Latur News : खरीप हंगाम जवळ येताच जनावरांच्या बाजारात बैलजोडींची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होत असे. मात्र आता शेतीच्या यांत्रिकीकरणात ट्रॅक्टरच्या वेगापुढे बैलजोड्या मागे पडत आहेत. येथील गुरुवारच्या (ता.२०) बाजारात पशुधनाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावल्याचे दिसून आले.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे गुरुवारी जनावरांचा बाजार भरविला जातो. सध्या बाजारातील जनावरे खरेदी-विक्री कमालीची घटली आहे. जेथे शेकड्यांनी व्यवहार व्हायचे तेथे हाताच्या बोटावर मोजण्याएवढे होत आहेत. मशागतीच्या बैलांची मागणी घटली आहे. केवळ दुभत्या जनावरांची जेमतेम खरेदी-विक्री होत आहे. बाजारात गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत एकही खरेदी-विक्री व्यवहाराच्या दाखल्याची
अधिकृत पावती फाटलेली नव्हती. ता. एक एप्रिल ते ता.१९ जूनपर्यंत केवळ ३९२ व्यवहार झाल्याची नोंद बाजार समितीत आहे. गेल्या आर्थिक वर्षामध्ये एक हजार ५१४ जनावरांची खरेदी-विक्री झाली होती. दिवसेंदिवस या बाजाराला उतरती कळा लागली आहे. खरेदी-विक्रीचा व्यवहार घटत चालला आहे. व्यवहारामध्ये मशागतीच्या बैलाचे प्रमाण असून नसल्यागत जमा आहे.
सध्या बहुतांश शेतकरी ट्रॅक्टर व आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेती करीत आहेत. शेतीच्या अंतर्गत मशागतीच्या कामापैकी कोळपणीसाठी तेवढे बैल लागत होते. परंतु त्यावरही स्वयंचलित आणि मानवी श्रमावर आधारित अवजारे निघाली आहेत. त्यामुळे बैलांची गरजही कमी होत आहे. दुभत्या जनावरांचा वापर पशुपालक-शेतकरी करतात.
गायींमध्ये गावरान, देवणी, कंधारी, गीर आणि जर्सी तसेच म्हशींमध्ये गावरान,गुजर आणि गवळण यांची शेतकरी-पशुपालक सांभाळ करतात, त्यामुळे या पशुधनाच्या खरेदी-विक्रीची उलाढाल होते. शेळ्या आणि मेंढ्याचे मात्र मागील अनेक वर्षापासून खरेदी विक्रीमधील उलाढाल जशास तशी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.