Processing Industry Agrowon
यशोगाथा

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

Women Empowerment : सांगलीवाडी (ता. मिरज, जि. सांगली) येथील सौ. शोभा पाडुरंग पाटील यांना १७ वर्षांपूर्वी तुटपुंज्या भांडवलावर गुरुप्रसाद प्रक्रिया उद्योगाचा प्रारंभ केला. या काळात हंगामी पदार्थ निर्मितीमध्ये जाऊबाई सौ. गीता यांनी त्यांना मोलाची मदत केली.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Women Success Story : सांगली शहरापासून जवळच असलेले सांगलीवाडी हे बागायती गाव. कृष्णा नदीकाठी हे गाव असल्याने महापुराचा फटका पिकाबरोबर गावालाही बसतो. याच गावातील सौ. शोभा पांडुरंग पाटील. यांचे माहेर कर्नाटकातील बिरजगी. माहेरी शेती नव्हती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच. पहिल्यापासून संकटावर मात करण्याची जिद्द त्यांच्या अंगीच होते. १९९७ साली सांगलीवाडीत पांडुरंग पाटील यांच्याशी त्यांचे लग्न झाले. सासरची तीन एकर शेती असली तरी पूर परिस्थितीमुळे हाताशी आलेली पिकेही डोळ्यादेखत कुजून जायची. त्यामुळे आर्थिक फटका बसायचा. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारायची असले, तर शेतीला प्रक्रिया व्यवसायाची जोड द्यायला हवी, असा विचार सातत्याने मनात येत होता. याबाबत घरच्यांशी चर्चाही व्हायची. यातून त्यांनी पहिल्या टप्यांत शेवया आणि पापड निर्मितीला सुरवात केली.

गृह उद्योगाचा प्रारंभ

२००७ पासून शोभाताईंनी सांगली शहरातील दुकानदारांना पापड, शेवया विक्रीस सुरुवात केली. यादरम्यान, काही व्यापारी, व्यवसाय करणाऱ्यांनी आम्ही तुम्हाला पीठ देतो, या पिठापासून पापड तयार करून द्या, अशी मागणी केली. आलेली संधी सोडायची नाही असे मनाशी पक्के असल्याने शोभाताईंनी पीठ घेऊन पापड, शेवया मजुरीवर करून देण्यास सुरुवात केली. या वेळी प्रति किलो १३ रुपये मजुरी मिळायची. त्यातून आठवड्याला १३०० रुपये हाती मिळू लागले. यातूनच गुरुप्रसाद गृहउद्योगाचा प्रारंभ झाला. प्रक्रिया उद्योगासाठी त्यांनी प्रमाणपत्र देखील घेतले.

व्यवसायवाढीबाबत शोभाताई सांगतात, की मी मला प्रक्रिया व्यवसायात कोणताही अनुभव नव्हता परंतु टप्प्याटप्प्याने मला प्रक्रिया पदार्थांची मागणी लक्षात आली. हळूहळू पदार्थाची निर्मिती सुरू झाली. पण विक्री कशी करायची असा प्रश्न होताच. त्यामुळे पती पांडुरंग यांनी सांगली शहरात पदार्थांच्या विक्रीचा निर्णय घेतला. पापड, शेवया, लाडू, लोणचे यांसह अन्य पदार्थ पिशवीत भरून सायकलवरून विक्री सुरू केली. दुकाने, आठवडा बाजार अशा ठिकाणी विक्रीसाठी सुरू झाली. योग्य दर्जा आणि चवीमुळे हळूहळू व्यवसाय वाढू लागला. कोणत्या हंगामात कोणते पदार्थ तयार केले, की त्यांना मागणी असते, याचा अभ्यास केला. त्यामुळे ग्राहकांकडून पदार्थांनी मागणी वाढू लागली.

पापड, कुरडयांचा व्याप वाढल्यानंतर दिवाळी, दसरा व अन्य सणांना डोळ्यासमोर ठेवून विविध प्रकारचे लाडू, चिवडा, शेव तसेच उपवासाच्या पदार्थांची निर्मिती सुरू केली. व्यवसायात यांत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने गुजरात, इचलकरंजी, कोल्हापूर या ठिकाणी विविध प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास केला. यातून शेवया तयार करण्यासाठी यंत्र घेतले. पण इतर कोणताही पदार्थ तयार करण्यासाठी यंत्राचा वापर करायचा नाही असे ठरवले. याचे कारण म्हणजे यंत्राने बनवलेले पदार्थ आणि हाताने तयार केलेले पदार्थांच्या चवीमध्ये काहीसा फरक पडतो. त्यामुळे मागणी कमी होण्याची भीती होती. व्यवसायाला भांडवलाची आवश्यकता असते. हाताशी भांडवल असल्याशिवाय कर्जही उपलब्ध होण्यास अडचणी असतात. त्यामुळे सुरुवातीपासून मिळणाऱ्या नफ्यातून शोभाताईंनी काही रक्कम हाताशी ठेवली. हळूहळू रक्कम वाढू लागली. हातात भांडवल आले. बॅंकेकडून दहा लाखांची सीसी मिळाली, पाच वर्षांत सीसीची परतफेड केली. त्यामुळे बॅंकेकडून सीसीही वाढवून मिळाली.

