Homemade Pickle Production  Agrowon
यशोगाथा

Homemade Pickle Brand : ‘जयंतिका’च्या घरगुती उत्पादनांनी जिंकली ग्राहकांची मने

Food Processing : जयंतिका ब्रॅण्डच्या या अस्सल घरगुती स्वादाच्या उत्पादनांनी ग्राहकांची मने जिंकली. प्रदर्शने, ऑनलाइन, थेट ग्राहक आदी स्वरूपात बाजारपेठ काबीज करीत सुगरण गृहिणी ते उद्योजिका प्रवास करणाऱ्या अवंतिका यांनी वार्षिक तीस लाख उलाढालीचा पल्ला गाठला आहे.

मंदार मुंडले 

Women Entrepreneurship : नांदेड जिल्ह्यातील आदिवासी, दुर्गम भाग असलेले किनवट हे अवंतिका सुकळकर यांचे माहेर. बीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या अवंतिका यांचा विवाह २००० मध्ये विजय सुकळकर यांच्याशी झाला.

महिनाभरातच पतीला हैदराबाद येथील नामवंत उद्योगसमूहाच्या टीव्ही- मीडिया क्षेत्रात कृषिविषयक कार्यक्रमासंबंधीची नोकरी मिळाली. अवंतिकाही पतीसोबत तेथे वास्तव्यास गेल्या. साउथ इंडियन लोक लोणची, चटण्यांचे शौकीन. इथं लोणच्यांचे असंख्य प्रकार, कोणत्याही भाज्यांची लोणची पाहण्यास मिळतात.

नवा पदार्थ घरी केला की शेजारी नेऊन द्यायचा ही इथल्या लोकांची खासियत. अवंतिका यांचा स्वभावही बोलका, मनमिळाऊ. त्यामुळे शेजाऱ्यांसोबत स्नेह जोडणे त्यांना अवघड गेले नाही. मग साउथ इंडियन स्टाइलचे घरगुती पदार्थ त्यांच्या घरी येऊ लागले. लहानपणापासून अवंतिका यांना पाककलेची आवड व कौशल्य होते.

विविध प्रयोगांद्वारे खाद्यपदार्थ तयार करून ते खाऊ घालण्याचा त्यांना मनस्वी छंद होता. त्यास हैदराबादमध्ये खतपाणीच मिळाले. अंबाडीचे, टोमॅटोचे लोणचे असते हे त्यांना इथेच कळले. इथल्या गृहिणींकडून हे पदार्थ शिकून अस्सल महाराष्ट्रीयन स्टाइलने ते बनविण्याचे कौशल्यही सुगरणबाई अवंतिकांनी अल्पावधीत आत्मसात केले. भविष्यकाळातील प्रक्रिया उद्योगाची इथेच पायाभरणी झाली होती.

पदार्थांनी जिंकली ग्राहकांची मने

सन २०१२ च्या दरम्यान पती विजय पुण्यात ‘ॲग्रोवन’मध्ये सहसंपादकपदी रुजू झाले. मग सुकळकर दांपत्याच्या संसाराची गाडी इथे धावू लागली. नवे पदार्थ तयार केले, की शेजाऱ्यांना स्वाद द्यायचा ही हैदराबादमधील सवय अवंतिका पुण्यातही सोबत घेऊन आल्या होत्या. त्यातूनच त्यांची कढीपत्त्याची चटणी आणि अन्य पदार्थांनी शेजारणींची मने जिंकली.

तोरल शहा या मैत्रिणीने दरवेळी तुमचे पदार्थ देत जा, त्याचे पैसे देत जाऊ अशी ऑफरच दिली. एका शेजारणीने तुम्ही कैरीचे लोणचे घातले आहे का? त्याचा सुगंध सुटला आहे अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिलीच. शिवाय बाजारातील लोणच्यांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह, अन्य घटक असतात.

