Women Success Story : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड हा दुर्गम तालुका. याच तालुक्यातील गारगोटी हे तालुक्यातील मोठे गाव. या गावात सौ. विद्या माणगावकर आणि सौ. सुरेखा सोनार राहतात. सध्या त्या सुगरण महिला स्वयंसाह्यता समूहाच्या अध्यक्षा आणि सुरेखा सोनार सचिव म्हणून काम पाहतात. या दोघींची ओळख भिशी मंडळातून झाली. गावात दवाखान्यांची संख्या मोठी आहे. पण रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांना दवाखान्यात पोळी, भाजी मिळत नाही. यामुळे रुग्णांना अल्पदरात पोळी, भाजी उपलब्ध होण्यासाठी सेंटर सुरू केले. सुरुवातीला हेटाळणी झाली. पण त्याला न जुमानता त्यांनी सेंटर सुरू ठेवले. लोकांचा या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक अडचणीही होत्या. पण त्यातून मार्ग निघत गेला. कोरोना काळ हा परीक्षा बघणारा ठरला पण त्याबरोबर यशाची दारे उघडली.
महिलांना वर्षभर रोजगार
दिवाळी पदार्थांबरोबर वर्षभर मागणी असणारे नाचणी लाडू, पोह्याचे लाडू, खजूर लाडू आदी पौष्टिक पदार्थ तयार करण्यास दोघींनी प्रारंभ केला. याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभत गेला. सुरुवातीच्या काळात विद्याताईंची कल्पना आणि सुरेखा यांची पाककला यातून पदार्थांचे वैविध्य वाढत गेले. जसजशी पदार्थांची मागणी वाढत गेली, तसतशी मदतीसाठी महिलांची गरज वाटू लागली. यासाठी बचत गटातील महिलांना प्राधान्य दिले. या प्रक्रिया उद्योगात १५ महिलांना वर्षभर रोजगार मिळाला. तसेच दिवाळीच्या काळात २० अतिरिक्त महिलांना पदार्थ निर्मितीमधून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. दोघींचे नियोजन आणि महिलांचे कष्ट यातून पदार्थांची निर्मिती वाढत गेली. महिला गटाला पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक महोत्सवामध्ये आग्रहाने बोलावणे येऊ लागले. राज्यातील सर्व महत्त्वाच्या प्रदर्शनामध्ये या गटाचा चांगला सहभाग वाढला आहे.
शेतकऱ्यांकडून खरेदी
खाद्य पदार्थ तयार करताना लागणारा कच्चा माल हा अगदी दर्जेदार पद्धतीचा असतो. कोणतेही कृत्रिम व आरोग्यासाठी अपायकारक ठरतील असे घटक वापरले जात नाहीत. पदार्थांसाठी घरगुती तूप वापरले जाते. सातत्याने तूप लागत असल्याने गारगोटीतील दूध उत्पादकांकडून तूप खरेदी केले जाते. लाडूसाठी हळद, नाचणी, सेंद्रिय गुळाचा वापर केला जातो. याची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जाते. अन्य पिठे, डाळींची खरेदी खात्रीशीर ठिकाणाहून केली जाते. कोणत्याही परिस्थितीत पदार्थांना घरगुती चव राहील याची खबरदारी घेतली जाते. सध्या प्रक्रिया उद्योगाच्या दृष्टीने फरसाणा निर्मिती यंत्र, पीठ मळणी यंत्र, ग्लास पॅकिंग यंत्र, पिठाची गिरणी आणि दोन फ्रीज अशी यंत्रसामग्री आहे.
प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून लाल चिवडा, पोहे चिवडा, नाचणी चिवडा,ज्वारी चिवडा, गहू चिवडा, बाजरी चिवडा, सातू चिवडा, नाचणी भडंग, ज्वारी भडंग, सोयाबीन भडंग, पालक चकली, भाजणी चकली, नाचणी चकली, नमकीन चकली, शंकरपाळी, नमकीन चकली, मेथी चकली, टोमॅटो शेव, लसून शेव, पालक शेव, साधी शेव, नाचणी शेव पापडी, नाचणी लाडू, हळीव लाडू, मूग लाडू, शेंगदाणा चिक्की, ड्रायफूट लाडू, तीळ चिक्की, खाजा, बालूशाही, रवा लाडू, शेंगदाणा लाडू, फुटाणा चिक्की, मखमल पुरी, मोतीचूर लाडू, भुरा बेसन लाडू, तीळ लाडू, खजूर बर्फी, करंजी, साठा करंजी अशा पदार्थांची वर्षभर निर्मिती केली जाते.
देशभरात पदार्थांची विक्री
मागणीनुसार सकाळी पहिल्यांदा पदार्थ निर्मितीचे नियोजन होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत पदार्थ पॅकिंग करून तयार होतात. त्यानंतर मागणीनुसार विविध ठिकाणी कुरिअरने पाठवले जातात. विशेषतः खजूर लाडूंना चांगली मागणी आहे. अनेक ग्राहक परदेशातील नातेवाईकांना विविध खाद्य पदार्थ पाठवतात. याचबरोबर कोल्हापूर, पुणे, बंगळूर, मुंबई, बारामती, भोर आदी ठिकाणी महिला प्रतिनिधी आहेत. या बरोबरच गाव परिसरातील विविध संस्थांसाठी जेवण, नाश्ता आदी पदार्थांची मागणी असते. वर्षभर पदार्थ निर्मिती आणि विक्री होत असली तरी दिवाळीचा काळ हा सगळ्यात धामधुमीचा असतो. दिवाळीच्या आदल्या दिवसांपर्यंत विविध पदार्थांची मागणी होत असते. या काळात अधिक मेहनत घ्यावी लागते. दिवाळीच्या काळात अडीच लाखांपर्यंतची उलाढाल होते. वर्षभर एकूण उलाढाल १४ लाखांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. खर्च वजा जाता सुमारे पंचवीस टक्क्यांपर्यंत नफा राहतो.
योग्य समन्वयाने प्रक्रियाला गती
विद्याताई आणि सुरेखाताईंनी यांनी प्रक्रिया उद्योगात चांगला समन्वय राखला आहे. विद्याताई कच्च्या पदार्थांची खरेदी, प्रक्रिया पदार्थ विक्रीचे नियोजन सांभाळतात. सुरेखाताई पदार्थ निर्मिती आणि प्रक्रियेसाठी येणाऱ्या महिलांचे नियोजन पाहतात. प्रत्येक पदार्थ रुचकर, उत्तम दर्जाचा बनेल याचा आग्रह असतो. तळणे, भाजणे, लाटणे यामध्ये स्वच्छता, नीटनेटकेपणा राहील याची दक्षता घेतली जाते. दोघींमध्ये कामाचा समन्वय असल्याने कितीही मोठी खाद्य पदार्थांची मागणी आली तरी ती पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली जाते. यासाठी प्रसंगी घरची कामे बाजूला ठेवून ग्राहकांना पदार्थ वेळेत देण्यासाठी प्रयत्न केले जातात. खाद्यपदार्थांची मागणी गारगोटी शहर तसेच परिसरातूनही कायम आहे. याचबरोबरीने लंडन, थायलंड, सिंगापूर, दुबई येथेही ग्राहकांच्या नातेवाइकांकडे गृह उद्योगाचे खाद्य पदार्थ पाठविले जातात.
सामाजिक कार्यामध्ये सहभाग
केवळ व्यावसायिक संपर्क न ठेवता दोघी जणी सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी असतात. दिवाळीमध्ये शेतमजूर, वृद्धाश्रमातील व्यक्तींना जीवनावश्यक पदार्थ दिले जातात. दरवर्षी गावशिवारात ऊस तोड कामगारांना नवे कपडे दिले जातात. विधवा महिलांची ओटी, संक्रांतीला वाण देणे आदी कार्यक्रमही घेतले जातात. अनेक ठिकाणी व्यवसायाबाबत मार्गदर्शनही केले जाते. सोबत काम करणाऱ्या महिलांना दैनंदिन व्यवहार, राहणीमान, आर्थिक नियोजन, बॅंक व्यवहार, संवाद, वजन, पॅकिंग, कुकिंग आणि व्यक्तिमत्त्व विकास या सर्व विषयांमध्ये पारंगत केले आहे. यामुळे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या महिलांना प्रक्रिया उद्योगाचा आर्थिक आधार मिळाला आहे.
प्रदर्शनांतून गौरव
गृह उद्योगातील पदार्थांच्या वैविध्यपणांमुळे विविध प्रदर्शनातून चांगली मागणी असते. ताराराणी महोत्सव २०२४ मध्ये या उद्योगाला पहिला क्रमांक मिळला आहे. मुंबईमधील प्रदर्शनातूनही उद्योगाने नवे ग्राहक मिळवले आहेत. भविष्यात फक्त महिलांचा मोठा प्रक्रिया उद्योग समूह बनविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.
सौ. विद्या माणगावकर, ९८३४९२२६०१
सौ. सुरेखा सोनार, ९१७५६२०९३२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.