Animal Husbandry : विचाराल अचूक प्रश्न, तर होईल योग्य आजाराचे निदान

Animal Care : फोन कॉल, ऑनलाइन कार्यक्रमातून आपल्या प्रश्नांचे योग्य उत्तर मिळविण्यासाठी महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. काही मुख्य समस्यांबाबत प्रश्न विचारताना कोणती माहिती पशुपालकाने पशुतज्ज्ञांना देणे गरजेचे आहे, याची माहिती आजच्या लेखामध्ये घेत आहोत.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, डॉ. मत्स्यगंधा पाटील

Animal Health : बऱ्याचवेळा पशुपालक आपल्या जनावरांना झालेला आजार, वेगवेगळ्या समस्यांबद्दल फोन आणि ऑनलाइन कार्यक्रम, प्रश्न उत्तर कार्यक्रमातून मार्गदर्शन घेतात किंवा उपचाराबाबतीत जाणून घेतात. परंतु पशुपालकांचे प्रश्न तसेच दिली जाणारी माहिती अपूर्ण असते. पशुवैद्यक हे त्या जनावरापासून दूर असल्यामुळे त्या जनावरांना पाहू किंवा तपासू शकत नाहीत, त्यामुळे पशुपालकाने दिलेल्या माहितीवरूनच काहीवेळा पशुतज्ज्ञ मार्गदर्शन करतात.

अपूर्ण माहितीमुळे योग्य निदान आणि त्यावर मार्गदर्शन करणे शक्य होत नाही. फोन कॉल, ऑनलाइन कार्यक्रमातून योग्य माहिती मिळविण्यासाठी पशुपालकांनी पशुतज्ज्ञांना योग्य पुरेशी माहिती देणे आवश्यक आहे. फोन कॉल आणि ऑनलाइन कार्यक्रमातून आपल्या प्रश्नांचे योग्य उत्तर मिळविण्यासाठी महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

यामध्ये जनावरांच्या आजाराची पार्श्वभूमी, आहारातील बदल, वातावरणातील बदल, जनावरांची प्रजात, दूध उत्पादन, दिला जाणारा चारा, पोट गच्च आहे का? शेण व्यवस्थित पडते का? तोंडावाटे लाळ जास्त गळते का? ताप आहे का? जनावर अशक्त आहे का सशक्त? जनावर कोठे पडले आहे का? अशाप्रकारे अनेक बाबी समजून घेऊन संबंधित प्रश्न विचारताना पशुतज्ज्ञांना योग्य माहिती द्यावी.

प्रश्न : जनावर चारा खात नाही.

चारा खाणे पूर्णपणे बंद आहे का थोडा चारा खाते? फक्त एकाच प्रकारचा चारा खाणे बंद आहे का ? चारा काळा पडला आहे का किंवा त्यास वास येत आहे का?

जनावराच्या आहारात काही बदल केला आहे का? पोट गच्च आहे का ? शेण व्यवस्थित पडते का? शेणास वास आहे का? शेणात फेस/चिकट स्त्राव आहे का? लघवीचा रंग कसा आहे? जनावरास शेण टाकताना त्रास होतो का? जनावर गाभण आहे का? शिळे अन्न दिले आहे का? ताप आहे का? अशा पद्धतीने माहिती दिल्यास योग्य निदान होऊन आपले जनावर पूर्ववत चारा खाऊन आजार बरा होण्यास मदत होते.

ताप हा जनावरास हात लावून न पाहता थर्मामीटरने पाहावा, म्हणजे नक्की किती ताप आहे ते समजण्यास मदत होते. ताप असेल तर वेगळ्या कारणाने जनावर चारा खात नाही. ताप नसेल तर दुसरे कारण असू शकते.

पोट गच्च आहे का हे समजून घेण्यासाठी जनावरांच्या डाव्या बाजूच्या भकाळीत हाताची मूठ बंद करून हात दाबून ठेवावा जर आपला हात ५ मिनिटांत ७ ते ८ वेळा आत- बाहेर होत असेल, तर जनावराच्या पोटाचे कार्य व्यवस्थित आहे हे समजून येते.

Animal Care
Animal Nutrition : पशू पोषणासाठी संतुलित आहार संकल्पना

प्रश्न : जनावर माजावर येत नाही. काय कारण असावे ?

जनावर कधी व्यायले? विताना काय त्रास झाला होता का?

जार /वार व्यवस्थित पडला होता का हाताने ओढून काढला आहे? विताना जनावर अशक्त होते का सशक्त? - गाभण काळात पशुखाद्य, आंबोण योग्य प्रमाणात दिले आहे का?

चारा काय देता व किती प्रमाणात देता? पशुखाद्य देण्याचे प्रमाण, पशुखाद्याचा प्रकार, क्षार मिश्रणाचा आहारात वापर आहे का? किती प्रमाणात वापर करता? अशा पद्धतीने माहिती देणे गरजेचे आहे.

प्रश्न : जनावर कशामुळे लंगडते?

जनावर चरायला सोडता का? गोठ्याची जमीन कशी आहे? दगड गोटे असलेल्या ठिकाणी जनावरास बांधता का?

जनावर पडले आहे का? पायास काही मार लागला आहे का? दाव्यात पाय अडकला होता का ? इतर जनावरांनी मारले आहे का?

खुरात काही अडकले आहे का? खूर मऊ पडले आहेत का? पायाला कुठे सूज आहे का?

जनावर लंगडण्याबरोबर इतर कोणती लक्षणे दाखवते का? दाखवत असेल तर कोणती लक्षणे दाखवत आहे? ही माहिती पशूतज्ज्ञास द्यावी.