त्यामुळे आम्हाला घरगुती लोणचीच आवडतात. चिनी मातीच्या बरणीत लोणचे भरून द्या अशी गळही घातली. दांपत्याच्या वसुंधरा आणि कृष्णाई या दोन्ही मुली शाळेच्या डब्यात इडली सांबार, लोणची आणि विविध पदार्थ घेऊन जायच्या.

मग मैत्रिणी, त्यांच्या आया, शिक्षिकांपर्यंत पदार्थांच्या चवीची ख्याती पसरली. निवासी सोसायटीतूनही मागणी येऊ लागली. आम्हाला कैरीचे सुके लोणचे द्याल का? तुमचे इडलीचे सांबार एवढे चवदार कसे? तुमचा मसाला द्याल का, अशा विचारणा सुरू झाल्या.

छंदाचे रूपांतर उद्योगात

सन २०२१ मध्ये अक्षय तृतीया सणावेळी मुलगी वसुंधराने आईच्या हातच्या कैरी लोणचे निर्मितीचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला. त्याला इतका प्रतिसाद मिळाला, की ४५ किलो लोणच्याची अवघ्या तीन दिवसांत विक्री झाली. हळूहळू पुणे शहरातून नव्या ग्राहकांची भर पडू लागली. त्यांना घरपोच माल पुरवण्याच्या दृष्टीने कुरिअर एजन्सीसोबत टाय- अप केले.

पुण्यातील महिला बचत गटाच्या प्रदर्शनात मसाले सादर करण्याची नामी संधी चालून आली. वसुंधरा आईच्या पदार्थांचे मार्केटिंग करण्याची मुख्य जबाबदारी निभावत होती. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या छायाचित्रांधारे पुण्यातील प्रसिद्ध निवासी सोसायटीतून लोणच्याची मोठी ऑर्डर मिळाली. मिलेट्‌स उद्योगात नाव कमावलेले उद्योजक तात्यासाहेब फडतरे यांनी पुण्यातील आपल्या आउटलेटमध्ये पदार्थ ठेवण्यासाठी संधी दिली.

आता सुगरण गृहिणीच्या भूमिकेतील अवंतिकांचा प्रवास उद्योजिका होण्याकडे सुरू झाला. नेमका त्याच वेळी कोरोनारूपी लॉकडाउन सुरू व्हायला गाठ पडली. काही काळासाठी मग सुकळकर दांपत्य विजय यांच्या गावी रुई (ता. माहूर, जि. नांदेड) येथे गेले. दुकाने, बाजारपेठा बंद असल्या तरी अवंतिकांनी २०१५ पासून जोडलेल्या ग्राहकांनी ऑर्डर देणे सुरूच ठेवले होते.

...आणि उभी राहिली कंपनी

आता आपली स्वतःची कंपनी स्थापन करण्याच्या मानसिकतेपर्यंत अवंतिका आल्या. कोणकोणते पदार्थ तयार करायचे यावर विचारमंथन आणि यादी करण्याची गरजच त्यांना भासली नाही. कारण ग्राहकच त्यांना आम्हाला हे बनवून द्या, ते बनवून द्या अशी फर्माईश करायचे. त्यामुळे ग्राहकांना हवे ते आणि हव्या तशा स्वरूपातील पदार्थ आपोआपच तयार होत गेले. पूर्वी कधीही न बनविलेल्या पदार्थांच्या निर्मितीतही त्यामुळे अवंतिका पारंगत झाल्या. आज त्यांच्याकडे बनणाऱ्या पदार्थांची संख्या साठच्या आसपास पोहोचली आहे.

पतीची खंबीर साथ

आठ मार्च (२०२२) या जागतिक महिला दिनानिमित्त पती विजय यांनी अन्नप्रक्रियेत आमचेही अल्प योगदान, छंदातून साकारतोय घरगुती उद्योग अशी पोस्ट फेसबुकवर शेअर केली. घरकाम, संसार, स्वयंपाक, मुलींना वाढवणे अशा असंख्य जबाबदाऱ्या सांभाळत प्रक्रिया उद्योगात एकेक पाऊल पुढे टाकण्याचे धाडस करणाऱ्या सहचारिणीची पाठच त्यांनी थोपटली.

