चंद्रकांत जाधव
गुजरात राज्यातील वेळदा (ता.निझर, जि. तापी) हे गाव मिरची, पपई, कलिंगड, कापूस आदींच्या उत्पादनात आघाडीवर आहे. नंदूरबार शहरापासून सुमारे २२ किलोमीटर अंतरावर असल्याने येथील शेतकऱ्यांचे संबंध शेती व व्यापारानिमित्त नंदुरबार, शहादा भागाशी अधिक आहेत. गाव तापी नदीकाठी आहे. मध्यंतरी सलग दुष्काळामुळे (Drought) नापिकीची समस्या आली. पण परिसरात नदीमुळे जलसाठे टिकून राहिले. बागायती कायम राहिली.
पटेल यांची शेती
वेळदा गावातील गणेश पटेल उच्चशिक्षित असून, सुरत (गुजरात) येथे कंपनीत ‘विपणन’ विभागात नोकरी करायचे. कुटुंबाची विभागणी झाली. पुढे घरच्या ११ एकर काळ्या कसदार शेतीतच करिअर करायचे असे ठरवून ते गावी परतले. पाट पद्धतीने कापूस घेतला जायचा. मिरची होती. शेतीचे अर्थकारण समाधानकारक नव्हते. वडील अशोकभाई यांच्या समर्थ साथीने गणेश यांनी मजबूत नियोजन व पीकपद्धतीत सुधारणा करून शेतीत बदल सुरू केले. आज दोन विहिरी असून जलसाठे मुबलक आहेत. एक मिनी व एक मोठा ट्रॅक्टर, पाच सालगडी आहेत. २२ एकर शेती भाडेतत्त्वावर करण्यासाठी घेतली आहे.
पीक व्यवस्थापन
सर्व पिके सूक्ष्म सिंचनाखाली आणली आहेत. पपई प्रमुख पीक असून दरवर्षी १२ ते १३ एकर क्षेत्र असते. मिरची आठ ते १० एकर तर कपाशी चार ते पाच एकर असते. पपईची लागवड दरवर्षी एप्रिलच्या मध्यात किंवा मेच्या सुरुवातीला होते. लागवड उंच गादीवाफ्यावर आठ बाय सव्वा सात फूट अंतरावर होते. नाशिक येथून रोपे आणली जातात. रोपांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ‘क्रॉप कव्हर’चा वापर होतो. सिंचन व खतांचे वेळापत्रक तयार केले आहे. एकरी ३०, ३५ ते ४० टनांपर्यंत उत्पादन मिळते. एकरी एक लाख रुपये उत्पादन खर्च येतो. एक ते दीड लाख रुपये नफा मिळतो.
बाजारपेठांचा अभ्यास व विक्री
बाजारात मागणी असलेल्या तैवान पपईची लागवड होते. त्याचा गर रसाळ, गोड व लालसर असतो. फळे गोल व लांबट गोल असतात. या फळांना दिल्ली, राजस्थानात मागणी आहे. उत्तम व्यवस्थापनातून हंगाम एप्रिलपर्यंत सुरू असतो. काश्मीर व अन्य भागांत मार्चमध्येही पपईला उठाव असतो. यामुळे या काळात अनेकदा चांगले दर मिळाले आहेत. नोव्हेंबरमध्ये दिल्ली, राजस्थान येथील व्यापारी खरेदीसाठी दाखल होतात. बाग पाहून ते एकरी १५ ते २० हजार रुपये आगाऊ रक्कम देऊन नोंदणी करतात. गेली तीन वर्षे सुरुवातीला (नोव्हेंबर) जागेवर सात रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. उत्तरेकडे थंडी वाढताच किंवा धुके येताच दर कमी होतात. पण जानेवारीत आणखी मागणी वाढते. ती फेब्रुवारीतही अनेकदा कायम राहते. यामुळे मार्चपर्यंत सात ते तीन रुपयांपर्यंत दर राहतात.
निर्यातक्षम मिरचीचे उत्पादन
जूनमध्ये पाच बाय सव्वा फूट अंतरावर काळ्या कसदार जमिनीत गादीवाफा व मल्चिंग तंत्राचा उपयोग करून मिरची लागवड होते. अधिक उत्पादनक्षम, तीन इंच लांब, तिखट, कमी बिया असलेल्या चमकदार अशा वाणांची निवड केली जाते. एकरी १५ ते २० टन उत्पादन साध्य केले जाते. एकरी उत्पादन खर्च दोन लाख रुपयांपर्यंत असतो. या मिरचीला अलीकडील वर्षांत किलोला २५ रुपयांपासून ते ५० रुपयांपर्यंत दर मिळाला. मागील वर्षी तो कमाल ७५ रुपयांवर गेला होता.
हिरव्या मिरचीची वाका (गुजरात) येथील व्यापारी थेट जागेवरून खरेदी करतात. तिची निर्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सुरू असते. त्यास प्रति किलो ४० ते ५० रुपये दर मिळतो. दर कमी असतानाच्या काळात मिरची झाडावरच लाल करून, काढणी करून व वाळवून विकली जाते. त्यास नंदुरबार बाजारपेठेत दोन वर्षे प्रति किलो १२० ते २०० रुपये व सरासरी १५० रुपये दर मिळाला आहे. मिरचीचा बेवड पपईला चांगला मानला जाते. त्यामुळे मिरचीनंतर पपईची लागवड केली जाते.
अन्य पिकांचे उत्पादन
-दरवर्षी गुलाबी बोंड अळी व अतिपावसामुळे होणाऱ्या नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी
बीटी कपाशीची जूनमध्ये लागवड.
-प्रति क्विंटल साडेचार हजार, पाच हजार व साडेआठ हजार रुपयांपर्यंत दर मिळाले.
-मागील वर्षी अडीच एकरात कारल्याचे जोमदार उत्पादन. परदेशात यशस्वी निर्यात.
ज्ञानवृद्धीचा फायदा
नोकरी सोडून थेट शेतीत उतरल्याने गणेश यांना सुरुवातीला शेतीचे गणित लक्षात येत नव्हते. गुजरातमधील पिंपळोद (जि. तापी) येथील प्रगतिशील शेतकरी व खरेदीदार योगेश पटेल यांच्याकडून मग मार्गदर्शन घेत व्यवस्थापनात सुधारणा केल्या. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभा यांच्या संपर्कात राहून पीक व्यवस्थापन प्रशिक्षणातही सहभाग घेतला. नाशिक, नंदूरबार, शहादा, शिरपूर भागांत पपई, मिरची शिवारफेरी, प्रगतिशील शेतकऱ्यांसह खरेदीदारांशी संपर्क यामाध्यमातून ज्ञान वाढवले. प्रत्येक पिकाचे उत्पादन, ताळेबंद यांच्या नोंदी ते वहीत ठेवतात.
गणेश पटेल, ९५१०३२२१३८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.