Maharashtra Soybean Success Story: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या अतिपावसाच्या तालुक्यात प्रकाश व गोकूळ या जाधव पितापुत्रांनी अभ्यासपूर्ण व तंत्रज्ञानयुक्त शेतीतून सोयाबीनचे एकरी १४ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन साध्य केले आहे. टोकण यंत्र तसेच फुले संगम वाणाची निवड, लागवडीसाठी सरी-वरंबा पद्धत व एकात्मिक पद्धतीच्या उत्कृष्ट व्यवस्थापनातून ते करीत असलेली सोयाबीनची प्रयोगशील शेती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हा अतिपावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. भात हे या प्रदेशातील मुख्य पीक आहे. या भागात सोयाबीनसारख्या गळीतधान्याचा पेरा तुलनेत कमी असतो. मात्र अभ्यासपूर्ण शेतीतून साधलेले व्यवस्थापन व तंत्रज्ञानाचा वापर यातून काही शेतकऱ्यांनी अति पावसाच्या प्रदेशातही सोयाबीनसारख्या पिकातून एकरी उत्पादकता वाढवण्यात यश मिळवले आहे. शेणीत (ता. इगतपुरी) येथील प्रकाश विश्राम जाधव यांनी ही किमया घडवली आहे. सध्या मुलगा गोकूळ वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या वीस एकर शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात.
सोयाबीनची सुधारित शेती
जाधव कुटुंबीय सातत्याने शेतीत नवे प्रयोग करत असतात. भात, कांदा, मधुमका व भाजीपाला पिकांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. उत्पादन खर्च, श्रम, उत्पादन व उत्पन्न या बाबी पाहता भात हे पीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नव्हते. अशावेळी पंधरा वर्षांपूर्वी हे कुटुंब सोयाबीनकडे वळले. सुरुवातीच्या पारंपरिक पद्धतीत बियाणे फोकून दिल्यानंतर बैल औताने मातीआड केले जायचे. पारंपरिक व्यवस्थापन पद्धतीत केवळ पिकाची शाकीय वाढ व्हायची. शेंगधारणा कमी व्हायची.
पुढे या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचा वापर सुरू झाला. सन २०१८ मध्ये मजुरांमार्फत टोकण पद्धतीचा अवलंब सुरू केला. मात्र यात मजुरी अधिक लागायची. एकसारख्या अंतरावर बियाणे लागवड होत नसा. एकरी झाडांची संख्या कमी होऊन अपेक्षित उत्पादन हाती येत नव्हते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी चार वर्षांपूर्वी मानवचलित टोकण यंत्राचा वापर सुरू केला.
शिवाय व्यवस्थापनातही काही महत्त्वाचे बदल केले. त्याचा फायदा एकरी उत्पादनवाढीत व मालाच्या गुणवत्तेत दिसून आला आहे. अर्थात, हे सर्व बदल करताना गोकूळ यांनी सोयाबीन पिकाचा शास्त्रीय सर्वांगीण अभ्यास केला. प्रयोगशील शेतकऱ्यांचे प्रयोग अभ्यासले. ते ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. त्यातील तांत्रिक लेख व यशकथाही त्यांचे ज्ञान परिपूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.
सुधारित पद्धतीचे व्यवस्थापन व फायदे
प्रत्येकी पाच हजार रुपये किमतीची तीन टोकण यंत्र खरेदी केली. यात एक मनुष्य दिवसभर एक एकराच्या दरम्यान लागवड पूर्ण करतो.
दर दोन वर्षांनी बियाणे बदल केला जातो. अलीकडे फुले संगम वाणाची लागवड केली आहे.
हे वाण अधिक उत्पादनक्षम आहे. त्याचा कालावधी-१०० ते १०५ दिवसांचा आहे. भारी जमिनीत अनुकूल व दाणे जाड, टपोरे, चमकदार आहेत.
उन्हाळ्यात मधुमक्याची काढणी झाल्यानंतर खरिपात सोयाबीन असते. यात खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत केली जाते. पावसाचा विलंब झाल्यास किंवा खंड पडल्यास पाणी सरीत साचून त्याचा फायदा होतो. सरी-वरंबा पध्दतीचा वापर. सरी दीड फुटाची तर दोन झाडांतील अंतर सहा इंच असते.
