Agriculture Agrowon
यशोगाथा

Farming Technique : वर्षात पाच वेळा परदेशी भाज्या घेण्याचे तंत्र

Exotic Vegetables : कोल्हापूर जिल्ह्यातील चिंचवाड (ता. शिरोळ) या ऊस पट्ट्यातील सेवानिवृत्त नागेंद्र घाटगे यांनी सुमारे नऊ परदेशी (एक्सॉटिक) भाजीपाला पिकांच्या शेतीचे तंत्र अवगत केले आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Crop Rotation : कोल्हापूर जिल्ह्यातील चिंचवाड (ता. शिरोळ) हा ऊसपट्टा म्हणून ओळखला जातो. येथील नागेंद्र घाटगे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सांगली आगारात ३० वर्षे वाहक तर वाहतूक नियंत्रक म्हणून पाच वर्षे सेवा केली. त्यांची साडेचार एकर शेती आहे. पूर्वी त्यात ऊस असायचा.

सन २०२१ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीत विविध प्रयोग करण्यास सुरुवात केली. टाकळीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे यांच्या प्रोत्साहनातून त्यांना परदेशी भाज्यांच्या (एक्सॉटिक) शेतीचा मार्ग मिळाला. ‘एसटी’ च्या सेवेमुळे विविध गावांना त्यांच्या फेऱ्या होत. त्या काळात शेतकऱ्यांचे प्रयोग पाहण्याची संधीही त्यांना मिळे.

परदेशी भाज्या उत्पादनाचे तंत्र

सन २०१८ मध्ये तीस गुंठ्यांत थाई चिलीचे उत्पादन घेऊन त्यांनी परदेशी भाजीपाला शेतीचा श्री गणेशा केला. बाजारपेठेतील मागणी, पिकांचा कालावधी यांचा अभ्यास करून त्यांनी वर्षभर ही पिके घेत राहण्याचे तंत्र विकसित केले. त्यानुसार एका एकरात प्रत्येकी चार गुंठ्यांत एक अशी सुमारे सात पिके घेतात.

यात ब्रोकोली, आइसबर्ग, रोमन, पाकचॉय, आइसबर्ग लेट्यूस प्रकारातील ग्रीन व रेड लोलो, झुकिनी, पार्सली, ॲरूगुला आदींचा समावेश असतो. या पिकांची लागवड केल्यानंतर एक महिन्याने उत्पादन सुरू होते. तर एकूण दोन महिन्यांत पीक संपून जाते. झुकिनी व रेड कॅबेज या भाज्यांना मात्र दोन महिन्यांपेक्षा थोडा जास्त कालावधी लागतो.

वर्षभरात पाच पिके

जानेवारीस एका एकरात सात पिकांची लागवड केली की वर्षभरात या पद्धतीने चार वेळा उत्पादन घाटगे घेतात. पाचवे उत्पादन उसात आंतरपीक म्हणून घेतले जाते. या भाज्यांचे बियाणे मागवून घेतले जाते. स्थानिक रोपवटिकाचालकांकडून त्याची रोपे तयार करून घेतली जातात. प्रत्येकी चार गुंठ्यांत पीकनिहाय साडेतीन हजार ते चार हजार रोपांची गरज भासते. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी व खते यांचे व्यवस्थापन केले जाते.

काढणी व विक्रीचे नियोजन

एकदा काढणीचा हंगाम सुरू झाला की हे काम दररोज सुरू होते. त्यासाठी दोन मजुरांची मदत घेतली जाते. घाटगे यांनी दिल्ली, मुंबई, पुणे, गोवा, हैदराबाद, बंगळूर आदी ठिकाणी आपल्या भाज्यांना मार्केट तयार केले आहे. मुंबईसारख्या बाजारपेठेसाठी सकाळी आठ ते दहा तर दक्षिणेकडील बाजारपेठांसाठी दुपारी तीन ते पाच या वेळेत काढणी होते. दररोज प्रति भाजीचे एक ते दोन बॉक्स या दरात पाठवणी होते. मध्यस्थ किंवा थेट व्यापाऱ्यांना भाजीपाला पाठवण्यात येतो.

फायदेशीर ठरलेली पीकपद्धती

प्रत्येक दोन महिन्यांच्या एकरी पीकचक्रातून खर्च वजा जाता सुमारे ५० ते ६० टक्के नफा मिळत असल्याचे घाटगे सांगतात. सेवानिवृत्त होताना जितके वेतन मिळत होते त्याहून जास्त वेतन आता शेतीतून मिळत आहे असे ते अभिमानाने व आनंदाने सांगतात. पारंपरिक भाजीपाला पिकांमध्ये दरांची मोठी अनिश्‍चितता असते.

हमखास उत्पन्नाबाबत अनेक वेळा अंदाज येत नाही. परदेशी भाज्यांबाबत मात्र आपल्‍याला परवडत असलेल्या दरांमध्येच विक्री होत असल्‍याने ही शेती सुरु केल्यापासून अजून तरी नुकसान झाले नसल्याचा त्यांचा अनुभव आहे. ‘टेलिकम्युनिकेशन’ विषयात पदविका घेतलेला मुलगा प्रशांत देखील नोकरीच्या मागे न लागता पूर्णवेळ शेतीत उतरला असून, तो भाजीपाला उत्‍पादनाची महत्त्वाची जबाबदारी आता सांभाळतो आहे.

ऊस पट्ट्यात परदेशी भाज्यांचा प्रयोग व त्यातही विविध प्रकार घेण्याचे धाडस या वेगळ्या प्रयत्नांमुळे घाटगे यांनी प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी अशी ओळ मिळवली आहे. श्री गुरुदत्त साखर कारखान्याच्या विविध सभांमध्येही त्यांचा गौरव झाला आहे.

दर स्वतः ठरवतात

घाटगे यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या सर्व भाज्यांचा दर घाटगे स्वतः ठरवतात. बाजारातील सरासरी दर पाहून ते व्यापाऱ्यांशी चर्चा करतात व त्यानंतर दराची निश्‍चिती होते. तेजीच्या काळात प्रति भाजीच्या प्रकारानुसार किलोला ५० रुपयांपर्यंत तर मंदीच्या काळात २५ रुपये व त्यापुढे दर मिळतात.

ऑक्‍टोबर ते फेब्रुवारीदरम्यान मध्यम तर फेब्रुवारी ते जून दरम्यान दर कमी असतात. अनुभवाने घाटगे यांना दरांबाबतचे चांगले अंदाज आल्याने त्यानुसार लागवडीचे नियोजन करणे त्यांना शक्य झाले आहे. पीकफेरपालटाकडेही त्यांनी दुर्लक्ष केलेले नाही. सुरू उसाचे एकरी ६० ते ७० टन उत्पादन ते घेतात.

नागेंद्र घाटगे, ९८२२७६५७४७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT