Watermelon Farming : पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी (ता. दौंड) येथील केशव होले हा युवा शेतकरी. शेती करायची तर शास्त्रीय, प्रायोगिक पद्धतीनेच हाच त्यांचा बाणा. वर्षभर सुरू असलेली प्रशिक्षणे, सेमिनार, शेतकरी प्रयोगांना व्यस्त कामातूनही स्वखर्चाने भेटी द्यायच्या. ज्ञान गोळा करायचं हा अभ्यासू बाणा. शेती साडेसात एकर.
कलिंगड, खरबूज ही मुख्य पिकं. वीस वर्षांच्या अनुभवातून या पिकांत राज्यातील मास्टर शेतकरी अशी ख्याती मिळवलेली. कलिंगडाची एकरी ३० ते ३५ टनांपर्यंत उत्पादकता सिद्ध केलेली. अशा या हिम्मतवान, धडाडीचं काळीज असलेल्या बहाद्दराला यंदाच्या मेमध्ये भीषण नैसर्गिक संकटानं पुरतं नमवण्याचा प्रयत्न केला. यापुढे शेती करणार नाही या मानसिकतेपर्यंत केशव पोचले.
असा घातला संकटानं घाला
यंदाच्या उन्हाळ्यात १२ मेच्या दरम्यान अडीच एकर ते पावणेतीन एकरांतील कलिंगडाचा प्लॉट विक्रीसाठी सज्ज होता. किलोला १२ ते १३ रुपये दर सुरू होता. एका व्यापाऱ्याने बांधावरच १४ रुपये दर देऊ केला होता. हार्वेस्टिंगला सुरवात होते न होतेच तोच पूर्वमॉन्सून पावसाने खिंडीत गाठले. बारा मे ते २५ मे असा एक दिवसही खंड न घेता तब्बल १३ दिवस पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू होती.
दोन किलोपासून ते ८- ९ किलोपर्यंत भरदार वजनाच्या फळांनी गच्च भरलेले, बेडवर ठेवलेले क्रेट. एक फुटाच्या वर पाणी आणि चिखल. त्यातून जिवाची कसरत करीत २० किलोचे क्रेट उचलून बांधापर्यंत आणायची जीवघेणी कसरत. दर घसरून सहा रुपयांवर आलेले. माल बाजारात आणू नका, मागणी नाही अशी कारणे व्यापारी सांगू लागले.
कलिंगडे गेली वाहून
२४ मे ला तर कहरच झाला. संध्याकाळी सातला सुरू झालेला मुसळधार पाऊस दुसऱ्या दिवशी सकाळी सहालाच बंद झाला. ओढ्याच्या कडेलाच केशव यांचा प्लॉट आहे. यापूर्वी असा पाऊस कधीच झाला नव्हता. परंतु यावेळी कोणती दयामाया न दाखवता ओढ्याचा प्रवाह थेट शेतात घुसला. बेडवरील फळांना आपल्यासोबत घेऊन गावच्या वेशीपर्यंत पोचला. अनेकांनी कलिंगडे गोळा करून नेली.
काहींनी जनावरांना खाऊ घातली. तेरा दिवसांच्या काळात तब्बल ७० ते ८० टन मालाचे संपूर्ण नुकसान झाले. तीन लाखांच्या आसपास खर्च वाया गेला. सात- आठ लाखांच्या उत्पन्नाचं स्वप्न चिखलातच गाडलं गेलं. ज्या मालासाठी अपार मेहनत घेतली, पैसा खर्च गेला त्याचं अस्तित्व असं संपल्याचं दृष्य डोळ्यासमोरून अनेक दिवस हलत नव्हतं.
२४ तारखेचा पाऊस कारकिर्दीत पहिल्यांदाच पाहिल्याची प्रतिक्रिया केशव देतात. थेट विक्रीचा पर्यायही नव्हता. दिवसाला जास्तीतजास्त ३०० ते ४०० किलोपर्यंत माल स्वतः विकणं शक्य आहे. ७० टन मालाचं काय करायच?
हारेल तो शेतकरी कसला?