पूर्वी एकरी २२ ते २५ किलोपर्यंत बियाणे लागायचे. आता ते १२ किलोपर्यंत लागते.
बियाण्याची ५० टक्के बचत साधली आहे. एक जागेवर तीन बिया प्रमाण.
पेरणीपूर्व बीज प्रक्रियेत ‘रायझोबियम’चा वापर.
तण उगवून आल्यानंतर ते दोन पानावर असताना शिफारशीनुसार तणनाशक फवारणी.
टोकणीनंतर २५ दिवसांनी एकरी ५० किलो १०:२६:२६ व सल्फर ४ किलो मात्रा.
लागवड अंतर एकसारखे असल्याने फुटव्यांची संख्या पूर्वीपेक्षा अधिक. शेंगाचीही अधिक वाढ.
झाडांची संख्या मर्यादित व सरी-वरंबा पद्धतीमुळे हवा खेळती राहून फवारणी व मशागत करणे झाले सोपे.
३० ते ३५ दिवसांनी बुरशीनाशक व वाढरोधकाचा वापर करून झाडाची मर्यादित वाढ ठेवण्याचे नियोजन.
५० दिवसांनी फुलोरा अवस्थेत शेंगांची चांगली संख्या येण्यासाठी बोरॉन, ०:५२:३४ व बुरशीनाशक यांची एकत्रित फवारणी.
पावसाचा खंड पडल्यास तुषार, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे शक्य.
शंभर दिवसांचा पेरा झाल्यानंतर हवामान अंदाज घेऊन सोंगणी.
जमिनीवर पसरलेला सोयाबीनचा पाला मातीआड केला जातो. त्यामुळे पुढील पिकाला त्याचा फायदा होतो. द्विदलवर्गीय पीक असल्याने नत्राची उपलब्धता होते.
पूर्वी एकरी खर्च २० हजार रुपयांपर्यंत यायचा. आता तो १२ ते १५ हजारांपर्यंत येतो.
उत्पादनात झाली वाढ
पूर्वीच्या ज्या काही पेरणी पद्धती होत्या त्यामध्ये एकरी पाच क्विंटलपासून ते आठ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायचे. मजुरांमार्फत टोकण पद्धतीत ते ११ ते १२ क्विंटलपर्यंत मिळाले. तर अलीकडे मानवचलित टोकण यंत्राचा वापर व व्यवस्थापनातून यातून एकरी १४ ते १५ क्विंटल उत्पादनाचा पल्ला गोकूळ यांनी गाठला आहे. जमीन मध्यम ते खोल काळ्या प्रकारची असल्याने ऐन शेंगधारणा अवस्थेत पूर्वी पाण्याचा ताण पडून उत्पादनावर परिणाम व्हायचा. ही बाब लक्षात घेऊन नियोजनात बदल केला. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे सोयाबीनची विक्री होते. प्रति क्विंटल ४२०० ते ४५०० रुपये दर मिळतो. ताही प्रसंगी हा दर ८००० रुपयांपर्यंत मिळाला आहे.
प्रयोगशीलवृत्तीने नेले पुढे
पत्नी लता यांची समर्थ साथ मिळाल्यानेच शेतीत प्रगती करणे प्रकाश यांना शक्य झाले. त्यांचा मुलगा प्रवीण कृषी अभियांत्रिकी शाखेत पीएचडीधारक आहेत. तर गोकूळ यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातून उद्यानविद्या शाखेतील पदविका संपादन केली आहे.
दोघे बंधू एक विचाराने शेतीचे नियोजन करतात. गोकूळ यांची पत्नी अर्चना व भावजय ज्योती यांचाही मोठा हातभार लाभतो. शेतीतील प्रयोगशीलतेमुळे कृषी विभाग व ‘आत्मा’ यांच्याकडून आदर्श शेतकरी पुरस्काराने गोकूळ यांना गौरवण्यात आले आहे.
: गोकूळ जाधव, ९०४९९४९३१७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.