त्यातून अवंतिकांची उमेद, बळ आणि जबाबदारीही वाढली. उद्योगासाठी आवश्‍यक ‘एफएसएसएआय’ (फूड सेफ्टी), उद्यम आधार (केंद्र सरकार) आदी परवाने, प्रमाणपत्रे मिळविण्याचे दिव्य सोपस्कारही विजय यांनी पार पाडले. ऑफिस सांभाळून ग्राहकांच्या ऑर्डर्स घरपोच देणे, प्रदर्शनांमध्ये स्टॉलवर विक्री करणे यातून पत्नीचे श्रम हलके केले.

दोघांच्या प्रयत्नांतूनच श्रीकृष्ण शेतीमाल प्रक्रिया- विक्री उद्योग ही कंपनी आकारास आली. विजय- अवंतिका या नावांच्या संयोगातून जयंतिका हे उत्पादनांचे ब्रॅण्डनेम निश्‍चित केले. यातील इंग्रजी ‘जे’ अक्षर आणि मिरची यांच्या आकाराचे साधर्म्य वापरून वसुंधराने लोगो तयार केला.

प्रदर्शनांनी खूप शिकवले

सन २०२१- २२ पासून प्रदर्शनांचा अनुभव अवंतिका घेऊ लागल्या. त्यातून उत्पादनांचे पॅकिंग, लेबलवरील माहितींचे सादरीकरण, ग्राहकांसोबतचे संवाद कौशल्य, त्यांना कोणते पदार्थ आवडतात, आपल्या व अन्य उत्पादनांमधील उणिवा आदी गोष्टी लक्षात येऊ लागल्या. खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पुणे शहरात भरणारे गावरान महोत्सव, मॉल्समध्ये उत्पादने सादर करण्याची संधी मिळाली.

त्यातूनच भीमथडी या प्रसिद्ध प्रदर्शनाची दिशा मिळाली. पहिल्या सहभागात स्टॉलचा अर्धाच हिस्सा मिळाला. परंतु प्रतिसाद इतका उदंड लाभला की तीनच दिवसांत दीड लाखांच्या विक्रीचा टप्पा पार झाला. पुणेकरांच्या पसंतीस उतरल्याचे समाधान अवंतिका यांना झाले. उर्वरित दोन दिवशी विक्रीला मालच शिल्लक नव्हता.

कैरीचे सुके लोणचे (मराठवाड्यातील माठातले लोणचे) हातोहात खपले. माणदेशी फाउंडेशन ही संस्थाही पुणे, मुंबईत प्रदर्शने भरवते. सन २०२१ पासून त्यासोबत अवंतिका जोडल्या आहेत. मीडिया दे आसरा फाउंडेशन, ‘ओएनडीसी’, छायाकार्ट, आयएफई स्टोअर ॲप आदींच्या माध्यमातून जयंतिकाची उत्पादने सर्वत्र पोहोचण्यास मदत झाली.

उद्योगाचे स्वरूप

कोणतीही मोठी यंत्रे, स्वयंचलित यंत्रणा नाही. तरीही आवश्‍यक सामग्री, सीलिंग मशिन यांच्या आधारे चार खोल्यांच्या फ्लॅटमध्ये आरोग्य स्वच्छतेच्या (हायजेनिक) सर्व दक्षता पाळून उत्पादने तयार केली जातात. तीन कायमस्वरूपी महिला मदतीला असून त्यांना वर्षभर रोजगार मिळाला आहे. व्याप वाढत चालल्याने मोठ्या प्रमाणात कच्चा माल बाजारातून सातत्याने आणणे, प्रक्रिया, पॅकिंग, मार्केटिंग, विक्री, आर्थिक व्यवहार या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत. अवंतिका सांगतात, की खाद्यपदार्थ निर्मिती हे माझे पॅशन असल्याने कितीही काम असूद्या, त्याचे कधीच ओझे वाटत नाही.

