

Animal Care : जाखणगाव (ता. खटाव, जि.सातारा) हे छो़टेसे गाव. गेल्या काही वर्षात या शिवारात लोकसहभागातून जलसंधारणाची चांगल्या प्रकारे कामे झाल्याने पाणी टंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. गावशिवारात कांदा, सोयाबीन आणि ऊस ही महत्त्वाची पिके आहेत.
या गावातील सुमित जितेंद्र शिंदे हा उपक्रमशील तरूण शेतकरी. शिंदे कुटुंबाची साडेतीन एकर शेती असून चारा, कांदा, सोयाबीन लागवड असते. शिक्षण घेत असतानाच शेतीपूरक व्यवसाय करण्याचे ध्येय त्याने ठेवले होते. बीएससी शिक्षण संपल्यानंतर शेतीपूरक व्यवसायाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन, मेंढीपालन व्यवसायाची निवड केली. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणच्या शेळीपालन प्रकल्पांना भेट दिली. या व्यवसायात येणाऱ्या अडचणी, व्यवस्थापन तंत्र, आजार, लसीकरण आदी विषयांची माहिती घेतली. याचबरोबरीने फलटण येथील नारी संस्था तसेच तासगाव (जि.सातारा) येथील किशोर घोरपडे यांचा मेंढीपालन प्रकल्पास भेट दिली.
त्यांच्याकडे सुमारे दीडशेच्यावर मेंढ्या होत्या. पहिल्यांदाच त्यांना मेढ्यांचे बंदिस्त पालन पाहायला मिळाले. पशू तज्ज्ञ तसेच घोरपडे यांच्या सोबत मेंढीपालन व्यवसायाबाबत सविस्तर माहिती घेऊन सुमित यांनी पूरक व्यवसायाच्यादृष्टीने पाऊल टाकले.
मेंढीपालनास सुरवात
सुमित शिंदे यांनी २०२० मध्ये मेंढीपालन करण्याचा निर्णय घेतला. शेड उभारणीबाबत सुमित शिंदे म्हणाले की, पहिल्यांदा ३० फूट बाय ३२ फूट आकारमानाचे दोन पाखी शेड बांधले. मेंढ्यांसाठी एक गुंठा शेड आणि एक गुंठा मुक्तसंचार गोठा आहे. मेंढ्यांना खाद्य खाणे सोपे जाईल या पद्धतीने गव्हाणी तयार केल्या.
पूरक व्यवसायासाठी मेंढीच्या नारी सुर्वणा जातीची निवड केली. या मेंढ्यांना एकावेळी दोन पिल्ले होतात. त्यांची वाढ इतर जातींपेक्षा चांगली होते. व्यवस्थापनासाठी ही जात सोपी असल्याने फेब्रुवारी, २०२१ मध्ये शिंदे यांनी नारी सुवर्णा जातीची दहा मादी पिल्ले आणि एक नर असा संच आणला.
यासाठी सुमारे दोन लाख २५ हजार रुपये खर्च आला होता. गोठ्यामध्ये ही पिल्ले आणल्यानंतर वातावरण बदलामुळे ती थोडी आजारी पडली, परंतु वेळेवर उपचार, आहार व्यवस्थापन केल्याने आठ दिवसात ही पिल्ले ताजीतवान झाली. पशूतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार या पिल्लांचा आहार आणि आरोग्य व्यवस्थापनावर भर दिल्याने त्यांची चांगली वाढ होऊ लागली.
पिल्ले आणून मेंढीपालन व्यवसाय सुरू केल्यावर ही पिल्ले मोठी होऊन उत्पन्न मिळण्यास सरासरी एक ते दीड वर्षाचा कालावधी जाणार होता. या दरम्यान उत्पन्नासाठी शिंदे यांनी आटपाडी येथील बाजारातून २० देशी नर मेंढे खरेदी केले. त्यांचा चांगला सांभाळ केला. सहा महिन्यानंतर चांगली वाढ झालेल्या नरांची निवड करून गावातच विक्री केली.
निरोगी सुदृढ मेंढ्याचे मटण मिळू लागल्यामुळे मागणीही वाढू लागली. एका नराला विक्री होईपर्यंत तीन हजार रुपये भांडवली खर्च आणि मूळ खरेदी पाच हजार असा एकूण आठ हजार रुपये खर्च आला होता.
चाळीस किलो वजनाच्या एका नराची विक्रीची सरासरी १४ हजार रुपयांपर्यंत झाल्याने अपेक्षित नफा मिळाला. या मिळालेल्या रक्कमेतून पुन्हा नारी सुवर्णा जातीच्या दहा मेंढ्या खरेदी केल्या. यामुळे मेंढ्याची संख्या वीसवर गेली. सध्या गोठ्यात लहान,मोठ्या ४८ मेंढ्या आहेत.
