
Rural Employment: नांदेड जिल्ह्यातील शेवडी (बाजीराव) या गावातील महिला मागील चार वर्षांपासून गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन दर महिन्याला शंभर रुपये बचत करीत होत्या. यातून गरजू महिलांना आर्थिक मदत करण्यास सुरुवात झाली. पुढील टप्प्यात पूरक उद्योगाला सुरुवात करण्यासाठी स्वयंसाह्यता समूहाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान शीतल एकलारे यांनी महाराष्ट्र ग्रामीण जीवनन्नोती अभियानामध्ये आयसीआरपी म्हणून काम सुरू केले.
त्यानंतर त्यांनी ‘उमेद’मधून २२ फेब्रुवारी २०२१ मध्ये महात्मा बसवेश्वर स्वयंसाह्यता समूहाची नोंदणी केली. यासाठी त्यांना लोहा पंचायत समिती कार्यालयातील श्री. सातपुते, श्री. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. या काळात गावात केवळ चार महिला गट कार्यरत होते. त्यानंतर ग्रामसंघ स्थापन करुन २५ महिला गटांची नोंदणी झाली. यामध्ये कृषिसखी म्हणून सरोजा फूलझळके आणि बीसी सखी म्हणून जयश्री एकलारे यांना जबाबदारी देण्यात आली.
महात्मा बसवेश्वर स्वयंसाह्यता समूहामध्ये सध्या अध्यक्षा म्हणून अरुणा वैजनाथ एकलारे आणि सचिवपदाची जबाबदारी जयश्री शैलेश एकलारे यांच्याकडे आहे. सदस्या म्हणून शीतल विश्वनाथ एकलारे, मीराबाई उमाकांत एकलारे, लक्ष्मीबाई बालाजी चावरे, इंदूबाई बाबूराव एरंडे, शालूबाई गंगाधर पोटफळे, शिवकन्या सखाराम एरंडे, महादेवी हनुमंत शिराळे, गोकर्णा अप्पाराव एकलारे यांचा समावेश आहे.
महात्मा बसवेश्वर स्वयंसाह्यता समूहाची नोंदणी झाल्यानंतर ‘उमेद’कडून २९ फेब्रुवारी २०२१ रोजी पंधरा हजारांचा फिरता निधी मिळाला. तसेच गटातील सहा हजार रुपये अशा एकूण वीस हजार रुपयांच्या माध्यमातून घरगुती स्तरावर डाळ निर्मितीसाठी १४ हजार रुपयांत एक डाळ निर्मिती यंत्रणा विकत घेतली. उर्वरित सहा हजार रुपये तीन महिलांना प्रत्येकी दोन हजार रुपये व्याजाने देण्यात आले.
समूहातील महिलांना वेगवेगळ्या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. समूहातील अरुणा एकलारे, शीतल एकलारे आणि इंदुबाई एरंडे यांच्याकडे डाळ निर्मितीची जबाबदारी आहे. शेवडीसह परिसरातील खेडेगावातून महिलांना डाळी, सोजी, कडी पीठ, मिरची आणि हळद पावडर बनवून देतात. पहिल्या सहा महिन्यांत डाळ निर्मितीमधून ११ हजार रुपयांची मिळकत झाली.
स्वयंसाह्यता समूहाकडून लघू व्यवसाय सुरू झाल्यानंतर उत्पादनवाढीसाठी भांडवलाची आवश्यकता जाणवू लागली. यासाठी ‘उमेद’कडे भांडवल उभारणीसाठी कर्जाची आवश्यकता मांडण्यात आली. यासाठी बँकेकडे रीतसर मागणी करून कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर एक लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. यातून उद्योगवाढीसाठी तीस हजार रुपयांचे शेवया यंत्र आणि तीस हजार रुपयांचे तांदळापासून पट्टी पापड बनविण्याचे यंत्र खरेदी करण्यात आले. उर्वरित चाळीस हजार रुपये दोन महिलांना कर्ज स्वरूपात देण्यात आले.
शेवया आणि डाळ निर्मिती
यंत्र घेतल्यानंतर शीतल एकलारे यांनी शेवया निर्मितीला सुरुवात झाली. बाजारपेठेचे गाव असल्यामुळे शेवया बनविण्यासाठी परिसरातील महिलांच्याकडून चांगली मागणी येऊ लागली. गुणवत्तापूर्ण उत्पादनामुळे गाव परिसरातील महिला शेवया बनविण्यासाठी एकलारे यांच्याकडे येतात. दररोज ७० ते ८० किलो शेवयांची निर्मिती होते. पाच किलो सोजी बनविण्यासाठी वीस रुपये आणि पाच किलो शेवया बनविण्यासाठी ६० रुपये दर आकारला जातो. वर्षभरात आठ महिने शेवया निर्मिती सुरू असते.
विविध प्रकारच्या डाळी बनविण्याचे काम लक्ष्मीबाई बालाजी चावरे, इंदूबाई बाबुराव एरंडे यांच्याकडे आहे. या महिला उडीद, मूग, तूर, हरभरा या कडधान्यापासून डाळी तयार करतात. या डाळी शेवडी, जवळा, भेंडेगाव, जामगा शिवणी, कपिलेश्वर, बेट सांगवी या गावातील ग्राहकांना बनवून दिल्या जातात. तसेच या महिला शेतकऱ्यांकडून कडधान्य विकत घेऊन डाळ निर्मिती केली जाते. या डाळींची वर्षभर लोहा, कंधार, शेवडी बाजारात विक्री केली जाते. विविध प्रकारच्या डाळी १५० ते २०० रुपये दराने विकल्या जातात.
हळद, तिखट निर्मिती
महिला गटातर्फे ग्राहकांच्या मागणीनुसार हळद तसेच मिरचीचे तिखट बनवून दिले जाते. यासाठी हळदीचे तुकडे करून पावडर बनविण्यासाठी ८० रुपये प्रति किलो आणि तुकडे करून दिलेल्या हळदीपासून पावडर बनविण्यासाठी ४० रुपये प्रतिकिलो मजुरी दर आकारला जातो. याचबरोबरीने समूहातर्फे बाजारातून हळद खरेदी करून त्यापासून पावडर तयार केली जाते. हळद पावडरची विक्री गटातर्फे केली जाते. समूहाने तयार केलेल्या हळद पावडरची प्रति किलो दोनशे रुपये दराने विक्री केली जाते. महिला समूहातील इंदूबाई एरंडे यांच्याकडे मिरचीचे तिखट बनवण्याची जबाबदारी आहे. बाजारातून चांगल्या दर्जाची लाल मिरची खरेदी करुन त्यापासून तिखट तयार केले जाते. तिखटाची प्रति किलो २५० ते ३०० रुपये किलो दराने विक्री होते. मिरची कांडप यंत्रावर प्रति किलो ६० रुपये दराने ग्राहकांना तिखट तयार करून दिले जाते.
उद्योग वाढीसाठी प्रयत्न
सध्या समूहाकडे असलेल्या प्रक्रिया यंत्रणा या लहान क्षमतेच्या आहेत. उत्पादनात वाढ करण्यासाठी समूहाने जिल्हा उद्योग केंद्राकडे अद्ययावत पापड मशिन यंत्र खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला. आधुनिक यंत्राच्या साह्याने उडीद पापड, पोहा पापड, साबुदाणा पापड निर्मिती शक्य आहे. यासाठी दहा लाखांपर्यंतच्या यंत्राचा प्रस्ताव सादर केला आहे. यासाठी ‘उमेद’चे तालुका व्यवस्थापक गणेश आरोटले यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
महिलादिनी गौरव
महात्मा बसवेश्वर स्वयंसाह्यता समूहाने केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल शेवडी ग्रामपंचायतीतर्फे शीतल एकलारे यांचा ८ मार्च २०२४ रोजी सरपंच बसवेश्वर धोंडे यांनी सत्कार केला. भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे गावामधील महिला गटाने उद्योग उभारावा किंवा घरगुती लघुउद्योग करावा यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
वैशिष्ट्यपूर्ण तांदूळ पट्टी पापड
गटातील शीतल एकलारे यांचे माहेर लातूर जिल्ह्यातील आहे. त्या भागात तांदळापासून पट्टी पापडाची निर्मिती केली जाते. या भागात हे पापड खूप प्रसिद्ध आहे. यामुळे शीतल एकलारे यांनी पट्टी पापडाच्या निर्मितीसाठी लागणारे यंत्र बँक अर्थसाह्यातून खरेदी केले. या यंत्राच्या माध्यमातून विविध रंगांचे पट्टी पापड तयार केले जातात. यासाठी लागणारा मसालादेखील त्या स्वत: बनवितात. शीतल एकलारे मजुरीवर १५० रुपयांत पाच किलो तांदळापासून पापड बनवून देतात. स्वत: बनविलेले तांदूळ पट्टी पापड दोनशे रुपये प्रति किलो या दराने विकतात. ग्राहकांना वर्षभर त्यांच्या मागणीनुसार रंगीत पट्टी पापड तयार करून दिले जातात.
दुग्ध व्यवसाय, शिलाई उद्योगाला चालना
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत महात्मा बसवेश्वर समूहातील तीन महिलांना बीज भांडवल म्हणून ४० हजार रुपये निधी मिळाला. या अर्थसाह्यातून शीतल एकलारे, इंदुबाई एरंडे, लक्ष्मीबाई चावरे यांनी म्हशी घेऊन पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे. महात्मा बसवेश्वर स्वयंसाह्यता समूहाच्या महिला विविध व्यवसायांत गुंतल्या आहेत. काही जणींनी शिलाई कामास सुरुवात केली आहे. एक महिला झेरॉक्स यंत्र चालविते.
- शीतल एकलारे, ९३५६३ ७४७६२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.