Kolhapuri Masala Agrowon
यशोगाथा

Success Story: मसाल्याचा सुगंध, यशाचा गंध: ‘अर्चना मसाले’ची कहाणी

Kolhapuri Masala Story: कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबे तर्फ कळे (ता. करवीर) येथील अर्चना हिम्मतराव देसाई यांनी बाजारपेठेची गरज ओळखून कोल्हापुरी तिखट (चटणी) आणि मसाल्याचा ब्रॅण्ड तयार केला आहे. एक एकर शेतीला पशुपालन आणि प्रक्रिया उद्योगाची जोड देत कुटुंबाच्या अर्थकारणाला गती दिली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुले

Indian Spices: कोल्हापूरपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर कळंबे तर्फ कळे हे सुमारे दीड हजार लोकसंख्येचे गाव. येथील शेतकरी कुटुंबातील अर्चना देसाई यांनी पाच वर्षांपूर्वी कोल्हापुरी तिखट (चटणी) निर्मिती उद्योगाला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात नातेवाइकांच्या मागणीनुसार तिखट तयार करून देत होत्या. त्यांच्या प्रोत्साहनातून प्रक्रिया व्यवसायाची बीजे रोवली गेली.

सुरुवातीला ६० किलो तिखट निर्मितीपासून तयार झालेला हा त्यांचा प्रवास वार्षिक साडेसहा टनांपर्यंत गेला आहे. घरगुती स्तरावर हा प्रक्रिया उद्योग सुरू आहे. तिखट निर्मितीसाठी हंगामात सुमारे दोन ते अडीच टन मिरचीची खरेदी केली जाते. यातून साडेसहा टन तिखटाची निर्मिती होते. मिरची कांडप यंत्रातून दिवसाला ८० किलो मिरच्यांचे कांडप केले जाते. यासाठी स्थानिक महिलांची मदत घेतली जाते.

तिखट निर्मितीसाठी घरच्या सदस्यांची मदत होते. ग्राहकांच्या मागणीनुसार दिवसाला दोनशे ते अडीचशे किलो तिखट तयार होते. यासाठी आदल्या दिवशी ग्राहक तिखटाची मागणी नोंदवतात. त्यानुसार अपेक्षित मसाल्यांच्या मिश्रणाचा अंदाज देऊन दुसऱ्या दिवशी ग्राहकांना तिखट तयार करून दिले जाते. प्रक्रिया उद्योगामध्ये अर्चनाताईंना पती हिम्‍मतराव यांची मोलाची साथ मिळाली आहे. ते कोल्‍हापूर जिल्हा दूध संघात (गोकुळ) नोकरीला आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार ते दुचाकीवरून तिखट घरपोहोच करतात. जून, जुलै वगळता तिखटास मागणी कायम असते. अन्‍य हंगामामध्‍ये ग्राहकांना तिखट मिळावे यासाठी साठा करून ठेवला जातो. यामुळे वर्षभर तिखट उपलब्ध असते.

गुणवत्तेवर भर

चटणीला स्वादिष्टपणा यावा यासाठी विविध प्रकारच्या मिरच्यांचा वापर केला जातो. गडहिंग्लज, आंध्र प्रदेश, संकेश्‍वर, कोल्हापूर या बाजारपेठांमधून मिरच्यांची खरेदी होते. साधारणतः जानेवारीपासून मार्चपर्यंत मिरच्यांची खरेदी होते. कोल्हापुरी तिखट निर्मितीसाठी प्रामुख्याने रेशीम पट्टा (काश्मिरी), ब्याडगी, वातेरी, संकेश्‍वरी आदी मिरच्‍यांची निवड केली जाते. वैशिष्ट्यांनुसार मिरचीचे मिश्रण करून तिखट तयार केले जाते. एकाचवेळी तीनशे ते साडेतीनशे किलो मिरच्यांची खरेदीकरून मागणीनुसार तिखट तयार करण्याचे नियोजन होते.

मिरची आणि मसाला वापरण्याच्या प्रकारानुसार एक आणि दोन नंबर अशा दोन प्रकारात तिखट निर्मिती केली जाते. एक नंबर तिखटासाठी काश्मिरी, ब्याडगी, संकेश्‍वरी मिरची वापरली जाते. दोन नंबरच्या तिखटासाठी ब्याडगी, वातेरी मिरची वापरली जाते. एक नंबर तिखटाची विक्री ६०० रुपये किलो आणि दोन नंबर तिखटाची विक्री ३५० रुपये किलो या दराने होते. अर्चनाताई प्रामुख्याने कोल्हापुरी तिखटाची निर्मिती करत असल्यातरी ग्राहकांच्या मागणीनुसार गरम मसाला, खडा मसाला, बिर्याणी व्‍हेज पुलाव मसाला देखील तयार करून देतात.

शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी

तिखट आणि मसाला निर्मितीसाठी लसूण, कोथिंबीर, कांदा, धने, तीळ आदी कच्चा माल लागतो. मिरच्या वगळता हा कच्चा माल अर्चनाताई परिसरातील शेतकऱ्यांकडूनच खरेदी करतात. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील अनेक शेतकरी घरगुती वापरासाठी लसूण, कोथिंबीर, कांदा, धने, तीळ लागवड करतात. या शेतकऱ्यांशी संपर्क साधून बाजारभावाप्रमाणे रक्कम देऊन खरेदी केली जाते. यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होतो. तिखट निर्मितीसाठी २८ प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. स्वच्छ व चांगल्या दर्जाचे मसाला घटक चटणी निर्मितीसाठी खरेदी केले जातात. कोकणातून खोबऱ्याची खरेदी केली जाते. अनुभवातून चटणीसाठी लागणाऱ्या घटकांचा दर्जेदारपणा तपासण्याची हातोटी आली असल्याने फसगत होत नाही.

राज्यभर विक्री

अर्चनाताईंनी बाजारपेठेत कोल्हापुरी तिखट आणि मसाला उत्पादनाची वेगळी ओळख तयार होण्यासाठी ‘अर्चना मसाले’ हा ब्रॅण्ड तयार केला आहे. गेल्या पाच वर्षांपासून अर्चनाताईंनी तयार केलेल्या तिखटाला नियमित ग्राहक तयार झाले आहे. एक किलोपासून ते अगदी पन्नास किलोपर्यंत ग्राहक मागणी नोंदवतात. गावातील घरगुती ग्राहकांपासून अन्य शहरांतील व्यापारी त्यांच्याकडून तिखट आणि मसाला तयार करून घेतात. विविध शहरांमध्ये जाणाऱ्या ट्रॅव्हल्स, ट्रान्स्पोर्टच्या माध्यमातून चटणी ग्राहकांना पोहोच केली जाते. वर्षभरात तयार होणाऱ्या तिखटापैकी निम्‍मे तिखट हंगामात आणि उर्वरित तिखटाची बिगर हंगामात विक्री होते.

अर्चनाताई २०२० पासून तिखट निर्मिती व्यवसायात असल्याने त्यांना आता ग्राहकांच्या मागणीचा अंदाज आला आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार पाव किलो ते पाच किलोपर्यंतचे तिखटाचे पॅकिंग केले जाते. काही ग्राहक परदेशात असणाऱ्या नातेवाइकांना तिखट पाठवतात. गणेश चतुर्थी नंतर प्रामुख्याने तिखटाच्या मागणी वाढण्यास सुरुवात होते. प्रक्रिया व्यवसायातून वर्षाला सुमारे १२ ते १३ लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते. या माध्यमातून सरासरी ३५ टक्क्यांपर्यंत नफा राहात असल्‍याचे अर्चनाताई सांगतात. तिखट, मसाला निर्मितीच्या बरोबरीने गावातील अन्य ग्राहकांनी आणलेल्या मिरचीचे तिखट मजुरीवर करून दिले जाते.

पुरस्काराने गौरव

अर्चनाताईंना कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळातील अधिकाऱ्यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळते. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून कांडप यंत्रासाठी अनुदान मिळाले आहे. तिखट, मसाला निर्मिती व्यवसायात दिशादर्शक काम केल्याबद्दल अर्चनाताईंना ग्रामपंचायतीने ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कारा’ने गौरविले आहे. प्रक्रिया उद्योगातील दखल घेऊन दोन वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ग्रामीण लघू उद्योजिका म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.

कुटुंबाची मिळाली साथ...

देसाई कुटुंबाची एक एकर शेती आहे. यामध्ये हंगामानुसार मका, ऊस, ज्वारी, भुईमूग लागवड असते. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी पाच संकरित गाईंचे संगोपन केले आहे. दररोज ७० लिटर दुधाचे संकलन होते. शेतीसह दुग्ध व्‍यवसायातही अर्चनाताई अग्रेसर आहेत. चार दिवस तिखट निर्मिती आणि तीन दिवस शेतीकामांचे नियोजन असते.

यामध्ये पिकांची मशागत, चारा कापणी तसेच अन्य शेतकामामध्ये अर्चनाताई मग्न असतात. अर्चनाताईंचा मुलगा राजवर्धन हा हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम शिकत आहे. मुलगी रुचिता ही वैद्यकीय शिक्षण घेत आहे. दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी तिखट, मसाला निर्मिती व्यवसायाचा मोठा हातभार लागल्याचे त्या सांगतात. प्रक्रिया व्यवसायातील दैनंदिन कामकाज तसेच विक्रीसाठी अर्चनाताईंना पती हिम्मतराव यांच्यासह सासरे बाजीराव, सासूबाई लक्ष्मीबाई यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.

अर्चना देसाई, ८३८०८७४८४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT