Solapur Famous Buffalo Market : महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक अशा तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या सोलापूर जिल्ह्याला बाजारपेठेच्यादृष्टीने वेगळे महत्त्व आहे. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारे केंद्र म्हणूनही सोलापूरकडे पाहिले जाते. एसटी, रेल्वेसारख्या सुलभ सुविधा या ठिकाणाहून आहेत. साहजिकच, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यामुळेच महत्त्वाचे स्थान मिळते आहे. सोलापूर बाजार समितीची स्थापना १९५९ मध्ये तत्कालीन मुंबई सरकारने केली. प्रत्यक्षात १९६१ मध्ये बाजार समिती सुरू झाली. १९६७ नंतर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री नियमानुसार बाजार समितीचे कामकाज सुरू झाले. पुढे ग्रामदैवत सिद्धेश्वरांच्या नावाने श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती या नावाने बाजार समिती ओळखली जाऊ लागली.
कांद्यासाठी राज्यात लौकिक
सोलापूर बाजार समितीचे कार्क्षेत्र सोलापूरनजीकच्या उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यापुरते आहे. उत्तर सोलापुरातील ४१ आणि दक्षिण सोलापुरातील ९० अशी १३१ गावे कार्यक्षेत्रात आहेत. असे असले तरी, उघड लिलाव, रोख व्यवहार आणि दळण-वळणाच्या सुविधांमुळे आजघडीला राज्यातील पहिल्या पाच बाजार समितीमध्ये सोलापूर बाजार समितीचे नाव घेतले जाते.
सोलापूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील उत्तर सोलापूर तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ३०३ हेक्टर आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे १ लाख १९ हजार ४६३ हेक्टर असे एकूण १ लाख ८७ हजार ७६६ हेक्टर इतके आहे. बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात खरीप हंगामात जिरायती क्षेत्रात प्रामुख्याने बाजरी, तूर, मका आणि रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा, करडई इत्यादी पिके घेतली जातात. पण सर्वाधिक व्यवहार कांद्याचे होतात, सोलापूरच्या स्थानिक भागातून कांदा या बाजारात येतो. पुणे, नगर, धाराशिव, बीड, लातूर, सांगली या भागांतील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कांद्यासाठी सोलापूरच्या बाजाराला पसंती दिली जाते.
जातिवंत म्हशी, शेळ्यांसाठी ओळख
सोलापूर बाजार समितीत खात्रीशीर आणि विश्वासपूर्वक जनावरांची खरेदी-विक्री होते. त्यामुळेच जिल्ह्यासह शेजारच्या धाराशिव, नगर, सातारा, पुणे, सांगली या भागांतून मोठ्या प्रमाणात जनावरे बाजारात येतात. त्यातही सर्वाधिक म्हशी आणि शेळ्या-मेंढ्यांना शेतकऱ्यांची पसंती मिळते. बाजारादिवशी किमान ५०० ते ८०० हून अधिक जनावरे बाजारात येतात. सकाळी नऊ वाजल्यापासून बाजार भरण्यास सुरुवात होते, दुपारी एक वाजेपर्यंत हे व्यवहार चालतात.
दुधाच्या क्षमतेनुसार किंमत
प्रामुख्याने या बाजारात म्हशींची खरेदी-विक्री सर्वाधिक होते. किंमत मात्र दूध देण्याच्या क्षमतेनुसार ठरते. प्रामुख्याने बाजारपेठेत पंढरपुरी, जाफराबादी, मुऱ्हा जातींच्या म्हशी येतात. म्हशीला किमान ४० हजार ते एक लाख रुपयांपर्यंत दर मिळतो. जर्सी गाईला किमान ५० हजार रुपये ते ८० हजार रुपये, जर्सी कालवडींना १० हजार ते २० हजार रुपये, रेड्याला २००० ते २५ हजार रुपये, बैलाला २० हजार ते ७० हजार रुपये, शेळ्यांना किमान ३ हजार, सरासरी ५ हजार आणि सर्वाधिक २० हजार रुपये आणि मेंढ्यांना किमान २००० रुपये, सरासरी ५ हजार रुपये आणि सर्वाधिक २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत दर मिळतो.
ठळक मुद्दे
प्रत्येक मंगळवारी बाजार. सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत खरेदी-विक्रीचे व्यवहार.
जनावरांसाठी प्रशस्त चार निवारा शेड.
पिण्याच्या पाण्यासह, विजेची पुरेशी सुविधा.
प्रवेश शुल्कापोटी पाच रुपये शुल्क, जनावरांच्या खरेदीवर शेकडा एक रुपये ५ पैसे याप्रमाणे बाजार शुल्क.
अलीकडे सर्वाधिक म्हशी आणि शेळ्यांचा बाजार चांगला भरतो. सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातूनही जनावरे बाजारात येतात. जनावरांसाठी उत्तम सोईसुविधा आहेत. योग्य रोख व्यवहार असतो, त्यामुळे शेतकरी आणि खरेदीदार या दोघांचा आमच्या बाजाराकडे कल आहे.व्ही.आय. कलशेट्टी, विभागप्रमुख, जनावर बाजार, सोलापूर बाजार समिती, सोलापूर
माझ्याकडे ४ एकर शेती आहे, शेतीला दुधाचा जोडव्यवसाय आहे. सध्या ३ म्हशी आणि ४ जर्सी गाई आहेत, आणखी एक म्हैस घ्यायची आहे. दुधाची क्षमता आणि परवडणारी किंमत याचा विचार करून घेत आहे.रामलिंग बिराजदार, शेतकरी, शिरपनहळ्ळी, ता. दक्षिण सोलापूर
सोलापूरसह सांगोला, मोडनिंब बाजारातून आम्ही गाई-म्हशींची खरेदी करतो आणि शेतकऱ्यांना विक्री करतो, सोलापूर बाजारात म्हशींना सर्वाधिक उठाव मिळतो. या बाजारात म्हशीसाठी शेतकरी सर्वाधिक येतात, त्यानुसार आम्ही म्हशी आणतो.प्रभाकर भोसले, व्यापारी, केगाव, ता. उत्तर सोलापूर, व्ही. आय. कलशेट्टी ९३५९२९८९३८ (विभागप्रमुख, जनावर बाजार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.