Dragon Fruit Farming : दुष्काळात ड्रॅगन फ्रूटचा मिळाला आश्‍वासक पर्याय

Dragon Fruit Production : परभणी जिल्ह्यातील भीमराव व अशोक या पवार पिता-पुत्रांनी जांब (ता. परभणी) शिवारात दोन एकरांत दोन वाणांच्या ड्रॅगन फ्रूट लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यातून सातत्याने उद्‍भविणाऱ्या दुष्काळी स्थितीवर आश्‍वासक पर्याय त्यांना मिळाला आहे.
Dragon Fruit Farming
Dragon Fruit FarmingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : अलीकडील काळात शेतकऱ्यांना सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. अनेक शेतकऱ्यांना फळबागा मोडून काढाव्या लागल्या. तरीही आव्हाने पेलून शेतकरी वेगवेगळे प्रयोग, पर्याय शोधून वाटचाल करीत आहेत. भीमराव पवार त्यापैकीच एक. त्यांचे मूळगाव आसेगाव (ता. जिंतूर) असून, तीन एकर त्यांची कोरडवाहू शेती आहे. त्यांचे चिरंजीव अशोक पवार हे कायदा व समाज कार्य विषयाचे पदवीधर असून परभणी येथे वकिली व्यवसाय करतात. शेतीचीही जबाबदारी सांभाळतात. भीमराव परभणी येथे वन विभागातून कर्मचारी म्हणून निवृत्त झाले आहेत. परभणी येथे कुटुंबाचे वास्तव्य असते.

दुष्काळावर मात करण्याचे प्रयत्न

सन १९८० मध्ये परभणीपासून १० किलोमीटरवरील जांब शिवारात पवार कुटुंबाने सहा एकर जमीन खरेदी केली. ती हलकी ते मध्यम प्रकारची आहे. सुरवातीच्या काळात कोरडवाहू शेतीत त्यांनी पारंपरिक हंगामी पिके घेतली. सन २००३ मध्ये विहिरी खोदली. अडीच एकरांत मोसंबी लागवड केली. परंतु २००८ च्या दुष्काळात बाग वाळून गेली. पुढे २००९ मध्येही याच अवस्थेमुळे अडीच एकरांवरील संत्रा बाग मोडून टाकावी लागली. पुन्हा पवार कुटुंब पावसावर आधारित सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिके घेऊ लागले. परंतु खात्रीशीर उत्पन्न हाती लागत नव्हते. अखेर विचारांती बागायती शेती करण्यासाठी सिंचन स्रोतांचे बळकटीकरण करण्याचे ठरविले. एक ६० फूट खोलीची विहीर होती. दुष्काळी स्थितीत तिचे ३० फूट खोलीकरण केले. आता एकूण खोली ९० फूट झाली असून पाणी साठवण क्षमता वाढली आहे. सन २०१८ मध्ये शेततळे घेतले आहे. त्यामुळे संरक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

Dragon Fruit Farming
Dragon Fruit Farming : अभ्यासातून ड्रॅगन फ्रूट पिकात शोधली संधी

ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग

मुंबई येथील बाजारपेठेत पवार यांच्या पाहण्यात ड्रॅगन फ्रूट आले. दुष्काळात कमी पाण्यात ते चांगले उत्पन्न देऊ शकते हे समजले. अधिक माहिती घेऊन हे धाडस करण्याचे ठरवले. हैदराबाद, बंगळूर येथून रोपे आणली. सन २०१८ च्या जून महिन्यात दोन एकरांत लागवडीचा श्रीगणेशा झाला. यात बाहेरून लाल व आतून पांढरे व बाहेरून व आतून लाल (जंबो) अशा दोन वाणांचा समावेश होता. दोन ओळींत १२ फूट, सिमेंटच्या दोन खांबांमध्ये (पोल) ८ फूट अंतर आहे. पोल सात फूट उंचीचे असून जमिनीत दोन फूट खोल गाडले आहेत. एकरी एकूण ४०० पोल्स असून, त्यावर सिमेंटची चक्री बसविली आहे. प्रत्येक पोलभोवती चार झाडे आहेत. एकरी सुमारे एक हजार ६०० झाडे आहेत. लागवडीसाठी सुरुवातीला एकरी किमान चार लाखांपर्यंत खर्च आला.

