Grape Farming Agrowon
यशोगाथा

Grape Farming : आगाप द्राक्ष शेतीतून समृद्ध झाले पिंगळवाडेचे शिवार

Grape Cultivation : एकेकाळी जिरायती असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पिंगळवाडे (ता. सटाणा) गावाने फलोत्पादनातून समृद्धी आणली. अनेक संकटे व आव्हानांवर मात करीत त्यांनी आगाप द्राक्ष शेतीत व परदेशातील निर्यातीत आपले नाव तयार केले आहे.

मुकुंद पिंगळे

Grape Farming Success Story : नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्याच्या उत्तर भागात करंजाडी खोऱ्यालगत पिंगळवाडे गाव वसले आहे. पाण्याचे स्रोत नसल्याने पूर्वी जिरायती शेती व्हायची. रोजंदारी हेच उदरनिर्वाहाचे मुख्य साधन होते. काही शेतकरी गोसंगोपन पूर्वी करीत. सन १९८४ च्या दरम्यान गावच्या परिस्थितीला कलाटणी मिळाली.

सुमारे ८२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा जाखोड लघू पाटबंधारे प्रकल्प निर्माण होऊन शिवारात पाणी आले. पारंपरिक जिरायती पिकांची जागा गहू, कांदा, मिरची, टोमॅटो कोबी, ऊस आदींनी घेतली. गुजरात राज्यातील बाजारपेठांमध्ये गावातील भाजीपाला जाऊ लागला. रावळगाव (ता. मालेगाव), निफाड, कादवा या साखर कारखान्यांना तर ताहाराबाद येथे खांडसरीला ऊस गाळपासाठी जाऊ लागला.

डाळिंब बागांची उभारणी

सन १९८६- १९९० च्या काळात नगर जिल्ह्यातील कोल्हार, संगमनेर भागात डाळिंबाची प्रयोगशील शेती व्हायची. तेथील शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून गावात प्रथमच प्रगतशील शेतकरी कृष्णा धर्मा भामरे व केदा दावल भामरे यांनी दाभाडी (ता. मालेगाव) येथून रोपांची उपलब्धता केली. त्यातून ‘गणेश’ व ‘जी १३७’ या डाळिंब वाणांची लागवड केली.

जिद्द, मेहनत, अभ्यासूवृत्ती, बाजारपेठांचे सूक्ष्म निरीक्षण, पीक व्यवस्थापनातील अचूकता आदींच्या माध्यमातून डाळिंबाचे क्षेत्र विस्तारले. पुढे आरक्ता, ‘भगवा’, ‘सुपर भगवा’ असे वाण रुजले. सन २०१४ नंतर तेलकट डाग, मर रोग यांचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी डाळिंब पीक कमी केले.

द्राक्ष शेतीतून परिवर्तन

दरम्यान, १९८६ च्या सुमारास गावात भागा भामरे यांनी द्राक्ष लागवडीचा श्रीगणेशा केला होता. त्यांच्याच प्रेरणेतून द्राक्ष उत्पादकांची संख्या वाढू लागली. पुढे अधिक जोखीम,अधिक दर हे सूत्र ठेवून ऑक्टोबर छाटणीपेक्षा आगाप छाटणी तंत्राकडे त्यांनी मोर्चा वळवला. आज दक्षिण आशियायी देश तसेच भारतातही सर्वात प्रथम द्राक्ष उत्पादन घेण्याचा मान या गावाने पटकावला आहे. नोव्हेंबरपासूनच इथली द्राक्षे देशातील प्रमुख बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होते.

‘ख्रिसमस’ सणासाठी रशियात आमची द्राक्ष जात असल्याचे शेतकरी अभिमानाने सांगतात. सफेद वाणात थॉमसन, क्लोन, सुधाकर तर काळ्या वाणांमध्ये शरद सीडलेस, मामा जम्बो असे वाण आहेत. सन १९९६ मध्ये गावातून प्रथमच मॉरिशस व श्रीलंका येथे द्राक्ष निर्यात झाल्याचे गावातील ज्येष्ठ द्राक्ष उत्पादक कृष्णा धर्मा भामरे सांगतात. रशिया, युरोपिय देशांनाही निर्यात होते. येथील शेतकऱ्यांना प्रगतिशील द्राक्ष उत्पादक राजेंद्र ब्रह्मेचा, अशोक गायकवाड, श्रीराम ढोकरे, खंडेराव शेवाळे आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.

प्रगतीची ध्येयासक्ती

२०१९ ते २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. द्राक्ष बागा काही प्रमाणात कमी झाल्या. मात्र पर्यायी मार्ग काढत हवामान संवेदनशील क्रिमसन, रेड ग्लोब यांसारख्या रंगीत द्राक्ष लागवडीकडे शेतकरी वळले. स्वयंचलित हवामान केंद्रे, बागांमध्ये प्लॅस्टिक आच्छादन आदी तंत्रांचा त्यांनी आधार घेतला.

