Agriculture Success Story: फळपिकांसह माती, पर्यावरणाचेही जपले आरोग्य

Agriculture Innovation: धनगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील उच्चशिक्षित शेतकरी यज्ञेश कातबने यांनी आपली तीस एकर फळबाग केंद्रित बहुविध पीक पद्धतीची शेती विकसित केली. पिकांची उत्पादकता जपताना माती, पर्यावरण आरोग्य व संतुलनालाही तितकेच महत्त्व दिले.
Farmer Yadnyesh Katbane
Farmer Yadnyesh KatbaneAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धनगाव (ता. पैठण) येथे यज्ञेश वसंतराव कातबने यांनी एमए लोक प्रशासन व एमए फिलॉसॉफी अशा दोन पदव्युत्तर पदव्या संपादन केल्या. खरे तर त्यांना शैक्षणिक, सामाजिक किंवा सरकारी क्षेत्रात करिअर करता आले असते. मात्र त्यांनी घरच्या तीस एकर शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. शेतीची जबाबदारी स्वतःवर घेताना फलोत्पादन केंद्रित पीक पद्धतीचा अंगीकार केला.

मातीची समृद्धी जपण्यासाठी सेंद्रिय शेतीवर विशेष भर दिला. एकाच पिकावर अवलंबून न राहता जोखीम कमी करण्यासाठी बहुपीक पीक पद्धती निवडली. कृषी सेवेतून निवृत्त झालेले वडील वसंतराव व वडीलबंधू योगेश यांचे मोलाचे मार्गदर्शन व साथ त्यांना मिळाली. आज यज्ञेश यांचा पंधरा वर्षांचा अनुभव शेतीत तयार झाला असून त्यांचे कौशल्य व सातत्य पाहून महाराष्ट्र शासनाने २०२२ मध्ये युवा शेतकरी सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

यज्ञेश यांच्या फळबाग केंद्रित शेतीची वैशिष्ट्ये

मोसंबी, केशर आंबा, पेरू, डाळिंब ही मुख्य पिके. बांधावरही विविध फळझाडे.

आठ वर्षे जुन्या सीताफळ बागेत एनएमके गोल्डन वाण असून, १६ बाय ८ फुटांवर लागवड केलेली व धारूर ६ या वाणाची अन्य सीताफळ बाग दोन वर्षांची झाली आहे.

केसर आंब्याच्या बागेला लागून लंगडा, हापूस, दशहरी, रत्ना,तोतापुरी, राजापुरी, कोकणरुची, आम्रपाली, बदाम आदी आंब्याच्या विविध वाणांची मिश्र छोटी फळबागही विकसित केली आहे. याशिवाय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील बिनाकाट्याच्या लिंबूची काही झाडे बांधावर लावली आहेत.

Farmer Yadnyesh Katbane
Success Story: अडचणीतील सेवा सोसायटीचा साधला उत्कर्ष

लागवडीपूर्वी जमिनीचे सपाटीकरण, बांधबंधिस्तीला प्राधान्य दिले. स्वाध्याय परिवाराशी जोडलेल्या यज्ञेश यांनी विहीर जल पुनर्भरणाचे प्रयोगही केला आहे. संपूर्ण क्षेत्र ठिबकवर. वडिलोपार्जित तीन विहिरी. सन २०१० मध्ये जायकवाडी प्रकल्पावरून पाच इंची केलेली पाइपलाइन. पाच बोअरवेल दिमतीला.

सुमारे ८० टक्के सेंद्रिय व २० टक्के रासायनिक पध्दतीचा वापर.

वर्षातून एकदाच मोगडा व रोटाव्हेटरचा वापर. कमीतकमी नांगरणी करण्यावर भर. आंतरमशागतही करीत नाहीत. मोसंबीत डिसेंबर, जानेवारीत ही प्रक्रिया पार पडते. पीकनिहाय कालावधी कमी- अधिक असतो.

ताग, धैंच्या आदी हिरवळीच्या पिकांचे आंतरपीक. ती गाडून त्यांचे खत तयार होते. याशिवाय शेणखत, पोल्ट्रीखत यांचाही गरजेएवढा वापर. घरी सात- आठ देशी गाई आहेत. त्यात गीर व डांगी जातींचा समावेश आहे. वर्षभरात ३० ते ३५ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. शेण, गोमुत्रावर आधारित जिवामृत स्लरीचा होतो वापर. डाळिंब, मोसंबी सारख्या फळांना चकाकी येण्यासाठी फळ पक्व होण्याच्या अवस्थेत दोन ते तीन फवारण्या ताक आणि गुळाच्या मिश्रणाच्या घेतात.