व्यवस्थापनातील बाबी

फळांचा हंगाम जून ते नोव्हेंबरपर्यंत. काळात पावसाळा असल्याने पाण्याची तशी चिंता नसते.

उन्हाळ्यात किमान दोन महिने पाण्याचा ताण. पावसाळ्यात अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन ओळींत चर खोदले आहेत.

उन्हाळ्यात सिलीकॉनयुक्त खताची फवारणी.

पांढऱ्या वाणाची उत्पादकता जास्त असते. परंतु दर कमी मिळतो. त्याच्या फळाचे वजन साडेतीनशे ग्रॅम ते पाचशे ग्रॅमपर्यंत असते. पांढऱ्या फळाच्या तुलनेत जंबो लालची चव गोड असल्याने त्यास ग्राहकांची अधिक पसंती. मागणी व दरही जास्त मिळतात. त्याचे वजन सातशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत. या बाबी लक्षात घेऊन संपूर्ण दोन एकरांत आता जंबो वाणाची लागवड.

Dragon Fruit Farming
Dragon Fruit Farming : भरघोस उत्पादनासाठी अशी घ्या ड्रॅगन फ्रूटच्या फूल, फळांची काळजी

उत्पादन व विक्री

पहिल्या वर्षी उत्पादन कमी मिळते. परंतु पिकाचा विस्तार होऊ लागतो तसे वर्षागणिक उत्पादन वाढू लागते. अलीकडील वर्षांत एकरी तीन, साडेतीन ते चार टनांपर्यंत उत्पादन मिळत आहे. पवार यांच्याकडे उत्पादन सुरू झाले त्या वेळी ग्राहकांसाठी नवे फळ होते. त्याचे आहारातील महत्त्व पटवून देऊन मार्केटिंगसाठी पवार यांना प्रयत्न करावे लागले. आज व्यापारी किलोला १२० ते १५० रुपये दराने जागेवर खरेदी करतात. तर परभणी शहरात पाच ते सहा स्टॉल्स उभारून बॉक्स पॅकिंगमधून किलोला २०० रुपये दराने विक्री होते. घरपोच (होम डिलिव्हरी) सेवाही दिली जाते.

संघाच्या माध्यमातून प्रसार, प्रशिक्षण

राज्यात स्थापन झालेल्या महा ड्रॅगन फ्रूट असोसिएशनचे अशोक संचालक आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागवड, बाजारपेठ व प्रकियेपर्यंत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येत आहे. अशोक यांनी ड्रॅगन फ्रूटची रोपवाटिकाही सुरू केली आहे. ते सांगतात, की देशात गुजरात राज्य या फळाच्या लागवडीत आघाडीवर असून, महाराष्ट्रालाही तशी आघाडी घेण्याची संधी आहे. उत्तर भारतात बाजारपेठही मोठी आहे.

शेतीचे व्यवस्थापन

भीमराव यांच्या मदतीला मुंजाजी कदम हे बाग व विक्री व्यवस्थापन पाहतात.

आगामी काळात ड्रॅगन फ्रूटपासून प्रक्रिया उत्पादने निर्मिती उद्योग सुरू करण्याचा मानस.

कृषी पर्यटनाला प्रारंभ केला आहे.

दोन एकरांत संत्रा, त्यात सीताफळाच्या एनएमके गोल्ड वाणाच्या १०० झाडांची लागवड. ड्रॅगन फ्रूट बागेत मल्चिंगवर मिरची, वांगी, टोमॅटो, शेवगा आदींची तर बांधावर आंबा,जांभूळ आदींची लागवड.

अशोक पवार ९९७०६०६३३५

भीमराव पवार ९८६०४५५०२०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com