काहींनी पदरमोड करून संरक्षित शेतीची कास धरली आहे. संकटांना न घाबरता उपाययोजना करून पुढे जाणे हा गुण शेतकऱ्यांनी आत्मसात केला.महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे वार्षिक अधिवेशन, इस्राईल चीन, पेरू, चिली, स्पेन आदी देशातील अभ्यासदौरे याद्वारे येथील शेतकऱ्यांनी ज्ञानवृद्धी केली आहे. हवामान बदलाचा कल व द्राक्ष शेतीतील आव्हाने ओळखून येथील शेतकरी टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची, वेलवर्गीय आदी भाजीपाला पिकांकडे वळले आहेत.

अवतरली समृद्धी

सुरुवातीला डाळिंबातून तर नंतरच्या टप्प्यात द्राक्ष पिकातून पिंगळवाडेतील शेतकऱ्यांच्या घरी समृद्धी अवतरली आहे. सफेद द्राक्ष वाणांची एकरी सरासरी १० ते १२ टन, तर रंगीत वाणांची ८ ते १० टन उत्पादकता त्यांनी मिळवली आहे. वीस वर्षांत कधी यश, कधी संघर्ष वाट्याला आला. पण संयमाने चालत राहात गावातील शेतकऱ्यांनी प्रगतीची वाट सोडली नाही. शेतीतून गावातील सिंचन सुविधांचा विकास झाला.

यांत्रिकीकरण झाले. शेतकऱ्यांनी जमिनी खरेदी केल्या. टुमदार बंगले व त्यापुढे चारचाकी वाहने दिसू लागली. नव्या पिढीला दर्जेदार शिक्षण मिळू लागले. भविष्यकालीन योजनांसाठी शेतकरी सुयोग्य गुंतवणूक शिकले. स्व-भांडवल निर्मिती व त्यातून शेती विस्तार हे येथील शेतकऱ्यांचे प्रमुख बलस्थान झाले.

ग्रामविकास दृष्टिक्षेपात

शेतकरी संघटनेचे अध्वर्यू कै. शरद जोशी यांनी गावाला भेट दिली असून, त्यांच्या विचारांचा गावावर पगडा.

१९८१ मध्ये टेहरे (ता. मालेगाव) येथे झालेल्या आंदोलनात गावातील भागुजी काळू बागूल शहीद झाले.

भव्य श्रीराम, हनुमान मंदिरासह सभागृह बांधकाम.

कै. हभप कृष्णाजी माउली जायखेडकर यांच्या प्रेरणेतून वार्षिक भव्य हरीनाम सप्ताह आयोजन.

रोहयोतून वृक्ष लागवड, गोठा बांधकाम, बांबू लागवड.

लोकसहभागातून रस्त्यांची कामे, करंजाडी नदीवर चार सिमेंट बंधारे. लोखंडी पूल.

नरकोळ येथून जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी २४ लाख किमतीचे पाइपलाइन काम.

गावात पेरू, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट आदींच्या लागवडीला चालना मिळाली आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन व बाजारपेठांच्या मागणीनुसार पुरवठा करण्याकडे गावातील शेतकऱ्यांचा कल आहे. पेटंटेड वाणांची आयात करण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.
केदा दावल भामरे, ९४२३१८४८४८, प्रगतिशील शेतकरी
शेतीचे चित्र बदलत गेल्याने व कष्ट केल्याने आज चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. द्राक्ष बागांनी आम्हाला भरभरून दिले; राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून द्राक्षशेतीला प्लॅस्टिक आच्छादनासाठी अनुदान मिळणे गरजेचे आहे. त्यातून व निर्यातीला अधिक चालना मिळेल.
कृष्णा धर्मा भामरे, ९४२३४८१२०८, प्रगतिशील शेतकरी

पिंगळवाडेतील शेतीची वैशिष्ट्ये

शेतीतील उत्पन्नातील गुंतवणूक शेतीविकासासाठीच करण्याला प्राधान्य.

बांधबंदिस्ती, मृदा व जलसंधारण कामांवर भर.

काढणी पश्‍चात हाताळणी, प्रतवारीच्या सुविधा. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरण.

शेततळ्यांची निर्मिती, सूक्ष्मसिंचनावर भर.

देशी गोसंगोपनामुळे सेंद्रिय निविष्ठांची उपलब्धता. गोबरगॅस युनिट.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election : शेतकरी संघटनांना भुलवतेय आमदारकीची मोहमाया

Maharashtra Assembly Election : पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ससेहोलपट

Sanjay Kulkarni Death : ‘जलसंपदा’ला दिशा देणारे संजय कुलकर्णी यांचे निधन

Rabi Crop Loan : रब्बीसाठी पीक कर्जाचे ६८५ कोटींचे उद्दिष्ट

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात थंडीची चाहूल

SCROLL FOR NEXT