वर्षभराचे चारा नियोजन
सुमित शिंदे यांनी मेंढ्यांच्या खाद्य व्यवस्थापनासाठी दीड एकर क्षेत्र चाऱ्यासाठी राखून ठेवले आहे. यामध्ये मका, नेपिअर गवत आणि कडवळ लागवड केली जाते. वर्षभर चारा पुरवठ्यासाठी २५ टन मुरघास तयार केला जातो.
तसेच कोरड्या चाऱ्यामध्ये सोयाबीन आणि हरभरा पाल्याचा भुसा, भुईमूग वेल, कांद्याची पात वापरली जाते. दीड एकर क्षेत्राच्या चारही बाजूने शेवरीचे झाडे लावलेली आहे. त्याचा पाला आठवड्यातून एकदा मेंढ्यांच्या खाद्यामध्ये दिला जातो.
त्यासोबतच सकाळ, संध्याकाळी मक्याचा खुराक, सोयाबीन- गहू भरडा इत्यादी एकत्र करून मेंढ्यांच्या आहारात देतात. तसेच शिफारशीनुसार खनिज मिश्रण आणि जीवनसत्त्वांचा पुरवठा केला जातो.
व्यवसाय विस्ताराचे ध्येय
व्यवसाय सुरू केल्यापासून सुमित शिंदे यांनी आत्तापर्यंत ४० मादी पिल्लांची विक्री केली आहे. त्याबरोबरच पाच मोठ्या गाभण मेंढ्या विकल्या आहेत. नारी सुवर्णा या जातीला चांगली मागणी असल्याने अपेक्षित दर मिळतो आहे. सात महिन्यांचे मादी पिल्लू सरासरी २० हजार रुपये तर मोठी गाभण मेंढी ३५ हजार रुपयापर्यंत विकली गेली आहे. सध्या गोठ्यामध्ये पैदाशीच्या २० मेंढ्या आणि २५ लहान,मोठी पिल्ले आहेत.
सरासरी ३० किलो वजनाचा नर मेंढा झाल्यावर त्यांची ३५० रुपये प्रति किलो वजनाने विक्री केली जाते. सध्या मटणाचा दर प्रति किलो ६५० रुपये आहे. लोकांच्या मागणीनुसार मटण पुरविले जाते. यासाठी मटण विक्रेत्या दुकानदारासोबत सामंजस्य करार केला आहे. गावामध्ये स्वच्छ आणि पौष्टिक मटण मिळू लागल्यामुळे नर मेंढ्यांची मागणी वाढली आहे. गावशिवारात मेंढ्यांचे मार्केट तयार झाले आहे.
भविष्यातील नियोजनाबाबत सुमित शिंदे म्हणाले की, मेंढीपालन हा व्यवसाय सुरू करताना शेडबांधकामासाठी आर्थिक अडचण होती. त्यासाठी तीन लाख रुपये कर्ज काढले. हे कर्ज दोन वर्षांमध्ये फेडले. सुरुवातीला केलेल्या गुंतवणुकीतून बाहेर पडून गेल्या वर्षभरात आर्थिक नफा कमवला आहे.
या व्यवसायाला तीन वर्ष झाली आहेत. दरवर्षी या व्यवसायातून अडीच ते तीन लाख रुपयांची उलाढाल होते. शेती आणि मेंढीव्यवस्थापनात मला वडील जितेंद्र शिंदे आणि आई कल्पना शिंदे यांची चांगली मदत होते.
मी मेंढीपालनाच्या सोबत एका सामाजिक संस्थेतही काम करतो. त्यानिमित्ताने बाहेर गावी जावे लागले तर वडील मेंढ्यांचे व्यवस्थापन पाहतात. मेंढ्यांच्या आरोग्य व्यवस्थापनासाठी डॉ.अमर पवार यांचे मार्गदर्शन मिळत आहे. येत्या तीन वर्षात मेंढ्यांची संख्या पाचशेपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
असे आहे व्यवस्थापन
पशूतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लसीकरण. महिन्यातून एकदा तपासणीकरून जंतनाशकाची मात्रा.
सकाळी दीड तास आणि संध्याकाळी अर्धा तास मेंढ्यांच्या व्यवस्थापनासाठी वेळ. यावेळी चारा, पाणी व इतर कामांचे नियोजन.
मुरघास तयार करून ठेवल्याने मेंढ्यांना पौष्टिक चाऱ्याचा पुरवठा. वाळलेल्या चाऱ्याचीदेखील साठवण.
पिल्लांना पुरेशा प्रमाणात दूध पुरवठा. यामुळे पिल्लांचे वजन वाढण्यास मदत.
महिन्यातून एकदा गोठ्याची स्वच्छता. लेंडी खताचा स्वतःच्या शेतीमध्ये वापर.
मेंढ्यांना किमान दोन पिल्ले झाल्याने नफ्यात वाढ.
- सुमित शिंदे, ९०६७२३१९७७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.