Agriculture Success Story : कमी बाजारभाव, सुगीसाठी मजुरांची समस्या आदी कारणांनी अनेक ठिकाणी रब्बी ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. परंतु घरची धान्याची गरज, कडबा यासाठी दोन ते पाच एकरांत रब्बी ज्वारी घेणारे शेतकरी परभणी जिल्ह्यात पाहायला मिळतात.
जिल्ह्यात रब्बी ज्वारीखालील सरासरी क्षेत्र सुमारे एक लाख १३ हजारांच्या दरम्यान आहे. कोरडवाहू क्षेत्रात पाऊस चांगला असलेल्या वर्षी गोदावरीसह अन्य नदीकाठच्या खोल काळ्या कसदार जमिनीत ओलाव्यावर ज्वारीची उत्पादकता चांगली येते. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरीही हलक्या जमिनीवर हे पीक घेतात.
देशमाने यांची शेती
परभणीपासून ३० किलोमीटरवर मंगरूळ (ता. मानवत) येथील अशोकराव देशमाने कुटुंब ज्वारी, गहू व संरक्षित शेतीतील प्रयोगशीलतेसाठी प्रसिद्ध व आदर्श ठरले आहे. वडिलोपार्जित त्यांची दोन एकर शेती होती. गावात किराणा व्यवसाय होता. तो बंद करून व शेतीतच पूर्ण लक्ष घालून बावीस वर्षात टप्प्याटप्प्याने २० एकर जमिनीचे ते मालक झाले आहेत. हलकी ते मध्यम प्रकारची जमीन आहे. एकुलते एक चिरंजीव ज्ञानेश्वर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासपूर्ण शेती करतात.
पीक पद्धती
जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात शेती.
मात्र पैठण येथील धरणातील पाणी उपलब्धतेवर सिंचनाचे भवितव्य अवलंबून.
दोन वर्षांतून एकदा जायकवाडी डाव्या कालव्याचे आवर्तन मिळत नाही. अशा परिस्थितीत विहिरी, बोअर व एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे यांच्या उभारणीतून संरक्षित पाणीसाठा निर्माण केला.
एक एकर १३ गुंठ्यांत पॉलिहाउस. त्यात दर्जेदार जरबेरा उत्पादन.
पॉलिहाउसमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’. त्याचे पाणी शेततळ्यात साठवले जाते.
खरीप व रब्बीतील बहुतांश मुख्य पिके घेतातच. दोन एकरांत सीताफळ लागवड.
रब्बी ज्वारीची शेती
रब्बी हंगमात दगडी ज्वारी हे देशमाने यांचे मुख्य पीक आहे. गावरान, पारंपरिक दगडी ज्वारी वाणाचे जतन त्यांनी केले आहे. दरवर्षी दोन एकर क्षेत्र असते. या वाणाच्या धान्याची भाकरी चवीला रुचकर व कडबाही पालेदार, गोडसर असतो. जमीन हलकी मुरमाड असल्याने केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता जमीन ओलावून टोकणी करावी लागते. पूर्वी प्रचलित पद्धतीत दोन ओळींत ६ ते ८ इंच अंतर ठेवून बैलचलित तिफणीने पेरणी व्हायची. एकरी ६ ते ७ किलो बियाणे लागायचे. भुईदांडाने प्रवाही पद्धतीने पाणी देत.
सुधारित तंत्राचा वापर
ज्ञानेश्वर भारतीय किसान संघाचे तालुकाध्यक्ष आहेत. या अनुषंगाने संघाचे प्रदेश संघटन मंत्री (महाराष्ट्र, गोवा, गुजरात) दादा लाड यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. त्यातूनच ज्वारीत सुधारित तंत्रज्ञानाचे प्रयोग ज्ञानेश्वर यांनी सुरू केले. सोयाबीन काढणीनंतर जमीन तयार केली जाते. रेघाट्याने प्रत्येकी तीन फुटांवर रेघा ओढून त्यामध्ये ठिबकच्या नळ्या अंथरण्यात येतात.