रेसिपी आणि घरचे मसाले

पदार्थांचा दर्जा आणि चव ही सर्वात महत्त्वाची असते. तरच पदार्थांची मागणी वाढते. पदार्थ निर्मितीसाठी रेसिपी आणि मसाले या दोन महत्त्वाच्या बाबी असल्याने पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया शोभाताईंची असते. त्यासाठी लागणारे मसाले घरीच तयार केले जातात. यामुळे चव आणि गुणवत्तापूर्ण पदार्थ तयार होतात. सध्या आंबा, लिंबू लोणचे, आवळा कॅण्डी, कुरड्या, सांडगे,पापड, शेव, चिवडा, करंजी, शंकरपाळी, लाडू आदी पदार्थांची निर्मिती केली जाते.दरमहा विविध पदार्थांच्या

विक्रीतून शोभाताईंना सरासरी पंचवीस हजारांची मिळकत होते.

गणपती, दसरा, दिवाळी, लग्न समारंभ या प्रमुख सणांना विविध पदार्थांची मागणी.

आठ ते दहा स्वादाच्या शेवया.

सुमारे १०० हून अधिक पदार्थांची निर्मिती.

घरच्यांची साथ मोलाची

प्रक्रिया व्यवसाय हा एकट्यावर कधीच अवलंबून नसतो. कुटुंबाची साथ असेल तर व्यवसाय वाढीसाठी मोठी मदत होते. शोभाताईंचा मुलगा विश्वजित, सून वैष्णवी आणि पती पांडुरंग यांची व्यवसायात मदत होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याने कच्चा माल खरेदीपासून ते विक्री व्यवस्थेपर्यंतची वेगवेगळी जबाबदारी घेतली आहे.

विक्रीची उभारली साखळी

पदार्थ निर्मितीच्या बरोबरीने शोभाताईंनी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सांगली शहरात विक्रीची साखळी उभारली होती. सांगली शहर सोडून इतर भागातही उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी नातलगांना एकत्र केले. त्यांच्या माध्यमातून पदार्थांची विक्री सुरु केली. कोल्हापूर, पुणे, मुंबई याठिकाणी कुरिअरद्वारे पदार्थ पाठवले जातात. वर्षभर पदार्थ निर्मिती आणि विक्री होत असली तरी, दिवाळीच्या आदल्या दिवसापर्यंत विविध पदार्थांची मागणी होत असते. तसेच गावातील सण, समारंभासाठी जेवणासाठी खाद्य पदार्थ पुरविण्याची ऑर्डर घेतली जाते. उत्पादक ते ग्राहक अशी विक्रीची साखळी उभारली असल्याने उत्पादन केलेल्या मालाची विक्री करणे सोपे झाले.

महिलांना मिळतो वर्षभर रोजगार

शोभाताईंकडे दिवाळी पदार्थाबरोबर उन्हाळी पदार्थ, आंबा, लिंबू, मिरची लोणचे, पुरण पोळ्या, नाचणी कुरड्या, ड्रायफ्रूट लाडू, ज्वारी, बाजरी भाकरी यासह विविध पदार्थांची वर्षभर मागणी असते. ग्राहकांच्या मागणीनुसार पदार्थ तयार केले जातात. सुरुवातील शोभाताई आणि गीताताई विविध पदार्थांची निर्मिती करायच्या. ग्राहकांकडून मागणी वाढू लागल्याने शोभाताईंनी गावातील गरजू महिलांना प्रक्रिया उद्योगात सहभागी करून घेतले. या महिलांना सुरुवातील प्रति तास पाच रुपये असे मानधन होते. आज या उद्योगात गावशिवारातील सुमारे १०० महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून या महिलांना प्रति तासाला २५ रुपये असे मानधन दिले जाते. पाच महिलांचा गट तयार करून शोभाताई त्यांना कच्चा माल देतात. त्यांच्याकडून विविध खाद्य पदार्थ मजुरीवर तयार करून घेतले जातात. विविध कौटुंबिक, धार्मिक समारंभात लाडू, गुलाबजाम, चपाती, पुरणपोळीची मागणी असते. काही समारंभामध्ये शोभाताईंनी एक हजार पोळ्या, भाकरीची मागणीदेखील पूर्ण केली आहे. पदार्थांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही.

गृह उद्योगात काम करणाऱ्या महिला म्हणजे कुटुंबातील सदस्याच शोभाताई मानतात. त्यामुळे त्यांना काही आर्थिक अडचण आली तर शोभाताई तातडीने मदत करतात. या गरजू महिला त्यांना जसे जमेल तशी दिलेल्या रकमेची परतफेड करतात.

सौ. शोभा पाटील,९८६०८४६८५९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT