
Amravati News: विदर्भात मोठे क्षेत्रावरील पीक हुमणीने पोखरल्यानंतर आता वरातीमागून घोड्यांचा आदर्श जपत कृषी विभागाने हुमणी नियंत्रणासाठी जागृतीपर मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ॲग्रोवन’मधून सोमवारी (ता.२८) वृत्त प्रकाशित होताच आयुक्तालयाकडून झालेल्या कानउघाडणीनंतर हे अभियान राबविले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
विदर्भात यंदा पहिल्यांदाच हुमणीचा प्रादुर्भाव मोठ्या क्षेत्रावर झाला आहे. ही कीड थेट मुळांनाच आपले भक्ष्य करीत त्याचा खाद्यान्न म्हणून वापर करते. त्यामुळे पीकाचा अन्नद्रव्य पुरवठा थांबतो व त्याची वाढ खुंटते. मुळ बाधित झाल्याने सोयाबीन, कपाशी, तुरीची झाडे शेतातच उन्मळून पडतात, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
विदर्भात सर्वदूर हजारो हेक्टरवर या किडीचा प्रादुर्भाव वाढला असताना बांधावर मार्गदर्शन करण्याचा दावा करणारा कृषी विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ होता. परिणामी हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी आपल्याचस्तरावर प्रयत्न चालविले होते.
त्याअंतर्गंत कृषी सेवा केंद्र त्यासोबतच दुर्गापूर, घातखेड येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेत उपाययोजनांची शेतकऱ्यांची लगबग वाढली होती. या साऱ्या घडामोडी गाव व शेतकऱ्यांच्या स्तरावर होत असताना कृषी विभाग मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांमधील वाढती अस्वस्थता व हुमणी प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात होणारा विस्तार लक्षात घेता ‘ॲग्रोवन’मधून सोमवारी (ता.२८) वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्याची दखल घेत थेट आयुक्तालयातून या संदर्भाने गावस्तरावर जागृती व उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर खळबळून जागे झालेल्या कृषी विभागाने हुमणी प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राची जिल्हानिहाय आकडेवारी संकलित केली.
त्यात एकट्या यवतमाळ जिल्ह्यात सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचा खुलासा झाला आहे. यवतमाळसोबतच अकोला, वाशीम बुलडाणा, अमरावती जिल्ह्यातही हुमणीने पीक पोखरल्याचे सांगितले जाते. त्या पार्श्वभूमीवर वरातीनंतर घोड्याचा आव आणत कृषी विभाग गावस्तरावर हुमणी नियंत्रण मोहीम राबविणार आहे. त्याच्या जोडीला अनुदानावर किटकनाशक पुरवठा करण्यासंदर्भातही चाचपणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केव्हीके दुर्गापूरच्या तज्ज्ञांची शिफारस
उन्हाळी नांगरणी ः अळ्या व कोष नष्ट होतात.
प्रकाश सापळा ः भुंगेरे आकर्षित करुन पकडता येतात.
झाडेझुडपे साफ करणे ः भुंग्याची विश्रांती ठिकाणी कमी करणे.
जैविक उपाय ः मेटारायझम ॲनीसपोलीया, २ लिटर प्रति एकर.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.