्य आणि एनडीए घटक पक्षांचा मेळ ही बिहारमधील एनडीएच्या यशाची प्रमुख कारणे सांगता येतील..Bihar Election 2025: संकेत आणि संदेश.याबरोबरच जनमानसांमध्ये विकासाची महत्त्वाकांक्षा जागविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही या विजयात निःसंशय महत्त्वाचा वाटा आहे. राहुल गांधी यांचा मतचोरीचा मतदारांनी नाकारलेला मुद्दा, निषाद समुदायाची मते मिळविण्यात आलेले अपयश आणि मुस्लिम-यादव समुदायाची अपेक्षित मतेही न पडणे ही महाआघाडीच्या अपयशाची कारणे आहेत. विरोधी आघाडीत सुरुवातीपासूनच एकजूट नव्हती त्याचाही त्यांना फटका बसला आहे..यशापयशाची कारणे काहीही सांगितली जात असली, तरी नितीशकुमार सरकारने सुमारे दीड कोटी महिलांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे मतदानापूर्वी केलेले वाटप हा मुद्दाच गेमचेंजर ठरला आहे. या पैसे वाटपाने सरकारच्या विरोधात जाणारे बहुतांश मुद्दे निष्प्रभ करून टाकले. गेल्या दोन वर्षांत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये सुद्धा सत्ताधारी आघाड्यांनी महिला मतदारांना केलेल्या मदतीचा निवडणुकीच्या निकालातून घसघशीत परतावा मिळविला आहे..Bihar Election Result: दो हजार पच्चीस...फिर से नितीश!.बिहारमध्ये याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आल्याने मत मिळविण्यासाठी सरकारी खजिना वापरणे हा गैरप्रकार असून तो कितपत योग्य आहे, असा सवालही काही ज्येष्ठ नेते आता उपस्थित करीत आहेत. अशा वेळी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सत्ताधाऱ्यांनी निवडणूकपूर्व काळात होणाऱ्या पैशाच्या वाटपावर गांभीर्याने विचार करून त्यास काही संहिता लावता येते का हे पाहावे. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची परीक्षा पाहणारी ही निवडणूक होती. परंतु त्यांचा पर्यायी राजकारणाचा मुद्दा बिहारी जनतेने नाकारला..मागील काही वर्षांपासून राज्य असो की देश त्यातील महत्त्वाचे मुद्दे, समस्या यावर निवडणूक लढविलीच जात नाही. निवडणूक जाहीरनाम्यांत केलेल्या लोकप्रिय घोषणा, जातींची समीकरणे आणि मुख्य म्हणजे थेट पैसे वाटप यांवर निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या जात आहेत. बेरोजगारी ही बिहारमधील मोठी समस्या आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांत रोजगारासाठी बिहारी जनतेचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे, होत आहे..नितीशकुमार यांची ओळख सुशासन बाबू अशी असली तरी त्यांच्याच चुकीच्या धोरणांमुळे शेती, शिक्षण, उद्योग, आरोग्य अशा सर्वांमध्ये अतिमागास राज्य म्हणून बिहारची ओळख आहे. गंभीर बाब म्हणजे सत्तारूढ एनडीए जवळ या समस्यांचे समाधान करणारा अजेंडा देखील नाही. बिहार राज्यावर एकीकडे कर्जाचा वाढता बोजा तर दुसरीकडे लोकप्रिय घोषणांनी लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा यामुळे नितीशकुमार यांची आता खरी कसोटी लागणार, हे मात्र नक्की!.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.