Tur Production : खरीप हंगाम जवळ आला आहे. शेतकरी खरीप पीक पेरणी नियोजन करीत आहेत. यंदा पाऊस चांगला आहे, ही शेती क्षेत्रासाठी ऊर्जा देणारी बाब आहे. आपल्या राज्याचा विचार करता खरिपात सर्वाधिक क्षेत्रावर लागवड होत असलेली पिके म्हणजे सोयाबीन आणि कापूस ही आहेत. या पिकांचे क्षेत्र एकूण खरिपाच्या पन्नास टक्क्यांच्याही पुढे आहे. या दोन पिकांनंतर शेतकरी तूर आणि मका या पिकांस प्राधान्य देत आले आहेत.
खरिपाच्या दृष्टीने कानोसा घेतला असता एक बाब समोर येत आहे ती म्हणजे शेतकरी तूर पिकाचा विचार खरिपात लागवडीसाठी करीत आहेत. याचे महत्त्वाचे एक कारण म्हणजे या पिकास सध्या मिळत असलेला चांगला बाजारभाव! शिवाय या पिकाची उत्पादन क्षमता, जमिनीच्या आरोग्य सुधारणेबाबत उपयुक्तता, व्यवस्थापनाची सहज पद्धत आणि इतर प्रमुख खरीप पिकांच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी या चार गोष्टी तूर या पिकाबाबत जमेच्या मानल्या जातात.
आज या पिकाकडे शेतकरी पैशाचे पीक म्हणून देखील पाहत आहेत. उत्तम व्यवस्थापन केले तर चांगले उत्पादन मिळून बऱ्यापैकी पैसा देणारे हे पीक आहे, असे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे या खरिपात तुरीचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज आहे.
तूर पीक लागवडीचे नियोजन केल्यानंतर शेतकऱ्यांसमोर पहिला प्रश्न उभा राहतो तो वाणांची निवड कशी करावी? यासाठी प्रथम आपण आपल्या शेतीचा प्रकार विचारात घ्यावा. कोरडवाहू की बागायती, माझ्याकडचे शेती क्षेत्र नेमके कोणते आहे, हेही पाहावे. जर जमीन मध्यम अथवा भारी आणि कोरडवाहू असेल पाणी व्यवस्थापन करणे शक्य नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी १५० दिवसांत तयार होणाऱ्या, अर्थात कमी कालावधीच्या वाणांचा विचार करावा.
यात कृषी संशोधन केंद्र बदनापूर निर्मित बीडीएन ७११ हा मराठवाड्यात नव्हे तर राज्यभरातील कोरडवाहू शेतीसाठी उपयुक्त ठरणारा आहे. हा वाण १५० ते १६० दिवसांत तयार होतो. या वाणाचे विशेष महत्त्व म्हणजे हा वाण पाण्याचा ताण सहन करणारा आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतीसाठी या वाणाची निवड नक्कीच सार्थ ठरेल.
ज्या शेतकरी बांधवाकडे हमखास सिंचन व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांनी बीडीएन २०१३-४१ म्हणजेच गोदावरी या वाणाची निवड करावी. हा वाण बीडीएन ७११ पेक्षा उशिरा काढणीस येतो. या वाणाचा कालावधी जवळपास १७० दिवसांचा आहे. त्यामुळे या वाणाच्या भरघोस उत्पादनासाठी सिंचन व्यवस्था आणि उत्तम जमीन हे दोन भाग महत्त्वाचे आहेत.
ही दोन्हीही वाणांचे तूर दाणे पांढऱ्या रंगाचे आहेत. या शिवाय विदर्भ विभागासाठी याच केंद्राने विकसित केलेला दाण्याचा रंग लाल असलेला बीडीएन ७१६ हा वाणाचीही मोठ्या प्रमाणात लागवड होते. या भागात दाण्याचा रंग लाल असलेल्या वाणास शेतकरी पसंती देतात, असा अनुभव आहे. याशिवाय राहुरी आणि अकोला कृषी विद्यापीठाचे तूर वाणही उत्तम आहेत.
डॉ. सूर्यकांत पवार, रामेश्वर ठोंबरे
विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, छत्रपती संभाजी नगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.