Rupesh Gaikwad and Amar Gaikwad Agrowon
यशोगाथा

Pomegranate Farming : नैसर्गिक आपत्तीशी लढा देत डाळिंब शेतीतील यशाला गवसणी

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Success Story of Pomegranate Farming : सांगली जिल्ह्यात शेटफळे (ता. आटपाडी) हे अवर्षण प्रवण गाव आहे. कविश्रेष्ठ ग. दि. माडगूळकर यांची ही कर्म भूमी. त्यांच्या बनगरवाडी या प्रसिद्ध कादंबरीत हा सारा परिसर अनुभवता येतो.

इथला दुष्काळ जगण्याची कसोटी पाहतो. कष्टकऱ्यांचे सत्त्व तपासतो. त्यातून इथल्या शेतकऱ्यांनी फोंड्या माळावर लालचुटूक डाळिंब पिकवण्याची किमया घडवली आहे. इथले डाळिंब सातासमुद्रापार पोहोचले आहे.

संघर्षातून शेती

शेटफळे गावातीलच रूपेश गायकवाड हे युवा शेतकरी आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीत संघर्षातून आजोबा कै. राजाराम गायकवाड यांनी घरदार मोठे केले. रूपेश यांचे वडील कै. बाळू सन १९९४ मध्ये लष्करी सेवेतून निवृत्त झाले. घरची शेती थोडीच असल्याने नोकरीतील पुंजीतून त्यांनी साडेतीन एकर शेती खरेदी केली.

डाळिंब शेती करण्याचे हेतूने शाश्‍वत पाणी हवे यासाठी गावापासूनच जवळ लेंगरेवाडी येथे विहिरीसाठी जागा घेतली. सहा किलोमीटरवरून पाइपलाइन केली. १९९५ मध्ये गणेश डाळिंबाची लागवड केली. सन १९९७ मध्ये निर्यातक्षम माल घेतला. सन २००३ मध्ये डाळिंबातील पैशांमधून अजून साडेतीन एकर शेती घेतली.

संघर्ष सुरूच राहिला

डाळिंब बाग फुलत होत्या, पण पाण्यासाठी झगडावे लागत होते. जिद्द, धाडस व हिंमत एकवटून विहीर खोदणे व डाळिंबाचे क्षेत्र वाढवणे हे प्रयत्न सुरूच होते. सन २००२-०३ मधील दुष्काळात पहिली डाळिंब बाग काढावी लागली. पण हार कधीच मानली नाही. पुन्हा नव्या उमेदीने रोजगार हमी योजनेतून नव्याने डाळिंब लागवड केली.

तेलकट डाग रोगाने नवे संकट उभे केले. निसर्ग साथ देत नव्हता. पाण्याची भक्कम व्यवस्था करण्यासाठी पुन्हा विहीर खोदली. रोजगार हमी योजनेतून शेततळे घेतले. हळूहळू कष्टाची फळे दिसू लागली. रूपेश यांच्या वडिलांनी त्या जोरावर अजून शेती खरेदी केली.

वडिलांकडून घेतले शेतीचे धडे

सातवीत असल्यापासून रूपेश यांनी वडिलांकडून डाळिंब शेतीचे धडे घेण्यास सुरुवात केली. पुढे बीएचे शिक्षण पूर्ण केले. पुढे डाळिंब शेतीच करायची असे ठरवले. सन २०१३ मध्ये मोठा दुष्काळ पडला.

मग बारा हजार लिटर क्षमतेचा टॅंकर घेत त्या पाण्यावर बाग जगवली. दरम्यान, वडिलांचे २०१४ मध्ये निधन झाले. आई- वडिलांनी आजवर उपसलेल्या कष्टांचे चीज करायचे असे रूपेश यांनी ठरवले. त्यानुसार मिळेल तेथून ते ज्ञान घेत गेले. पुढे अजून काही एकर शेती घेणे शक्य झाले.

पाण्याची शाश्‍वत सुविधा

दुष्काळावर ठोस उपाय शोधण्यासाठी रूपेश यांनी स्वखर्चाने साखळी पद्धतीची शेततळी उभारली. पहिले भरले की त्याचे पाणी दुसऱ्यात, मग तिसऱ्यात अशी योजना केली. आजमितीला एकूण पाच शेततळी आहेत. सन २०१५-१६ मध्ये

परिसरात टेंभू योजनेचे पाणी आले. शेततळी भरली की सायफन पद्धतीने पाणी विहिरीत येते. तेथून मोटरद्वारे उचलून ते संपूर्ण बागेत फिरवले

जाते. त्या जोरावर आजच्या २६ एकर शेतीला व त्यातील १९ एकर भगवा वाणाच्या डाळिंबाला त्याचा वापर होतो.

विकसित केलेली डाळिंब शेती

अलीकडील वर्षांत आवक, हवामान, पाऊस आदी सर्व बाबी व दरांचा त्यावर होणारा परिणाम हा अभ्यास रूपेश यांनी केला. त्यानंतर २०२० पासून विभागून म्हणजे मृग (सात एकर), हस्त (सहा एकर) आणि आंबिया (सहा एकर) असे तीनही बहर ते घेत आहेत. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळणे त्यांना शक्य झाले आहे.

सन २०२१ मध्ये ९६ किलो मालाला आटपाडी बाजारात विक्रमी दर मिळाल्याचे व त्याच वर्षी अकराशे ग्रॅम वजनाचे फळही मिळाल्याचे रूपेश यांनी सांगितले. आजवरच्या कार्याची दखल घेत सन २०२०-२१ चा उद्यानपंडित पुरस्कार रूपेश यांना यंदा जाहीर झाला. त्यामुळे पुढील वाटचालीसाठी मोठी ऊर्जा त्यांना लाभली आहे.

डाळिंब शेतीतील ठळक बाबी

दरवर्षी माती, पाणी परीक्षण.

१२ बाय ८ फूट, सहा फूट व १२ फूट अशा तीन पद्धतीचे लागवड अंतर.

बागेत मधपेट्यांचा वापर. त्यामुळे परागीभवन होऊन फळधारणा चांगली होण्यास मदत होते. उत्पादन वाढते.

प्रति झाड २५ किलो शेणखताचा वापर.

प्रति झाड ठिबक सिंचनात आठ लिटरचे दोन ड्रीपर अशी सोय. प्रति तास सरासरी १६ लिटर पाणी नियोजन. अर्थात, हवामानानुसार त्यात बदल.

एकरी उत्पादन- ८ ते ९ टन

मिळणारा दर- ९०, १०० ते १२० रुपये प्रति किलो. बांधावरून व्यापारी खरेदी करतात.

शेतीची अन्य वैशिष्ट्ये

शाश्‍वत पाण्यासाठी सात विहिरी, पाच शेततळी

शेतीला आधार म्हणून अलीकडेच एचएफ गायींचे पालन व दुग्ध व्यवसाय. सध्या १६ जनावरे.

शेततळ्यांमध्ये तीन प्रकारच्या माशांचे पालन. त्यातून अतिरिक्त उत्पन्न.

शासन मान्यताप्राप्त रोपवाटिका. डाळिंब. आंबा. चिकू, नारळ आदींची रोपनिर्मिती.

रूपेश यांना आई श्रीमती विमल, पत्नी मनीषा, बंधू अमर व पत्नी सीमा अशी कुटुंबातील सर्वांची मोठी साथ लाभते.

रूपेश गायकवाड, ९९६०३३२०६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT