Agriculture Success story : नगर जिल्ह्यात कर्जत हा अवर्षणजन्य तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील पिंपळवाडी परिसराला देखील तसे शाश्वत पाणी नाही. त्यामुळे या भागात जिरायती पिकेच घेतली जातात. उडीद, मूग आणि तुरीचे दरवर्षी कर्जत, जामखेड तालुक्यात मोठे क्षेत्र असते. यात पिंपळवाडीचे संजय सोनबा पोटरे यांची तेरा एकर शेती आहे.
पूर्वीपासून ते चार ते पाच एकरांत तुरीचे उत्पादन घेतात. मात्र अलीकडील वर्षांत त्यांनी सुधारित पध्दतीचा अवलंब रून एकरी उत्पादनवाढ घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना पत्नी विमल, शिक्षण घेत असलेल्या अनिता आणि शुभांगी या मुलींची मोठी मदत होते. मुलगा रामकृष्णने कुस्तीचे प्रशिक्षण घेतले असून, तोही शेतीत मदत करतो. तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के, मंडळ कृषी अधिकारी संजय घालमे, कृषी सहाय्यक दत्ता सुद्रीक यांचे सहकार्य होते.
तूर पिकातील व्यवस्थापन पोटरे पूर्वी पाच बाय दोन फूट अंतरावर तुरीची लागवड करायचे. मागील दोन वर्षांत त्यांनी लागवडीच्या अंतरात बदल केला. यातील पहिल्या वर्षी १२ बाय सव्वा फूट, तर त्यापुढील वर्षी ८ बाय सव्वा फूट असे अंतर ठेवले. दोन्ही वर्षांचे प्रातिनिधिक नियोजन सांगायचे, तर नांगरट केल्यानंतर जमिनीचे सपाटीकरण करून बारा फुटांवर खोल सरी केली. त्यात एकरी एक टन शेणखत टाकले.
सरी बुजवून घेत त्यावर ठिबक यंत्रणा बसविली. जीवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करून दोन रोपांत सव्वा फुटाचे अंतर ठेवून टोकण पद्धतीने प्रत्येक जागी दोन बियांची लागवड केली. उगवणीनंतर वीस दिवसांनी विरळणी करत कमकुवत, वेडीवाकडी रोपे काढून टाकली. टप्प्याटप्प्याने चार वेळा शेंडेखुडणीचा प्रयोग केला. त्यातून फुटव्यांची संख्या व शेंगांचीही वाढ झाली. कांदा, ऊस या पिकांसाठी आठ वर्षांपासून ठिबक सिंचनाचा वापर होतो. मात्र तुरीत हा वापर अलीकडेच सुरू केला आहे.
उत्पादन व विक्री
दोन्ही वर्षांची सरासरी पाहता तुरीचे एकरी १८ ते २० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. दोन्ही वर्षी कर्जतसह शेजारील तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या तूर प्रयोगाला भेट दिली. झाडाला भरभरून आलेल्या शेंगा व दाण्याची गुणवत्ता पाहून शेतकरी बियाण्यांची मागणी केली. त्यानुसार पहिल्या वर्षी पाच क्विंटल बियाण्याची विक्री केली केली.
तुरीला बाजार समितीत क्विंटलला नऊ हजार ते १० हजार रुपये दर मिळाला. आंतरपीक उडदापासून एकरी सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाला. त्यास प्रति क्विटंल आठहजार रुपये दर मिळाला. त्यातून तुरीतील उत्पादन खर्च कमी झाला आहे. पोटरे यांना दहा वर्षांपासून कांदा शेतीचाही चांगला अनुभव आहे. मागील वर्षी उसाचे एकरी नव्वद टन उत्पादन त्यांनी घेतले आहे.
संजय पोटरे ९२८४५६९९२२, ९५०३५२४७८१
विद्यापीठातील प्रयोग व शिफारशी
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे म्हणाले, की सहा बाय एक फूट अंतरावर तूर लागवडीची आमची शिफारस आहे. आमच्या पाहणी अभ्यासामध्ये करमाळा- कुंभारगाव येथील एका शेतकऱ्याने आठ बाय सव्वा फूट अंतरावर तुरीची लागवड केली होती. एकूण व्यवस्थापनातून त्यांना एकरी १८ क्विंटल उत्पादन मिळाले. पाथर्डी तालुक्यातील एका शेतकऱ्याकडे आठ बाय दोन फूट अंतरावर लागवड होती. त्यांना एकूण व्यवस्थापनातून एकरी १६ क्विंटल उत्पादन मिळाले आहे.
लागवड अंतराविषयी
१२ बाय सव्वा फूट या अंतराचा अभ्यास करावा लागेल. कारण यात झाडांची एकरी संख्या कमी होते. त्यामुळे उत्पादन किती मिळते हे पाहणे गरजेचे आहे. जे शेतकरी दोन ओळीत ८ ते १० फूट अंतर ठेवतात त्यांनी एकरी १५ ते १८ क्विंटलपर्यंत उत्पादनापर्यंत मजल मारली आहे. अर्थात, अनुकूल वातावरण, पाऊस वेळेवर येणे, ठिबक व व्यवस्थापन या सर्व बाजूही त्यासाठी कारणीभूत असतात. त्यातून एकरी २० क्विंटलपर्यंत उत्पादनापर्यंत पोहोचता येते. दोन ओळींत जास्तीत जास्त आठ ते नऊ फूट अंतरापर्यंत जावे.
सोयाबीनने दिले जास्त उत्पादन
डॉ. कुटे म्हणाले, की विद्यापीठाने सहा बाय एक फूट अंतरावर केलेली तूर लागवडीची शिफारस आंतरपीक पद्धतीसाठी अनुकूल आहे. आम्ही केलेल्या तुरीतील आंतरप्रयोगांमध्ये सोयाबीन हे आर्थिकदृष्ट्या सर्वांत किफायतशीर, त्यानंतर उडीद व त्यानंतर मूग हे पीक किफायतशीर ठरले आहे. कोरडवाहू पद्धतीत सलग तूर घ्यायची असेल तर भारी जमिनीत चार बाय एक तर मध्यम जमिनीत तीन बाय एक फूट असे लागवडीचे अंतर ठेवावे.
शेंडा खुडणी
पेरणीनंतर ४५ दिवसांनी एकदाच वरून पाच सेंटिमीटर शंडा खुडणी केली, तर उत्पादनात १३ ते १५ टक्के वाढ होते असे आमच्या प्रयोगात आढळले आहे. दोनदा खुडणी झाली तर सांख्यिकी उत्पादनात वाढ होत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे खर्च वाढवू नये. शेंडे एकदाच खुडावेत. तेही बागायतीमध्येच. कोरडवाहूत शेंडा खुडण्याची शिफारस नाही. शेंडे तीन ते चार वेळा न खुडू नये. त्याचे कारण ४५ दिवसांत तूर एक ते सव्वा फूट होते. ६० ते ६५ दिवसांनी ती इतकी जलद वाढते की काही वेळा कुठले शेंडे खुडले ते समजणे कठीण होऊ शकते. तुरीची लागवड १५ जुलैपर्यंत करावी. त्याहून उशीर झाल्यास ती ३० जुलैपर्यंत घेता येईल. उडदाची पेरणी मात्र सात जुलैपर्यंतच करता येते. तुरीच्या लागवडीस जसजसा उशीर होत जाईल तसतशी त्याच्या उत्पादनात घट होत जाते असे डॉ. कुटे यांनी सांगितले.
डॉ. नंदकुमार कुटे ७५८८५१३३९८,
प्रमुख, कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.