Fruit Farming : फळबागांतून साधले शाश्‍वत उत्पन्नाचे तंत्र

Fruit Orchard Management : वर्षभर कामाचे नियोजन आणि टप्प्याटप्प्याने उत्पन्नही मिळत राहील या पद्धतीने शेतीचे व्यवस्थापन हडोळती (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी नारायण तुकाराम वडवळे यांनी केले आहे.
Fruit Crop Farming
Fruit Crop Farming Agrowon
Published on
Updated on

विकास गाढवे

Fruit Orchard Planning : स्थानिक बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन फळबागांचे नियोजन केले तर वर्षभर पैसा हाती येत रहातो. फळपीक हे शेतकऱ्यांचा शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत आहे. फळपिके आणि नगदी पिकांचे व्यवस्थित नियोजन केले तर त्यातून चांगले उत्पन्न मिळविता येते, असा हडोळती (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी नारायण तुकाराम वडवळे यांचा अनुभव आहे. नारायण तुकाराम वडवळे (वय ७६) हे परभणी येथील कृषी महाविद्यालयातून १९७० मध्ये कृषी पदवीधर झाले. हडोळती ते शेलदरा आणि हंगरगा रस्त्यावर त्यांची वडिलोपार्जित आणि स्वकष्टार्जित मिळून साठ एकर जमीन आहे. कृषी पदवीनंतर दोन वर्षे शेतामध्ये त्यांनी काम केले. १९७२ च्या दुष्काळात निलंगा तालुक्यात कंत्राटी पद्धतीने त्यांची नियुक्ती झाली. दोन वर्षांनंतर पुन्हा ते शेतीमध्ये परतले. या काळात त्यांनी कापूस बीजोत्पादनावर भर दिला होता. दुष्काळात काम केलेल्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यांना १९७७ मध्ये कृषी पर्यवेक्षक म्हणून नोकरी मिळाली. सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांनी उदगीर, मुखेड, लातूर, अहमदपूर येथे काम केले. २००० मध्ये कृषी अधिकारीपदी पदोन्नती मिळाली. नोकरी करत त्यांचे शेतीकडे कायम लक्ष होते. २००३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन पूर्णवेळ शेती व्यवस्थापनास सुरुवात केली.

पंधरा एकरांवर फळबाग :

नारायण वडवळे यांनी कृषी पदवीचे शिक्षण घेताना गिरवलेले धडे प्रत्यक्षात आणले. शेतीतील शाश्‍वत उत्पन्नासाठी त्यांनी फळबागांना प्राधान्य दिले. वर्षभर क्रमाने फळांचे उत्पादन येईल आणि एकाच वेळी कष्टाचा ताण पडणार नाही, या पद्धतीने त्यांनी १९९० मध्ये रोजगार हमी योजनेतून १५ एकरांवर विविध फळपिकांची लागवड केली. यामध्ये पाच एकर सरदार पेरू, दोन एकर फुले शरबती लिंबू, पाच एकर केसर आंबा, पाच एकर कडाका बोरे आणि अडीच एकरांवर कालीपत्ती चिकू कलमांची लागवड केली. या सर्व फळबागांतील अडीच हजार कलमे आता ३२ वर्षांची झाली आहेत. कलमांमध्ये योग्य अंतर असल्याने सर्व फांद्यांना सूर्यप्रकाश मुबलक मिळतो, त्यामुळे कीड, रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे वडवळे सांगतात. बांधावर देखील त्यांनी विविध फळझाडांची लागवड केली आहे.

फळबागेत केलेल्या मूलस्थानी जलसंधारणांमुळे कलमे पाण्याचा ताण सहन करू शकतात, जास्त पाणी आल्यास त्याचा आपोआप निचरा होतो. या प्रयोगामुळे दुष्काळातही बागा टिकून राहिल्या. फळबागेमध्ये एक शेततळे, सहा विंधन विहिरी आणि तीन विहिरी आहेत. पाणी अडवा आणि जिरवा योजनेतून त्यांनी पाझर तलाव तयार केला आहे. यामुळे फळबागांसाठी त्यांना पाणी कमी पडत नाही.