मागील वर्षीही अतिवृष्टीत केशव यांच्या खरबुजाचे नुकसान झाले होते. यंदाच्या घटनेनं मात्र ते पुरते खचले. आता बस्स झालं! खूप सोसलं. यापुढं शेती नाही करायची. पोटासाठी दुसरा व्यवसाय शोधायचा या मानसिकतेपर्यंत येऊन पोचले. वाटलं एका प्रयोगशील शेतकऱ्याला नियतीनं हरवलं. खरीप तोंडावर होता.
त्याला भांडवल आणायचं कुठून? शेतीवरच सारा उदरनिर्वाह. दुसरा व्यवसायही नाही. घरची चूल,सामानसुमान, कुटुंब, मुलांचा सांभाळ....अनेक गोष्टी समोर आ वासून उभ्या. पण हारेल तो शेतकरी कसला? याची प्रचिती पुन्हा आली. थोडा काळ गेला.
शेतात कसलीशी चाहूल लागली. पंचवीस गुंठ्यात काकडी लागवडीची तर १० मे रोजी ५० गुंठ्यात लागवड झालेल्या कलिंगडात कामांची लगबग दिसू लागली. शेती सोडण्याची तयारी केलेला शेतकरी नवा अवतार धारण करून, सर्वस्व पणास लावूनमातीत आशेचं नवं बीज रोवायला पुन्हा सज्ज झाला होता. हिरवं स्वप्न साकारण्यासाठी...
प्रत्येक वेळी नवे आव्हान
केशव म्हणतात शेतकऱ्याचा जीव पिकात गुंतलेला असतो. पण कोपलेला निसर्ग, पीक काढणीवेळीच येणारा अवकाळी पाऊस आणि बाजारपेठेची अनिश्चितता यामुळे मेहनत जेव्हा पाण्यात जाते त्यावेळी होणाऱ्या वेदना सहन करण्यापलिकडे असतात. भविष्यात कदापी भरून न येणारे ते नुकसान असते.
प्रत्येकवेळी नवी आव्हाने अंगावर झेलून नव्याने पुढील हंगामासाठी सामोरे जावे लागते. उत्पादन खर्च भरून येईल अशी आधारभूत किंमत सरकारने प्रत्येक पिकासाठी निश्चित केली पाहिजे. कलिंगडाला पीकविम्याचा लाभ द्यायला हवा. वातावरणात बदल होणार असा पूर्वअंदाज कल्पना असली तरी कलिंगडासारख्या पिकात प्रतिबंधात्मक काही करणे अशक्य असते. फळाचे हार्वेस्टिंग पावसाआधी करता येत नाही.
न सुटणारे शेतीचे गणित
होले सांगतात की २००६ मध्ये कलिंगडाला किलोला सहा ते १० रुपये दर होता. आज २०२५ मध्येही तोच दर सुरू आहे. ‘कोल्ड स्टोअरेज माल ठेवला तरी मिळत काहीच नाही. ९० ते १०० टन मालाच्या स्टोअरेज ची व्यवस्था तुम्ही नाही करू शकत. वाढता उत्पादन खर्च मात्र अनेक वर्षे शेतमालाला दर तोच हे न सुटणारे शेतीचे गणित आहे.
व्यापारी आपापसात चर्चा करून कोणी कितीच्या पुढे दर द्यायचा नाही हे ते ठरवून घेतात. त्यांच्यात एकी आहे, पण दुर्दैवाने शेतकऱ्यांमध्येच एकी नसल्याचा खेद केशव व्यक्त करतात. लागवड सोपी आहे. पण हार्वेस्टिंग’ कठीण झाले आहे. झेंडू तोडणीच्या वेळी पाऊस आला तर झाडांच्या फांद्या मोडतात.
झाडे कलंडतात. फुलांमध्ये पाणी जाते. क्वालिटी घसरते. पावसात हार्वेस्टिंग उरकत नाही. आजवर शेतीनेच सर्व काही दिले आहे. त्यामुळे कितीही वाटले तरी शेती सोडून कुठेच जाणार नाही अशा आशावाद व्यक्त करून अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणेचे बळ केशव देतात.
केशव होले ९९७५५४१२७२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.