Fruit Farming  Agrowon
यशोगाथा

Fruit Farming : फळबागकेंद्रित शेतीतून साधली कुटुंबाची प्रगती

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : अहिल्यानगर- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर खडका फाट्यापासून पूर्वेला खडका येथे तुकाराम भागवत कल्हापुरे हे प्रयोगशील शेतकरी राहतात. त्यांचे मूळ गाव खडांबे (ता. राहुरी) आहे. परिस्थितीशी संघर्ष करत आणि रोजगार शोधत तुकाराम खडका येथे आले. मोलमजुरी करत, पै पै साठवत त्यांनी टप्प्या टप्प्याने शेती खरेदी केली. सध्या त्यांच्याकडे बारा एकर शेती आहे. पैकी ११ एकरांत फळबाग केंद्रित शेती पध्दतीचा विकास केला आहे.

एक एकरांत शेततळे आहे. काही शेती खंडानेही केली जाते. त्यात ऊस, सोयाबीन व चारा पिके आहेत. तुकाराम जलसंपदा विभागातून २०१८ मध्ये चालक पदावरून निवृत्त झाले. नोकरीच्या काळातही शेतीवरील प्रेम त्यांनी कमी होऊ दिले नाही. त्या वेळी पत्नी आशाबाई यांनी शेतीची मुख्य जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

आता दोघांच्या मार्गदर्शनाखाली मुलगा ईश्वर व सून स्वाती शेतीची धुरा सांभाळतात. शेती प्रगत करण्यासाठी कुटुंबातील सर्वांचे श्रम कारणीभूत ठरले आहेत. तुकाराम यांची सून स्वाती टॅक्ट्रर चालविण्यातही कुशल आहेत. त्यांच्या रागिणी या मुलीचा विवाह झाला असून धाकट्या पल्लवीने ‘ॲग्री’चे शिक्षण घेतले आहे. तिचाही शेतीत हातभार लागतो.

पाच एकरांत वर्षभर उत्पन्नाचा उद्देश

कुटुंबाची जमीन तशी हलक्या प्रतीची. खडकाळ. कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी यासारखी पारंपरिक पिके ते पूर्वी घेत. तुकाराम यांनी व्यावसायीक पीक पद्धतीचा स्वीकार करून फळबागकेंद्रित शेती पद्धतीचा अंगीकार केला. सुमारे नऊ वर्षांपूर्वी साधारण पाच लाख खर्च करून अन्य राज्यांतून रोपे आणून एका एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. त्याच चांगले यश मिळाल्यावर पुन्हा लागवड वाढवली. या भागात या फळाची लागवड करणारे तुकाराम पहिलेच शेतकरी असावेत. आजमितीला पाच एकरांत हे फळपीक आहे.

एकाच पिकावर अवलंबून न राहता शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी फळांची विविधता ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ड्रॅगन फ्रूटच्या पाच एकरांत केसर आंब्याची सुमारे ५७४ तर सीताफळाची सुमारे सव्वासहाशे झाडे लावली आहेत. ड्रॅगन फ्रूटची पंधरा बाय सात फूट अशी लागवड असल्याने आंबा आणि सीताफळाची आंतरपीक म्हणून सहज लागवड करता आली आहे.

ड्रॅगन फ्रूटचा फळ हंगाम जून ते नोव्हेंबर- डिसेंबरपर्यंत चालतो. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये आंब्याचे उत्पादन मिळते. तर हा हंगाम संपल्यानंतरसीताफळ सप्टेंबरच्या दरम्यान फळ देण्यास सुरुवात करते. त्यामुळे पाच एकर बाग वर्षभर उत्पन्न देत राहावी असे नियोजन केले आहे.

आश्‍वासक उत्पादन

सध्या ड्रॅगन फ्रूट एकरी चार टनांपर्यंत उत्पादन देत आहे. त्यास नगर, सोलापूर व जागेवर किलोला ९० रुपयांपासून ते १३० ते १४० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. आंब्याचे नुकतेच उत्पादन मिळणे सुरू झाले आहे. प्रति झाड ५० किलोपर्यंत उत्पादन मिळते आहे.

यंदाच्या हंगामात सेंद्रिय आंब्याला ग्राहकांकडून मोठी मागणी राहिल्याचे ईश्‍वर यांनी सांगितले. किलोला ६८ ते ९५ रुपयांपर्यंत दर मिळाला. साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले. सीताफळाचे व्यावसायिक उत्पादन अजून सुरू व्हायचे आहे. मात्र मागील वर्षी ४० क्रेटपर्यंत विक्री होऊन किलोला ४५ ते ५० रुपयांपर्यंत दर मिळाला.

शंभर टक्के सेंद्रिय शेती : कल्हापुरे आजमितीला शंभर टक्के सेंद्रिय शेती करतात. त्यात शेणखत, गोमूत्र, जिवामृत, निंबोळी अर्क, कोंबडी खत यांचा वापर केला जातो. सध्या एचएफ व गावरान अशा लहान- मोठ्या मिळून सुमारे १८ गायी आहेत. दुधापासून दही, ताक तयार करून शेतीतच त्याचा अधिक वापर होतो. शेणखत महिन्याला दोन ट्रॉलीपर्यंत, तर वर्षाला २६ ट्रॉलीपर्यंत उपलब्ध होते.

दर तीन वर्षांनी प्रत्येक रानाला त्याचा वापर होतो. शेणखताच्या वापरामुळे वर्षभरात होणारा तीन ते चार लाख रुपयांच्या रासायनिक खतांवरील खर्चही कमी झाला आहे. गोमूत्राचीही वर्षभर साठवण करून ठेवण्यात येते. फळमाशीपासून नुकसान टाळण्यासाठी सापळ्याचा वापर होतो. सेंद्रिय व्यवस्थापनामुळे जमिनीची सुपीकता, फळांची चकाकी, दर्जा, टिकवणक्षमता याच वाढ होण्यास मदत मिळाली आहे.

अन्य फळझाडे व रोपवाटिका : डाळिंबाची एकूण नऊशे झाडे असून, सन २०१७ ची लागवड आहे. आंबे बहरातील फळांचे एकरी सात टनांपर्यंत उत्पादन मिळते. यंदा त्यास शंभर रुपये प्रति किलोपेक्षाही अधिक दर मिळाला आहे. संत्र्याच्या साडेचारशे व मोसंबीच्या ५३० झाडांची अलीकडेच लागवड केली आहे. ड्रॅगन फ्रूटखालील क्षेत्र अलीकडील काळात वाढू लागले आहे. मात्र त्याची रोपे सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. कल्हापुरे यांनी ही संधी ओळखत रोपनिर्मिती सुरू केली आहे. प्रति रोप २० ते २५ रुपये दराने वर्षभरात सुमारे दोन लाखांहून अधिक विक्री होत असल्याचे ईश्‍वर यांनी सांगितले.

ईश्‍वर कल्हापुरे ९०६७१७२६६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Congress on BJP : भाजप महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू; काँग्रेसकडून जोरदार टीका

Marathwada Heavy Rain : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातील ४० मंडलांत अतिवृष्टी

Garlic Grass : बहुवार्षिक पौष्टिक द्विदल चारापीक : लसूणघास

Bidri Sugar Factory : ‘बिद्री’चा वाढीव ऊसदराचा १०७ रुपये दुसरा हप्ता आदा

Crop Damage : मराठवाड्यात पावसाने केली दाणादाण

SCROLL FOR NEXT