प्रश्न : वासरांची योग्य वाढ का होत नाही?

वासराची प्रजात, वासराचे वय, वासराचे वजन, दिला जाणारा आहार व कालावधी, जंतनिर्मूलन केले आहे का?

पशुखाद्य देता का? क्षार मिश्रणाचा आहारात वापर आहे का? याबाबत माहिती द्यावी.

प्रश्न : गाय, म्हैस का कमी दूध देते?

जनावराची प्रजात, कधी व्याली? विताना काय त्रास झाला होता का? जार /वार व्यवस्थित पडला होता का हातांनी ओढून काढला आहे?

विताना जनावर अशक्त होते की सशक्त? गाभण काळात पशुखाद्य, आंबोण योग्य प्रमाणात दिले आहे का?

सध्या दिला जाणारा आहार, पशुखाद्याचे प्रमाण आणि प्रकार, क्षार मिश्रणाचा आहारात वापर आहे का? असेल तर त्याचे प्रमाण. जनावर आजारी पडले होते का?

कासदाह झाला होता का? चारा व पशुखाद्य व्यवस्थित खाते का? ही माहिती पशूतज्ज्ञाला द्यावी.

Animal Care
Animal Care : जनावरांचा खरारा महत्त्वाचा...

प्रश्न : दुधाला योग्य फॅट / एसएनएफ का लागत नाही?

जनावराची प्रजात, कधी व्याली? विताना जनावर अशक्त होते का सशक्त?

गाभण काळात पशुखाद्य /चंदी/ आंबोण योग्य प्रमाणात दिले आहे का? सध्याचे दूध उत्पादन, सध्या दिला जाणारा आहार व पशुखाद्याचे प्रमाण आणि प्रकार, पान्हा पूर्णपणे सुटतो का?

कासदाह झाला होता का? चारा व पशुखाद्य व्यवस्थित खाते का? दिवसातून किती वेळा चारा देता? वासरास कोणते दूध पाजता सुरवातीचे की दूध काढून शेवटचे?

आहारात अचानक काही बदल झाला आहे का? पान्हा पूर्णपणे सुटतो का? जनावरांची शारीरिक अवस्था याबाबत माहिती द्यावी.

प्रश्न : जनावरास सतत हगवण का लागते?

जनावरांचे वय, दिला जाणारा आहार व प्रमाण, पशुखाद्यातील घटक, शेणाचा रंग, पातळ पाण्यासारखे आहे का पेस्टसारखे?

शेण रक्तमिश्रित आहे का? शेणाचा वास, शेणाची सुसंगतता, जंतनाशन केले आहे की नाही ?

आहारातील बदल, ताप आहे का नाही याबाबत माहिती द्यावी.

प्रश्नः कालवड, रेडी माजावर का येत नाही?

कालवड, वगार, रेडीची प्रजात, वय, वजन, दिला जाणारा आहार व प्रमाण, क्षार मिश्रणाचा आहारात वापर आहे का? याबाबत माहिती द्यावी.

पशुवैद्यकाकडून गर्भाशय व अंडाशयाची योग्य प्रमाणात वाढ झाली आहे का? ते तपासून पाहणे गरजेचे आहे.

प्रश्न : गोठा, जनावरांच्या अंगावर गोचीड, पिसवांचा सतत प्रादुर्भाव का होतो?

गोठ्याचा प्रकार, जनावरांची शारीरिक स्थिती, गोठ्यातील स्वच्छता, कधी व किती वेळा फवारणी केली आहे? औषध किती प्रमाणात घेतले? अंदाजे घेतला का मोजून घेतले? किती वेळा औषधाचा वापर केला? गोठ्यात फवारणी केली का? याबाबत माहिती द्यावी.

प्रश्न : जनावरास विषबाधेची लक्षणे दिसतात.

जनावरांच्या खाण्यात विषारी वनस्पती आली आहे का? कोणते रसायन खाद्यातून गेले आहे?

जनावराचा प्रकार, वय, वजन, कीटकनाशक, तणनाशकाच्या बाटलीवरील सविस्तर माहिती किंवा वर्णन सांगावे.

किती जनावरांना विषबाधा झाली आहे? विषबाधा झालेली जनावरे एकाच गोठ्यातील आहेत की वेगवेगळ्या गोठ्यातील? लक्षणे, तीव्रता याबाबत माहिती द्यावी.

प्रश्न : जनावर का गाभण राहत नाही ?

जनावराचा गर्भपात झाला होता का? जनावर कधी व्यायले? विताना काय त्रास झाला होता का? जार /वार व्यवस्थित पडला होता का हाताने ओढून काढला आहे? विताना जनावर अशक्त होते का सशक्त?

गाभण काळात पशुखाद्य, आंबोण योग्य प्रमाणात दिले आहे का?

जनावराचा माज किती दिवसांनी येतो? किती वेळ माज राहतो? किती वेळा रेतन केले? रेतन करण्याची वेळ, नैसर्गिक रेतन केले का कृत्रिम रेतन?

चारा काय देता व किती प्रमाणात देता? पशुखाद्य देण्याचे प्रमाण, पशुखाद्याचा प्रकार, क्षार मिश्रणाचा आहारात वापर आहे का? किती प्रमाणात वापर करता?

जनावरास यापूर्वी काय संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाला होता का?

माजाचा बळस कसा आहे, पाण्यासारखा तार धरून पडणारा किंवा एकदम पातळ, बळसाचा रंग याबाबत माहिती दिल्यास योग्य ते निदान होऊन जनावर गाभण राहण्यास मदत होऊ शकते.

डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ८३२९७३५३१४ (पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि.लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com