
Ratnagiri News : जिल्ह्यातील भात व नाचणी पिकाचे लक्ष्यांक ५२ हजार ५२२ हेक्टर असून आतापर्यंत १५ हजार १६५ हेक्टर क्षेत्रावर पुनर्लागवड झाली आहे. यावर्षी पावसाचे वेळापत्रक अनियमित राहिल्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात ५० टक्के भात लावण्या पूर्ण होणे अपेक्षित असतानाच हा टक्का ३५ वरच अडकला आहे.
या वर्षी लावण्यांची कामे पूर्ण होण्यास दहा दिवसांचा विलंब होईल असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या वर्षी रोपांची रुजवात व्यवस्थित न झाल्यामुळे पुनर्लागवडीचे लक्ष्य पूर्ण करण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान आहे. मात्र याची कृषी विभागाकडून अधिकाऱ्यांकडे नोंदच नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात सलग दहा दिवस पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला. अचानक आलेल्या या पावसाचा परिणाम भातशेतीवर झालेला आहे. खरीपपूर्व कामे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात केली जातात. पेरणी करण्यात येणाऱ्या शेतमळ्यांची साफसफाई करणे, पुनर्लागवड करणाऱ्या जागांची सफाई करणे ही कामे केली जातात.
काही ठिकाणी शेणखत टाकून ठेवले जाते. त्यामुळे पाऊस पडला की शेतामध्ये गवत उगवत नाही. परंतु ही कामे करण्यास शेतकऱ्यांना वेळ मिळालेला नाही. त्यामुळे गवत मोठ्या प्रमाणात रुजून आले असून, त्याची साफसफाई करण्यासाठीच शेतकऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. मजूर मिळवणे हे शेतकऱ्यांपुढील मोठे आव्हान आहे.
या परिस्थितीवर मात करीत अनेकांना रोपवाटिकांसाठी पेरण्या केल्या आहेत. त्यातही ८६ टक्केच पेरण्या झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. लवकर पडलेल्या पावसाचा हा परिणाम असून १४ टक्के शेतकऱ्यांनी रोऊ पेरल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात १ जून ते १ जुलै या कालावधीत ९५२ मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी तेवढाच पाऊस झाला आहे. परंतु यामध्ये अनियमितता अधिक आहे. काही महसुली मंडळात अधिक तर काहीठिकाणी कमी पावसाची नोंद झालेली आहे.
त्याचा परिणाम भात लागवडीवर होत आहे. कातळावरील भात पेरण्या विलंबाने झालेल्या आहेत. जिल्ह्यात असे क्षेत्र सुमारे १० हजार हेक्टर इतके आहे. जिथे पाणी आहे, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी भात लावण्यांना सुरूवात केलेली आहे. परंतु तिथेही रोपांची व्यवस्थित रुजवात झालेली नाही.
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांपुढे रोप पुनर्लागवडीसाठी पुरतील की नाही असा मोठा प्रश्न आहे. सध्या जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे पुनर्लागवडीचा वेग मंदावला आहे. काही ठिकाणी रोपांची चांगली वाढ होण्याची शेतकऱ्यांनी प्रतिक्षा आहे. जिल्ह्यात सरासरी ५२ हजार हेक्टरवर खरिपातील लागवड होते. आतापर्यंत १५ हजार हेक्टरवर लागवड झालेली आहे. पुढील आठ दिवसात अधिकाधिक क्षेत्रावर लागवड होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.