Fruit Crop Farming
Dragan Fruit farming: चांगल्या उत्पादनासाठी ड्रॅगन फ्रूट बागेचे व्यवस्थापन

हंगामी पिकांचे नियोजन :

सातत्याने एकच पीक घेतल्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो. आलटून पालटून पिके घेतली तर पोत चांगला राहतो आणि हमखास उत्पन्न मिळते. या पॅटर्नमधून वडवळे यांच्या काही क्षेत्रात कापूस, सोयाबीन तर काही क्षेत्रात सोयाबीन आणि तूर मिश्र पीक पद्धती आहे. सध्या १० एकर कापूस, १० एकर तूर आणि ३० एकर सोयाबीन लागवड आहे. मशागत आणि पेरणीसाठी ट्रॅक्टरचलित सर्व यंत्रणा त्यांच्याकडे आहे. कृषी शिक्षण आणि कृषी विभागातील नोकरीच्या अनुभवातून त्यांनी हंगामी पिके तसेच फळपिकांचे खत व्यवस्थापन आणि कीड, रोग नियंत्रणाचे काटेकोर वेळापत्रक तयार केले आहे. फळबाग आणि हंगामी पिकांच्या व्यवस्थापनासाठी दररोज १५ मजूर वर्षभर त्यांच्याकडे कामाला आहेत. फळांच्या हंगामाच्या काळात ३० मजूर त्यांच्या फळबागेत असतात.

Fruit Crop Farming
Fruit Crop Farming : मोसंबी, संत्रा, केसर फळपिकांसह रोपवाटिकेतून मिळाली भक्कम साथ

फळांच्या विक्रीचे व्यवस्थापन :

पूर्वी वडवळे यांना फळांची विक्री स्वतः करावी लागत होती. त्या काळी दळणवळणाच्या फारशा सुविधा नव्हत्या. यामुळे स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी फळांच्या उत्पादनात सातत्य ठेवणे आवश्यक होते. फळांचे वर्षभर उत्पादन सुरू राहील, या पद्धतीने त्यांनी फळबागांचे नियोजन केले आहे. लिंबाचे बारमाही तर पेरूचे उत्पादन हिवाळ्यात, आंब्याचे उन्हाळ्यात आणि बोर व चिकू उत्पादन जानेवारीपासून सुरू होते. मजुरांच्या माध्यमातून दररोज परिसरातील आठवडी बाजारात लिंबाची विक्री केली जाते. पेरू, आंबा, चिकू फळांची खरेदी व्यापारी शेतात येऊन करतात. दरवर्षी एक एकर फळबागेतून किमान दीड लाखाचे उत्पन्न मिळविण्याचे त्यांचे उद्दिष्ट असते.

पशुपालन, बायोगॅसची उभारणी :

नारायण वडवळे यांच्याकडे १ देशी गाय, २ संकरित गायी आणि एक बैलजोडी आहे. जनावरांसाठी मुक्त संचार तसेच बंदिस्त गोठा केला आहे. दरवर्षी तीस ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. आणखी ७० ट्रॉली शेणखत खरेदी करून फळबागांना दिले जाते. याचबरोबरीने फळबागेला ठिबकद्वारे जीवामृत दिले जाते. शाश्‍वत इंधनासाठी बॉयोगॅसची सोय आहे. याची स्लरी फळझाडांना दिली जाते.

डॉक्टर मुलगाही रमला शेतीमध्ये....

नागनाथ वडवळे यांचा मुलगा डॉ. विठ्ठल यांना देखील शेतीची आवड आहे. त्यामुळे नोकरी ऐवजी त्यांनी शेती पाहता येण्यासाठी गावामध्ये हॉस्पिटल सुरू केले. वैद्यकीय व्यवसायाच्या बरोबरीने गेल्या दहा वर्षांपासून ते शेतीत रमले आहे. त्यांना पत्नी डॉ. भक्ती यांचीही चांगली साथ त्यांना मिळाली आहे. नारायण वडवळे यांनी मुलगा विठ्ठल तसेच सहा मुलींवर शेतीतील कष्टाचे संस्कार केले. पत्नी प्रभावती यांची वडवळे यांना दररोजच्या शेती कामात चांगली साथ लाभली आहे.

नारायण वडवळे ९४२२६१०३४१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com