Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

Grape Production : जलसंधारणाच्या माथा ते पायथा उपचारांमधून शेवडी (ता. जिंतूर, जि. परभणी) गावाने दुष्काळावर मात केली आहे. शेततळ्यांद्वारे ‘वॉटर बँका’ तयार केल्या. आता शेवडीची जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक गाव अशी नवी ओळख निर्माण झाली आहे.
Grape Farming
Grape FarmingAgrowon
Published on
Updated on

Grape Farming Management : परभणी जिल्ह्यातील जिंतूर हा अवर्षणप्रवण तालुका आहे. अलीकडील वर्षांत हवामान बदलामुळे पावसाचे असमान वितरण होत आहे. अन्य शेतकऱ्यांप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांनाही सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील अनेक डोंगराळ गावांतील अल्पभूधारक तसेच शेतमजूर खरीप आटोपल्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक यांसारखी महानगरे गाठतात.

जिंतूरपासून तीन किलोमीटरवरी शेवडी हे अडीच हजार लोकवस्तीचे गाव आहे. जिरायती क्षेत्र बहुल या गावातील शेतकऱ्यांचे अर्थकारण खरीप हंगामावरच बेतले आहे. गावासभोवती डोंगर रांगा आहेत. माळरान जमिनीचे प्रमाण अधिक आहे. जो पाऊस व्हायचा तो वाहून जात असे. जानेवारीपासूनच पाणीटंचाई सुरू व्हायची. यंदा तर मागील महिन्यापासूनच ही परिस्थिती आली होती.

दृष्टिक्षेपात शेवडी

भौगोलिक क्षेत्रफळ - ७२२.७६ हेक्टर, पैकी लागवडयोग्य क्षेत्र - ६८० हेक्टर
लोकसंख्या-२५००
मुख्य पिके - सोयाबीन, कपाशी, तूर,
बागायती पिके - द्राक्षे ७ हेक्टर, फळबागा १६ हेक्टर, झेंडू ३० हेक्टर, भाजीपाला ६ हेक्टर.

माथा ते पायथा झाले उपचार

सन २०१४-१५ मध्ये दुष्काळात शेवडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी जनावरांसह येलदरी धरणाकाठी स्थलांतरित करावे लागले होते. सन २०१५ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गावाची निवड झाली. त्यानंतर मात्र गावाची प्रतिकूल परिस्थिती सुधारण्यास प्रारंभ झाला. लोकसहभाग, कृषी व भूजल सर्वेक्षण विभाग, प्रशासन, शिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थ यांच्या एकत्र कामांमधून जलसंधारणाचे माथा ते पायथा उपाय करण्यात आले. यात खोल समतल चर (डीप सीसीटी) १५० हेक्टर, नाला खोलीकरण १० कामे, ढाळीचे बांध २० हेक्टर, रिजार्च शाफ्ट एक, एनोली येथील तलावातील गाळ काढणे आदींचा समावेश राहिला.

Grape Farming
Grape Farming : कमी खर्चिक ठिबक तंत्रातून द्राक्षशेती झाली सुकर

सिंचनाने घडवला कायापालट

वृक्ष लागवड व मूलस्थानी जलसंधारणातून पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरवले जाऊ लागले. विहिरीसह अन्य जलस्त्रोतांची पाणीपातळी वाढली. कृषी विभागांतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी, मागेल त्याला शेततळे आदी योजनांच्या रूपाने गावशिवारात ७० शेततळ्यांची निर्मिती झाली. प्लॅस्टिक अस्तरीकरण केलेली २० शेततळी झाली. अनेक शेतकऱ्यांकडे दीड कोटी लिटर क्षमतेची साठवणक्षमता तयार झाली. रब्बी हंगाम व त्यात ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके तसेच झेंडू भाजीपाला, काकडी, टरबूज, खरबूज यांचे उत्पादन घेता येऊ लागले.

काही शेतकरी रसवंतीसाठी छोट्या क्षेत्रावर ऊस लागवड करतात. शेततळ्यातील संरक्षित पाणी व ठिबक सिंचना आधारे वर्षभरात दोन ते चार पिके घेणे शक्य झाले आहे. सन २०१९ च्या दु्ष्काळीत गावशिवारात पाण्याची टंचाई जाणवली नाही. सन २०२३ मध्ये केवळ ५२६ मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे दुष्काळी स्थिती उद्‍भवली. पिण्याच्या पाणीटंचाई निर्माण झाली. जिरायती पिकांच्या उत्पादनात मोठी घट आली. परंतु अस्तरीकरणाच्या शेततळ्यांमधील पाण्यावर शेतकऱ्यांना द्राक्ष बागा जोपासणे शक्य झाले.

