Organic Jaggery Production
Organic Jaggery Production Agrowon
यशोगाथा

Organic Jaggery Production : सेंद्रिय गूळ निर्मितीसह चहा, फ्रॅंचायसी, मॉलची साखळीही

सुदर्शन सुतार

सोलापूर- पुणे महामार्गावर टेंभुर्णी नजीक पंढरपूर रस्त्यावर अकोले बुद्रुक (ता. माढा) येथील प्रगतिशील शेतकरी राजेंद्र पाटील यांची १४ एकर शेती आहे.

जेमतेम पाचवीपर्यंत ते शिकले असले, तरी शेतीची आवड आणि दूरदृष्टीतून आपल्या महेश, विकीन आणि अर्चना या तिघा मुलांना त्यांनी कृषी पदवीधर (Agriculture Graduate) केले. मुलगी रोहिणीही उच्चशिक्षित आहे.

दहा एकर ऊस, एक एकर देशी केळी (Desi Banana) अशी त्यांची पीकपद्धती आहे. अलीकडेच दोन्ही मुलींची लग्ने झाली. पत्नी सौ. मनीषा यांची मोठी साथ आहे. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली महेश आणि विकिन हे पाटील बंधू आता शेती व प्रक्रिया व्यवसायाची (Processing Industry) मुख्य जबाबदारी पेलतात.

सेंद्रिय आधारित व्यवसाय आखणी (Organic Jaggery Production)

मुलांनी नोकरीऐवजी शेतीतच असा व्यवसाय करावा की अर्थप्राप्ती चांगली होताना आपल्यासोबत अन्य शेतकरी व ग्राहकांचेही हीत व्हावे अशी वडिलांची इच्छा होती.

त्यादृष्टीने सेंद्रिय व आरोग्यदायी अन्नाचे (Organic Food) महत्त्व, ग्राहकांची गरज या बाबी लक्षात घेऊन पाटील बंधूंनी शेतीपद्धतीत बदल व व्यवस्थापन (Farming Management) सुरू केले. पदवीचे शिक्षण सोबतीला होतेच.

त्याच दृष्टीने सुमारे पाच-सहा वर्षांपासून पाटील संपूर्णपणे सेंद्रिय शेतीत (Organic farming) गुंतले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जैविक मिशनअंतर्गत केव्हीके, मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेती प्रशिक्षण व प्रमाणीकरण प्रक्रियाही सुरू केली आहे.

सेंद्रिय ऊस लागवड

सेंद्रिय गुळाच्या उत्पादनापासून व्यवसायाची (Organic Jaggery Production) सुरुवात केली. त्यासाठी उसाचे व्यवस्थापनही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचेच ठेवले. को-४१९ या वाणाची निवड केली. त्याचा रस किंवा गूळ सर्वोत्तम समजला जातो हे अभ्यासले.

वेगळ्या पद्धतीने ‘जेसीबी’ यंत्राने खड्डे घेऊन आठ बाय दोन फूट अंतरावर लागवड केली. तेव्हा काही जण त्यांना हसले. अशा पद्धतीने कुठे ऊस लागवड असते का, अशा टीका केल्या.

पण त्याकडे दुर्लक्ष केले. पहिल्या वर्षी आपल्या उसापासून गूळ तयार केला तरी खासगी गुऱ्हाळातूनही तो तयार करून घ्यावा लागला. त्याचे चांगले ‘मार्केटिंग’ केले.

उत्पन्न चांगले मिळाले. मग उत्साह वाढला. व्यवसायाचा हा ‘टर्निंग पॅाइंट’ ठरला. तेव्हापासून पाटील बंधूंनी मागे वळून पाहिलेले नाही.

उसाच्या विविध जातींची लागवड

पाटील यांनी उसाच्या विविध वाणांची लागवड ‘ट्रायल’ म्हणून केली आहे. गुळासाठी उतारा, वजन, कमी पाण्यात येणारा ऊस अशी विविध वैशिष्ट्ये त्यातून तपासली जात आहेत.

यात दीड एकरावर देशी काळा ऊस (शिवकालीन), दोन एकर को-४१९, वीस गुंठे को-६७१, १५ गुंठे को-९२००१०, अडीच एकर को-८६०३२, सव्वा एकर को-८००५, दोन एकर फुले २६५ आणि अर्धा एकर को-४३४ अशी ही विविधता आहे.

महामार्गावर थाटले गुऱ्हाळ

दोन वर्षांपूर्वी सोलापूर- पुणे महामार्गावर टेंभुर्णीनजीक आढेगाव पाटीवर महामार्गालगत पारंपरिक पद्धतीचे गुऱ्हाळ उभारले आहे. स्वतःकडील उसासह गटातील काही सेंद्रिय शेतकऱ्यांकडूनही ऊस घेऊन त्याचे गाळप केले जाते.

कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय गूळ तयार केला जातो. त्याशिवाय पावडर, काकवी ही उत्पादने तयार केली जातात.

सेंद्रिय मसाला गूळ हे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनही ग्राहकांची पसंती मिळवते आहे. या गुळात सुंठ, बडीशेप, आले, वेलची, शतावरी आणि देशी गाईचे तूप आदींचा समावेश आहे.

आरोग्याच्या दृष्टीने हा गूळ चांगला आहेच. पण मसाल्यांच्या मिश्रणामुळे त्याला वेगळा स्वाद तयार झाला आहे. सध्या दररोज पाच टन उसाचे गाळप होते. त्यातून जवळपास ४०० किलो गूळ आणि १०० लिटर काकवीचे उत्पादन होते.

प्रति किलो गूळ शंभर रुपये, गूळ पावडर १५० रुपये, १४ ग्रॅम क्यूब प्रति किलो १५० रुपये आणि काकवी प्रति लिटर १५० रुपये असे दर आहेत.

गुळाच्या चहासह सेंद्रिय उत्पादनाच्या फ्रँचायसी

उसावर आधारित मूल्यवर्धित उत्पादनांचे ‘मार्केटिंग’ आणि विक्रीत सुसूत्रता यावी, ग्राहकांनाही त्याची चांगली ओळख पटावी यासाठी ‘बळीराजा’ ब्रॅण्ड विकसित केला आहे.

त्यातूनच गुळाचा चहा ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यासाठी स्वतःची दोन विक्री केंद्रे उभारली आहेत. मात्र याच ब्रॅण्डने परिसरातील दहा ठिकाणी फ्रँचायसी दिल्या आहेत.

याशिवाय फळे, भाजीपाला, धान्य, घाण्यावरील तेल, पंचगव्य उत्पादने, केळीचे वेफर्स, विविध प्रकारच्या डाळी आणि अन्य पदार्थांचा बळीराजा सेंद्रिय मॅालही सुरू केला आहे. त्याच्याही चार फ्रँचायसी देऊन त्या सुरूही झाल्या आहेत. काही प्रक्रियावस्थेत आहेत.

शेतकरी गट ते शेतकरी कंपनी

शेतकऱ्यांना पिकवायला चांगले येते पण विक्री व्यवस्था अजून मजबूत होणे गरजेचे आहे हे महेश यांनी जाणले. केवळ एकट्या-दुकट्याकडून हे शक्य नाही हे लक्षात घेऊन अन्य शेतकऱ्यांना आपल्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

बळीराजा सेंद्रिय शेतकरी गट त्यासाठी स्थापन केला होताच. पण आतापर्यंत पुरुषांचे १५ आणि महिलांचे १८ गट स्थापन केले आहेत. त्यातून जवळपास ३० गावांतील सुमारे ६०० शेतकरी महेश यांच्यासोबत जोडले गेले आहेत.

त्यांच्याकडूनच सेंद्रिय उत्पादने घेऊन मॅाल साखळी उभारण्याचे काम सुरू आहे. त्याही पुढे जाऊन बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनी सुरू करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

आश्‍वासक उलाढाल

‘ऑरगॅनिक बळीराजा’ नावाने संकेतस्थळ, फेसबुक, व्हॉट्‍सॲप व इन्स्टाग्रामच्या माध्यमांतून उत्पादनांचा प्रसार कला जात आहे.

ठोक व किरकोळ व्यापारी व थेट ग्राहकांकडून उत्पादनांना मागणी येत आहे. मागील वर्षी एकूण सर्व ‘ॲक्टिव्हिटीज’मधून दोन वर्षांपूर्वी वार्षिक ३५ लाखांची उलाढाल झाली.

मागील वर्षी ती ८५ ते ९० लाख रुपयांची झाली. यंदा गुऱ्हाळघराची गाळपक्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यंदा एकूण उलाढाल चार कोटी रुपयांपर्यंत करण्याचे उद्दिष्ट आहे.

संपर्क ः महेश पाटील, ८८०५०४५४९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Technology : कापूस तंत्रज्ञान मिशनचा दुसरा टप्पा राबविणार

Maize Market : मलकापूरमध्ये मक्याला मिळतोय सरासरी २०८० रुपयांचा दर

Summer Sowing : पावणेसात हजार हेक्टरने उन्हाळी पिकांत वाढ

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Farmer Incentive Subsidy : प्रोत्साहन अनुदानासाठी साडेआठ लाख शेतकरी अपात्र

SCROLL FOR NEXT