संपूर्ण बागांमधील तण हे ग्रासकटरचा वापर करून कापून त्याच ठिकाणी कुजविले जाते. त्याचा सेंद्रिय कर्ब वाढीसाठी तसेच खास करून मोसंबी फळगळ नियंत्रणासाठी उपयोग होत असल्याचा अनुभव.

निंबोळी पावडरचाही वापर. महिन्यातून एकदा ठिबकद्वारे जैविक खत प्रत्येक फळपिकाला सोडले जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या बायोमिक्स या उत्पादनाचा दीड महिन्यातून एकदा वापर.

या सर्व वापरामुळे रासायनिक खतांचा पूर्वी होत असलेला वापर केवळ ५ ते १० टक्क्यांवर आला आहे.

मजूरसमस्येवर मात करताना ट्रॅक्टरचलित यंत्रांचा वापर.

Farmer Yadnyesh Katbane
Agrowon Newspaper Success Story: तयाचा वेलू गेला गगनावरी!

बांधही उत्पादनक्षम

तीस एकरांतील शेतीच्या बांधावर पूर्वापार असलेले निंबवृक्ष जतन करण्याचे काम यज्ञेश यांनी केले आहे. बांधावर करवंदाची (कोकण बोल्ड) २५० झाडे लावली आहेत. दोन झाडांत पंधरा फूट अंतर ठेवून बांधावर व शेतीच्या अंतर्गत रस्त्याकडेला नारळाची सुमारे ४०० झाडे (बाणवली व कोकण आविष्कार) झाडे लावली आहेत. कोकण बहाडोली जातीची जांभळाची सुमारे १५० झाडे बांधावर व रस्त्याकडेला लावली आहेत. दोन झाडांत आठ फूट अंतर ठेवून सागवानाची १८० झाडे लावली आहेत. त्यामुळे बांधही उत्पादनक्षम केले आहेत. बांधावर चारापिकांची लागवड करण्याचा प्रयोग दहा- पंधरा वर्षांपासून सुरू आहे. या पिकांमुळे बागेतील पिकांना उष्णतेच्या झळा कमी बसतात. बागेतील तापमान नियंत्रित करण्यातही त्यांचा हातभार लागत असल्याचे यज्ञेश सांगतात.

दर्जेदार उत्पादन व जागेवरच मार्केट

जमिनीची सर्वांगीण काळजी घेऊन व त्यास अधिकाधिक ‘बायोमास’ दिल्याने पिकांची उत्पादकता व फळांचा दर्जाही जपला आहे.

चौथ्या वर्षातील मोसंबीचे तीन एकरांत २१ टन, त्या पुढील वर्षी ४० टन उत्पादन मिळाले. यंदा ५० टन उत्पादनाची अपेक्षा.

केशर आंब्याचे हे दुसरे वर्ष. मागील वर्षी पाच टन उत्पादन मिळाले.

डाळिंबाचे सोलापूर लाल वाणाचे एकरी पाच टन, जंबो पेरूचे एकरी चार टनांपर्यंत, सीताफळ एकरी सहा टन तर नारळाचे प्रति झाड ५० नग उत्पादन मिळते.

बहुतांश फळांची खरेदी व्यापाऱ्यांकडून जागेवरच.

मोसंबीला मागील वर्षी किलोला ४५ रुपये दर मिळाला. पेरूला किलोला ३० ते ८० रुपयांपर्यंत, सीताफळाला ६० रुपयांपर्यंत, डाळिंबाला ७० ते ७५ दर मिळतो.

...तयार केला इकोझोन

सुमारे एक एकरात पर्यावरण संतुलनासाठी ‘इकोझोन’ तयार केला आहे. यात फणस, पेरू, केळी, जांभूळ, सुपारी, वेलवेट ॲपल, दालचिनी, काळी मिरी, केसर आंबा, कढीपत्ता, रामफळ, सीताफळ, करंजफळ, वड, नारळ, कांचनफळ, चिंच, बेल, गोरख चिंच, शेवगा, आवळा आदींची लागवड केली आहे. या सर्व झाडांचा पालापाचोळा जमिनीला मिळून सेंद्रिय कर्ब वाढीस फायदा होतो.

तीस एकरांत रस्त्यांचे जाळे

पिके, माती व पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या यज्ञेश यांनी शेतातल्या प्रत्येक भागात जाण्यासाठी रस्त्यांचे जाळे उभे केले आहे. याच रस्त्यांच्या दुतर्फा उत्पादनक्षम वृक्षांची लागवड आहे. उत्पादित मालाची वाहतूक सहजगत्या होण्याबरोबर कुणालाही शेतीची पाहणी करणे सुकर झाले आहे.

यज्ञेश कातबने ७०८३७३९९९९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com