द्राक्षाने दिला आधार

शेवडीतील शेतकऱ्यांनी कडवंची (जि. जालना) येथे भेट देऊन तेथील शेतकऱ्यांकडून द्राक्ष शेतीचे अनुभव जाणून घेतले. त्यातून २०१८ मध्ये विश्‍वनाथ काळे, मनोहर नागरे, सुरेश काळे, अशोक काळे, शंकर काळे, पंढरीनाथ काळे, ज्ञानेश्‍वर मुंढे, राधेश्याम सानप, खुशाल काळे यांनी एकूण १२ एकरांवर द्राक्ष लागवड केली. मार्गदर्शनासाठी सल्लागाराची मदत घेण्यात आली. आता नाशिक जिल्ह्यातील कुशल मजुरांमार्फत बागेची छाटणी व अन्य कामे केली जातात.

थेट शेतातून व्यापारी द्राक्षाची खरेदी करतात. जिंतूर येलदरी रस्त्यावर शेतकरीदेखील थेट विक्री करतात. या पिकातून शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती मिळाली आहे. जीवनमानात सुधारणा घडू लागल्या आहेत. मंडळ कृषी अधिकारी (जिंतूर) के. के. शेळके यांचे सहकार्य शेतकऱ्यांना मिळते. सन २०१५-१६ मध्ये जलसंधारणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनातर्फे विभागीय स्तरावरील द्वितीय क्रमांकाचा रोख पाच लाख रुपये पुरस्काराने शेवडी गावाचा सन्मान करण्यात आला.

उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत

गावात दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली आहे. दुधाळ पशुधनांमध्ये ४० ते ५० गायी तर १०० ते १५० पर्यंत म्हशी आहेत. गावाजवळील जिंतूर शहरात दररोज ४०० ते ५०० लिटर दूध विक्रीसाठी जाते. मागील वर्षापासून रेशीम शेतीला सुरुवात झाली आहे. तुती लागवडीसाठी रोपवाटिका तयार करण्यात आल्या आहेत. ऊस रसवंती, कुक्कुटपालन, शेततळ्यातील मत्स्यपालन याद्वारे शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे पर्यायी स्त्रोत निर्माण केले आहेत.

लोकसहभागातून काढला गाळ

एनोली येथील पाझर तलावातील गाळ २०१५ मध्ये लोकसहभागातून काढण्यात आला होता.
त्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढली होती. त्यानंतर मात्र दहा वर्षात पुन्हा गाळ जमा झाला.
यंदा देखील त्याचा उपसा केला जात आहे. शेतासाठी वापर होणार असल्याने सुपीकता वाढीस मदत होणार आहे.

Grape Farming
Grape Farming : बुलढाणा जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक निसर्गापुढे हतबल
पूर्वी पावसाळ्यात विहिरी भरल्यानंतर अतिरिक्त पाणी ओढ्याला काढून द्यावे लागत असे. आता शेततळ्यामध्ये ते साठवत आहोत. शेततळ्यात मत्स्य उत्पादन घेतले. मागील पाच वर्षांसूनद्राक्षाचे चांगले उत्पादन घेत आहे. यंदाच्या दु्ष्काळात शेततळ्याआधारे हे उत्पादन कायम घेत राहणे शक्य झाले.
विश्‍वनाथ काळे, ८३२९७४३८३२
आमची २५ एकर शेती आहे. शेततळ्यातील पाण्याआधारे तीन एकर द्राक्ष बाग जोपासली आहे.त्यातून आर्थिक बाजू सावरली आहे.
मनोहर नागरे
द्राक्ष शेती करू शकू याचा कधीच विचार केला नव्हता. आता पाच वर्षांपासून त्यात सातत्यआहे. तीन भावांनी मिळून सामूहिक शेततळे घेतले आहे. सायफन पद्धतीने विद्युत पंपाशिवाय ठिबक संचाद्वारे पिकांना पाणी देता येत आहे.यंदा दीड एकरात द्राक्षाचे आजवरचे सर्वाधिक २० टन उत्पादन मिळाले. स्वतः किलोला ६० रुपये दराने तर व्यापाऱ्याला ४० रुपये दराने विक्री केली.
खुशाल काळे, ९७६४२६४३२४
सात एकर शेती आहे. परंतु सततच्या दुष्काळामुळे उत्पन्नाची हमी राहिली नव्हती.त्यास पूरक म्हणून २०१७ पासून दुग्ध व्यवसायात आहोत. आठ म्हशी आहेत. दररोज ६० ते ७० लिटर दूध संकलन होते. जिंतूर शहरात डेअरी चालवतो. ६० रुपये प्रति लिटर दर आहे.यंदा कमी पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन निम्म्याने घटले. या स्थितीत दुग्ध व्यवसायाने जोखीम कमी केली.
सुधाकर काळे
तीन एकर शेती आहे. यंदा आम्ही दोघे भाऊ रेशीम शेती सुरू करणार आहोत.एक एकरात तुती लागवडीते नियोजन आहे.
संतोष घुगे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com