उल्लेखनीय उलाढाल

दशकभराच्या या प्रवासात उद्योगाची वार्षिक उलाढाल ३० लाखांपर्यंत पोहोचली आहे. आता प्रशस्त जागेत प्रक्रिया युनिट उभारणीचे प्रयत्न आहेत. प्रत्येक शहर, गावोगावी आणि भारताबाहेरही उत्पादने पोहोचविण्यासाठी दांपत्य प्रयत्नशील आहे. तुझे लाडू खूप चविष्ट, खमंग असतात. माझा मुलगा अमेरिकेत असतो, त्याला पाठवायचे आहेत अशा पद्धतीने ग्राहकांच्या रूपाने कॅनडा, अमेरिका, लंडनपर्यंत उत्पादने पोहोचल्याचा अवंतिकांना अभिमान आहे. मूल्यवर्धनातून शेतमालाचे काढणी पश्‍चात नुकसान थांबविण्यात आपला हातभार लागल्याचे समाधान दांपत्याला आहे.

...अशी होते उद्योगाची वृद्धी

महिलांमध्ये कौशल्यगुण असतात. परंतु भांडवल, घरगुती अडचणींमुळे अनेक वेळा या गुणांना वाव न मिळाल्याने महिला उपेक्षित राहतात. मात्र घरची उद्योगाची पार्श्‍वभूमी नसली तरी आपल्या गुणांचा पुरेपूर वापर करून कमी गुंतवणुकीतही घरातूनच उद्योग सुरू करता येतो. स्वावलंबी होण्यासह उद्योजक अशी स्वतंत्र ओळख निर्माण करून कुटुंबाचे वैभव वाढवता येते हेच अवंतिका यांनी दाखवून दिले आहे.

उद्योगातून येणाऱ्या पैशांची त्यांनी त्यातच गुंतवणूक केली. चढ-उतार पाहिले. त्या सांगतात की संकटे येणारच. पण ती खूप काही शिकवतात. ग्राहकांचा आपल्यावरील विश्‍वास कोणत्याही परिस्थितीत तुटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ग्राहकाने कितीही नकारात्मक प्रतिक्रिया दिली तरी ती पचवण्याची ताकद हवी. नम्रता हवी. त्यातूनच उद्योगाची वृद्धी होत असते.

‘जयंतिका’ उत्पादनांची श्रेणी, वैशिष्ट्ये

उत्पादनांच्या गुणवत्तेला, नावीन्यतेला सर्वोच्च प्राधान्य. आपली आई, आजी ज्या घरगुती पद्धतीने पदार्थ तयार करतात तीच चव ग्राहकांना दिली. त्यामुळेच बाजारपेठेत असंख्य उत्पादनांच्या गर्दीतही जयंतिका ब्रॅण्डला ग्राहकांची पसंती राहिली. दहा वर्षांपासून ग्राहक टिकवण्यात अवंतिका यशस्वी झाल्या.

लोणची, मसाले, चटण्या, पिठे, लाडू आदी मिळून साठच्या आसपास पदार्थांची संख्या. निवडक पदार्थ पुढीलप्रमाणे.

लोणच्यांचे सुमारे २२ प्रकार. उदा. अंबाडी, टोमॅटो, शेवगा, कवठ, लसूण, ओली हळद, माईनमुळा, कैरीचे कमी तेलाचे सुके, पूर्णपणे सेंद्रिय गुळातील गोड्या लिंबाचे लोणचे.

कढीपत्त्याची चटणी

श्रावणातले पदार्थ, नवरात्रीत उपवासाची पिठे,

नाचणी सत्त्व, डिंक, तीळ, शेंगदाणा लाडू,

आवळा कॅण्डी, उन्हाळ्यात मसालेवर्गीय, हाताने बनवलेले वाळवणीचे पदार्थ.

(उदा. मराठवाड्यातील प्रसिद्ध मूगडाळीचे, मटकीचे सांडगे)

गव्हाचा चीक व कुरड्या.

जवस, बडीशेप, ओवा, मगजबीज, तीळ यांच्यापासून पौष्टिक मुखवास.

पदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह, कृत्रीम घटक, रंग यांचा समावेश नाही.

बहुतांश उत्पादनांतील पोषणद्रव्यांसंबंधी प्रयोगशाळेत तपासण्या.

सर्व पदार्थांसाठीचा मसाला घरीच बनवला जातो.

पुणे, मुंबईसह सुमारे दहा हजार ग्राहकांचा ‘डाटाबेस’.

प्रदर्शने, उत्पादन व ठिकाणनिहाय ग्राहकांचे वर्गीकरण.

ग्राहकांच्या फीडबॅकनुसार पदार्थांमध्ये होतात सुधारणा.

उत्पादनांचे आरोग्यदायी महत्त्व, वैशिष्ट्ये सांगणारी माहितीपत्रके तयार केली.

रेसिपींचे व्हिडिओ तयार करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचवले.

‘मम्मी, तू मोठी उद्योजक हो...’

भीमथडीच्या प्रदर्शनात दुसऱ्यांदा (२०२३) सहभागी होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. याच काळात वसुंधराला (मोठी मुलगी) एका व्याधीने ग्रासले. पुण्यापासून हैदराबादपर्यंत मोठ्या हॉस्पिटलपर्यंत उपचारांची मोठी शिकस्त सुकळकर दांपत्याने केली.

पण २४ ऑक्टोबर २०२३ मध्ये वसुंधराने वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सुकळकर दांपत्य अक्षरशः कोसळून पडले. न पचविता येणारा धक्का, कधीही भरून न येणारे दुःख त्यांच्या वाट्याला आले. अवंतिका सांगतात, की ‘मम्मी, तू खूप मोठी उद्योजक हो’ हीच इच्छा वसू वारंवार बोलून दाखवायची.

याच इच्छेने माझ्या मनाने पुन्हा उभारी घेतली. शरीराने माझ्यासोबत नसेल पण मनाने ती मला कधीच अंतर देणार नाही हा विश्‍वास उरी बाळगूनच पुन्हा उभारी घेतली. डिसेंबर २०२३ मध्ये भीमथडीसह अन्य महोत्सवांत उभी राहिले. भीमथडीत पहिल्याच दिवशी माईनमुळ्याचे लोणचे संपले.

शेवग्याचे लोणचे, अन्य पदार्थांसाठी ग्राहक रांगेत उभे राहिल्याचा अनुभव शब्दांपलीकडचा असल्याचे अवंतिका म्हणतात. आमदार रोहित पवार यांनीही शेवग्याचे लोणचे आवर्जून विकत घेतले. धाकटी मुलगी कृष्णाई आज तिरुपतीत (आयसर) शिक्षण घेत आहे. मोठ्या बहिणीप्रमाणे तिनेही पदार्थानिर्मितीत आईला मोठी साथ दिली आहे.

अवंतिका सुकळकर ९५६१६५३०११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin : लातूर जिल्ह्यात बारा गावांत ‘लम्पी’चा प्रादुर्भाव

Warna Dam : वारणा धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला

Radhanagari Dam : कोल्हापुरात जोरदार पाऊस,'राधानगरी'चे चार दरवाजे उघडले

Tur Crop : खानदेशात तूर पीक जोमात

E-Peek Pahani : शेतकऱ्यांचा ई-पीक पाहणीला कमी प्रतिसाद

SCROLL FOR NEXT