Success Story : सांगली जिल्ह्यातील तासगाव हा द्राक्ष शेतीतील आघाडीचा तालुका आहे. या शहरालाही ऐतिहासिक वारसा लाभले आहे. येथील सुप्रिया ऋतुराज शिवणकर यांनी आज अन्न प्रक्रिया उद्योगात आपली ओळख तयार केली आहे. त्याचे सासरे राजेंद्र शिवणकर तासगाव नगरपालिकेतून निवृत्त झाले आहेत.
घरची तीन एकर शेती आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील पेठ हे सुप्रिया यांचे माहेरघर. ऋतुराज (राजेंद्र यांचे चिरंजीव) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. नोकरीच्या कारणावरून ऋतुराज यांना पुणे येथे स्थलांतरित व्हावे लागले. साहजिकच सुप्रियादेखील पतीसोबत या शहरात वास्तव्यास आल्या. येथे आपणही नोकरी करावी अशी त्यांची प्रबळ इच्छा होती. त्यासाठी प्रयत्नही केले. पण अपेक्षेप्रमाणे नोकरी हाती लागली नाही.
दिशा पक्की केली
पुण्यातील वास्तव्यात सुप्रिया यांनी येथील खाद्य संस्कृतीचा अभ्यास केला. चविष्ट, घरगुती पद्धतीच्या शेंगदाणा, जवस, कारळा आदी चटण्या व डिंक लाडूंना इथे चांगली मागणी असल्याचे लक्षात आले.सुप्रिया यांच्या सासरच्या घरी पीठ चक्कीचा व्यवसाय होता. सासू सीमा घरगुती पदार्थ उत्तम तयार करायच्या. पै-पाहुण्यांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळायचा. अशाच पदार्थांचाव्यवसाय सुरू करून पुण्यात विक्री केली सुरू केली तर? मनातली ही इच्छा सुप्रिया यांनी घरच्या सदस्यांना बोलून दाखवली. सर्वांचेच त्यावर एकमत झाले.
तयार झाला ब्रॅण्ड
ग्राहकांची गरज लक्षात घेऊन तसे पदार्थ तयार करण्याला प्राधान्य दिले. ‘रेसिपी’ घरचीच असावी परंतु त्यास प्रशिक्षणाची जोड सुप्रिया यांना आवश्यक वाटले. त्या दृष्टीने विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणात तयार केलेला पदार्थांची टिकवण क्षमता यासह विविध गोष्टींचा अभ्यास झाला. व्यवसायाला सुरू करण्यापूर्वी सुप्रिया यांनी डिंक लाडू, जवस, कारळा, शेंगदाणा चटणी, मेतकूट आदींची ‘रेसिपी’चे विविध ठिकाणी प्रशिक्षण घेतले. पदार्थांच्या टिकवण क्षमतेचाही अभ्यास केला.‘सोशल मीडिया’वरील विविध रेसिपी पाहण्याची आवडही पहिल्यापासूनच होती.
या सर्वांच्या आधारे २०१९ मध्ये व्यवसाय सुरू झाला. सुप्रिया यांचे पती ऋषिकेश पुण्यात खासगी कंपनीत विपणनाचे काम करायचे. त्यातूनच त्यांनी आपल्या उत्पादनांच्या विपणनाची जबाबदारी घेतली. बेकरी, छोटी-मोठी रेस्टॉरंट्स, महामार्गावरील दुकाने आदी ठिकाणी आपल्या उत्पादने विक्रीचे नियोजन केले. तुमचे पदार्थ ठेवू मात्र विक्री न झाल्यास परत घेऊन जावे लागेल अशी घट काहींनी घातली. काहींनी चव, टिकवण क्षमता, ब्रॅण्ड आदींमध्ये सुधारणाही सांगितल्या. त्या नुसार ‘सीरा फूडस्टफ्स’नावाने व्यवसायाची नोंदणी व ब्रॅण्ड तयार केला. पॅकिंगही आकर्षक केले.
व्यवसायाचा विस्तार
हळूहळू लाडू, विविध चटण्यांसह अन्य पदार्थांची मागणी होऊ लागली. मग उन्हाळी पदार्थांसह दिवाळीतील फराळ यासह २० हून अधिक पदार्थ तयार होऊ लागले. उत्पादनांच्या जाहिरातींचा ‘सोशल मीडिया’द्वारे प्रसार केला. त्यातून अनेक ग्राहक जोडले गेले. पतीच्या मदतीने सुप्रिया जिल्ह्यातील प्रदर्शने, महोत्सवामध्येही स्टॉल सादर करू लागल्या. त्यातून व्यवसायाचा विस्तार होण्यास चालना मिळाली.
परंतु मागणीप्रमाणे पुरवठा करायचा तर यांत्रिकीकरण गरजेचे होते. त्यामुळे मागील वर्षी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून १४ लाखांचा प्रकल्पासाठी ३५ टक्के अनुदान मिळाले. आजमितीला कारळा, जवस, शेंगदाणा चटणी, कैरी, लिंबू, मिरची, छन्नी आदींची लोणची आदी पदार्थांची निर्मिती होते. वर्षाला ६०० किलोपर्यंत डिंकाच्या लाडूंची विक्री होते. दिवाळीचा फराळ घरपोचही दिल जातो.
आश्वासक उलाढाल
तासगाव शहरासह पुणे- बंगळूर महामार्गावरील सुमारे ५० ‘फूड स्टोअर्स’ व ‘रेस्टॉरंट्स’ मधून उत्पादने विक्रीस ठेवली जातात. सुप्रिया यांच्या घरच्या शेतात हरभरा, मूग, उडीद, ज्वारी अशी पिके होतात. पदार्थ निर्मितीत त्यांचा वापर होतो. पूर्वी बाजारातून उडीद खरेदी व्हायची. आता घरच्या उडदापासून पापड तयार होतात.. वर्षाकाठी सुमारे साडेसहा लाख रुपयांची उलाढाल होते. सुमारे २५ टक्के नफा हाती पडतो.
बचत गट व घरच्यांची साथ
दरम्यान, तासगाव नगरपालिकेचे परशुराम गायकवाड, दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, यशस्विनी शहर स्तरीय संघ आदींच्या मदतीतून सीरा बचत गटाची स्थापना झाली. त्यातून सुप्रिया यांना उत्पादनांच्या निर्मितीसाठी पार्वती शेटे, कविता शिवणकर, लता शिवणकर, आश्विनी जामदार, सुप्रिया शिवणकर, सीमा शिवणकर यांचे बळ मिळाले. पती, सासू, सासरे यांच्यासह दीर अभिजित, रोहित यांचीही साथ मिळाल्याने व्यवसाय वाढीस प्रोत्साहन मिळाले.
पाककला स्पर्धेत सहभाग
पदार्थ तयार करताना गुणवत्तेचा मापदंड ठेवला आहे. त्यामुळे ग्राहकांत विश्वासार्हता वाढली आहे. आता चौकटीबाहेरील पदार्थ तयार करणे, नव्या रेसिपी तयार करून पाहणे हा छंद जडला आहे. शहरातील विविध क्लबद्वारे पाककला स्पर्धांचे आयोजन होते. त्यामध्ये पदार्थांची संकल्पना दिली जाते. अशा स्पर्धांमध्ये सुप्रिया आवर्जून सहभागी होतात. त्यातून आपण केलेले पदार्थ किती गुणवत्तापूर्ण आहेत याबाबत अजून माहिती व शिकण्यासही खूप मिळते असे त्या सांगतात.
सुप्रिया शिवणकर ९६२३७८८२७२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.