१०-२६- २६ किंवा संयुक्त खताचा एकरी ५० किलोप्रमाणे वापर होतो. ठिबकच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येकी सहा इंचावर यंत्राव्दारे गंधकाची बीजप्रक्रिया केलेल्या ज्वारी बियाण्याची टोकण होते. या पद्धतीत दोन रोपांत एक फूट तर दोन ओळींत दोन फूट राहाते. रानडुक्कर वा वन्यप्राण्यांच्या उपद्रवापासून संरक्षण करण्यासाठी शेतीभोवती तारेचे कुंपण केले आहे.
तंत्राचे फायदे
कोळपणीद्वारे आंतरमशागत सुलभ होते.
टोकणणीनंतर त्वरित ठिबक सिंचन केले जाते. परिणामी उगवण चांगली होते.
वाफसा स्थितीनुसार फुलोरा अवस्था ते कणसात दाणे भरेपर्यंत पाण्याचे संरक्षण मिळते. ठिबकमुळे पाण्याची बचत होते. प्रवाही पाणी देण्याच्या पद्धतीपेक्षा दुप्पट क्षेत्रावर पेरणी येते.
उत्पादन
घरचेच बियाणे असते. व्यवस्थापन खर्चही कमी असतो. पूर्वी प्रचलित पद्धतीत एकरी सात- आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळे. मागील दोन वर्षांत एकरी १३ ते १५ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. वर्षभराच्या घरच्या अन्नधान्यासाठी तसेच सालगड्यांना चंधी (धान्य स्वरूपात मजुरी) देण्यासाठी ज्वारीची गरज पूर्णपणे भागते. उर्वरित ज्वारीची विक्री करता येते. कडब्याच्या एकरी चारशे ते पाचशे पेंढ्या मिळतात. सध्या त्यास शेकडा अडीच हजार रुपयांपर्यंत दर आहे. त्याची कुट्टी करून वापरल्यामुळे बैलजोडी, गाय व म्हैस यांना वर्षभर पुरेसा खाद्यसाठी होतो.
शेतीतील व्यवस्थापन
पाण्याच्या उपलब्धतेनुसार जानेवारीत कलिंगडाची दोन ते सहा एकरांत लागवड. एकरी १८ ते २२ टन उत्पादन.
एकरभर कांदा बीजोत्पादन. ३ ते ४ क्विंटल उत्पादन.
देशमाने पिता, पुत्र स्वतः शेतीत राबतात. कुटुंबातील महिला सदस्यांची त्यांना मदत.
पाच सालगडी. सुगीच्या कामांमध्ये अधिक मजुरांची मदत घेण्यात येते.
गहू उत्पादन
पूर्वी गव्हाची तिफणीने दुहेरी पेरणी केली जायची. एकरी ३५ ते ४० किलो बियाणे वापर होता. भुईदांड्याने किंवा नागमोडी पद्धतीने पाणी दिले जायचे. जमीन हलकी असल्याने सात- आठ पाणी पाळ्या द्यावा लागत. एकरी उत्पादन आठ ते बारा क्विंटलपर्यंत मिळे. आता ज्वारीसाठी वापरलेल्या तंत्राचाच वापर गहू लागवडीसाठी केला जात आहे.
यात घरच्याच बन्सी वाणाचा उपयोग होतो. ठिबक सिंचन, तीन फूट अंतरावर रेघोट्या, दोन रोपांत सहा इंच तर दोन ओळींत दोन फूट अंतर ठेवून यंत्राद्वारे एका जागी एक बियाणे टोकण अशी पद्धती असते. या पद्धतीत एकरी ४ ते ५ किलो बियाणे लागते. ओलाव्यानुसार ८ ते १० दिवसांनी पाणी व्यवस्थापन होते. गव्हाचे एकरी किमान १६ ते १८ क्विंटल उत्पादन मिळते. गावरान बन्सी गव्हाला मागणी असते. दर चांगला मिळतो.
- ज्ञानेश्वर देशमाने, ९१७२७०१८४४,
- अशेक देशमाने, ९८८१६३८६५०
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.